Showing posts with label क्रिडामहर्षि भिष्मराज बाम यांना वाहिलेली आदरांजली. Show all posts
Showing posts with label क्रिडामहर्षि भिष्मराज बाम यांना वाहिलेली आदरांजली. Show all posts

भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व - भाग २

आंतरराष्ट्रीय  पर्वत  दिन  

सोमवार  , दिनांक - ११ डिसेंबर  २०१७.


भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व - भाग २


बोलण्याच्या ओघात मी फिटनेस कसा सांभाळतो याबाबत सरांनी सहजच विचारलं. मी आपलं साधेपणाने माझी पद्धत सांगीतली. पोलीस दलाच्या अडनिड्या कर्तव्यातुन नियमितपणे सरावाकरीता वेळ मिळणं अशक्य नाही. पण अवघड नक्कीच आहे. गिर्यारोहणासारख्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधणा-या अन् उत्तुंग पर्वतांनाही गवसणी घालणाऱ्या छंदाकरीता तर सतत डोंगर चढाईची आव्हाने पेलत राहणे हाच सर्वोत्तम व्यायाम आहे. या उत्तरावर सर भलतेच खुष झाले. एक्झॅक्टली ... मला हेच अपेक्षित होतं म्हणाले. तुझी गाडी अगदी योग्य ट्रॅकवर आहे. त्याचवेळी माझ्या टाचेत होणाऱ्या त्रासामुळे मी कसा त्रस्त झालोय याची रामकहाणी मी सरांना ऐकवली. त्यातील माझी आगतिकता आणि त्याचा माझ्या मानसिकतेवर होणारा दुष्परिणाम सरांनी बरोब्बर हेरला. आणि काही चपखल उदाहरणं देऊन विशिष्ट व्यायामावर भर द्यायचा सल्ला दिला.


सरांनी माझ्यावर केलेल्या या अनुग्रहानंतर माझ्यातील सकारात्मक बदल मला जाणवू लागले. त्याच वर्षी (सन २०१३) इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन या भारत सरकारमार्फत गिर्यारोहणाचं नियंत्रण आणि नियोजन करणाऱ्या संस्थानामार्फत हिमाचल प्रदेशातील दुर्गम पर्वतराजीत "अल्पाईन क्लाईंबेथाॅन" नांवाची आंतरराष्ट्रीय महत्व असलेली हिमालयीन गिर्यारोहण मोहीम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती. याकरीता संपूर्ण देशभरातुन निवडण्यात आलेल्या ५५ सदस्यांमध्ये मी देखील एक होतो.


अशा मोहीमेत सरांनी दिलेल्या गुरुमंत्रांचा खुबीने वापर करीत ती महाकर्मकठीण मोहीम तर मी पूर्ण केलीच शिवाय हिमाचल प्रदेशातील "बडा शिगरी" नामक अतिदुर्गम हिमनदीवरील ६,२०० मीटर उंचीचे एक अनामिक हिमशिखर यशस्वीरीत्या सर करण्यात मी यश मिळवले. इतकेच नाही तर त्या मोहीमेत "अल्पाईन स्टाईलने" एखादं हिमशिखर यशस्वीरीत्या सर करणारा, वयाची चाळीशी उलटून गेलेला मी एकमेव नागरी सदस्य होतो.


सरांच्या दिव्य अनुग्रहामुळे माझा आरोहणरथ जणू सुसाटच सुटला. पुढील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये तर पट्टीच्या आरोहकांनाही जेरीस आणणा-या जम्मू-काश्मीर मधील मा. नुन या ७,१३५ मीटर उंचीच्या हिमशिखरालाही चांगली दणदणीत धडक दिली. पण लहरी हवामानाशी जास्त पंगा घेणं सयुक्तिक आणि व्यवहार्य न वाटल्याने ६,५०० मीटरवर बिघडलेल्या हवामानाशी सतत ४ दिवस झुंज देत असतांनाच यशस्वी माघारीचा निर्णय नाईलाजाने मलाच घ्यावा लागला. मोहिम आवरती घेतल्यानंतर सगळे थकले जीव आपापल्या घरट्यांकडे भुर्रकन उडुन गेले. पण त्यातील बामसरांच्या या भक्ताने अद्याप हार मानली नव्हती.


मुंबईला परतण्याऐवजी माझी भटकंतीची पायगाडी उलटी फिरवुन मी भटक्यांची पंढरी लेह गाठली. सुमारे २०-२२ दिवस मा. नुन या मातब्बर हिमशिखराशी प्राणपणाने लढुनही अंगातली रग अद्याप पुरेशी जिरली नव्हती. किंबहुना खेळाडूने रग जिरु द्यायचीच नसते, तर ईप्सित ध्येयाप्रत पोहोचण्यासाठी तीचा खुबीने वापर करायचा असतो. हा बामसरांचा मंत्र डोक्यात ठेऊन मी लेहजवळचे मा. स्तोक कांग्री हे ६,१२३ मीटरचे शिखर तिथल्या फावल्या वेळेत सर करण्यात यशस्वी झालो.


अनेक मोहीमांचा अनुभव असलेल्या माझ्यासारख्या आरोहकाने मा. स्तोक कांग्रीसारखं शिखर सर करण्यात खरंच विशेष काही नव्हतं. विशेष होता बामसरांनी केलेला अमोघ उपदेश. माझ्यासारख्या अतिसामान्य व्यक्तीवर सरांनी अक्षरशः ज्ञानकुंभच रिता केला होता.


मा. स्तोक कांग्री हे ट्रेकिंग पिक जरी मी सर केलं असलं तरी ती मोहीम केवळ एका सदस्याची अर्थात माझी एकट्याची होती. जगभरातुन तेथे या शिखरावर चढाईकरीता लोक येत असले तरी मी मात्र एकटाच होतो. शिवाय मा. नुनवर बरीच शक्ती खर्च झाली असतांनाही स्तोक कांग्री हे शिखर मी लेह पासून अवघ्या २२ तासांत सर केले होते. इतकेच नाही तर लेह सोडल्यापासुन स्तोक कांग्रीवरील आरोहण एकट्यानेच सहीसलामतरित्या पूर्ण करुन अवघ्या ३४ व्या तासाला मी लेहमधल्या माझ्या काॅटेजमध्ये संध्याकाळचा चहा घेत निवांत बसलेलो होतो. ही जादु होती सरांच्या दैवी वाणीची.


२०१५ मध्ये देखील मला सरांच्या शब्दांची मोहिनी आजमावण्याची संधी मिळाली. ते वर्ष क्रांतीशिरोमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाचं ५०वं स्मृतीवर्ष होतं. त्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नांवाने एखादं भव्यदिव्य कायमस्वरूपी स्मारक हिमालयात देखील उभारलं जावं याकरीता स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकामार्फत हिमाचल प्रदेशातील कर्चा नाला परिसरातील अजिंक्य अनामिक शिखराची निवड करण्यात आली होती. या शिखरावरील मोहीम यशस्वी करून त्या अजिंक्य अनामिक शिखरास स्वा. सावरकर यांचे नांव देण्याचा स्मारकाचा मानस होता. अशा मानाच्या मोहीमेतला एक आरोहक सदस्य म्हणून अगदी शेवटच्या क्षणाला माझी देखील निवड करण्यात आली होती.


स्वा. सावरकरांच्या नांवाचा जादुई करिष्मा अन् बाम सरांच्या शब्दांची पुण्याई, एक जगन्मान्य प्रखर राष्ट्रभक्त अन् भाषाप्रभू तर दुस-याच्या शब्दा-शब्दात अपरंपार सामर्थ्य. आणि हे दोघेही माझे श्रद्धास्थान आणि उर्जास्त्रोत असल्याने या अपूर्व योगाने मी मात्र अंतर्बाह्य उजळून निघालो होतो.


या मोहिमेतील एक प्रसंग अतिशय बाका होता. शिखरचढाई अंतिम टप्प्यात आलेली. अन् अचानक आमच्या प्रमुख गाईडने तो जिथंपर्यंत पोहोचला होता. तोच शिखरमाथा आहे असं सांगून चढाई थांबवली. काही मिनिटांतच मी त्याच्याजवळ पोहोचून त्याला विचारले असता त्याने छातीठोकपणे हाच शिखरमाथा असल्याचे मला ठणकावले.


हवामान फाॅगी असल्याने काही अंदाज येत नव्हता. माझं अंतर्मन मात्र तिथं चढाई थांबविण्याची ग्वाही देत नव्हतं. त्यावेळी मी सर्व टिमवर एक नजर फिरवली असता, सर्वजण आतोनात थकलेले दिसले. त्यात माझाही समावेश होता. ५२०० मीटरवरील कँप २ पासुन सुमारे ६ तास सातत्याने चाललेली चढाई, त्यातच मध्यरात्रीपासुनच त्या काहीशा बिघडलेल्या हवामानातच शिखरचढाईचा अट्टाहास अशा ब-याच बाबी याला कारणीभूत होत्या. पण ही मोहिम देखील अशी तशी नव्हती. इथं १९,००० फूट उंचीवर मी त्या गाईडचं एक चांगलं सविस्तर बौध्दिक घेतलं.


मनाची कवाडं उघडून जगाकडे विशाल नजरेने पहायचे असेल तर विविध खेळ खेळणे गरजेचे आहे. नुसतंच खेळणे नाही तर त्यातुन सर्वांगीण विकास आणि आत्मोन्नती साधता आली पाहीजे. आणि त्यासाठी खेळातील मानसशास्त्राचे बारकावे ज्ञात असणं अत्यंत आवश्यक आहे. हि बामसरांची शिकवण तेथे कामी आली.


अगदी शांतपणे, मधुरवाणीने अन् पुढाकार घेऊन त्यावेळी मी हे कार्य मोठ्या हिंमतीने करु शकलो. तोपर्यंत सर्वांनाच अविश्रांत चढाईच्या थकवणा-या कामातुन एक छोटीशी विश्रांती मिळाल्याने सारेच तरतरीत झाले. अन् पुढील तासा- दिडतासाच्या चढाईनंतर आम्ही त्या अजिंक्य, अनामिक हिमशिखराच्या सर्वोच्च माथ्यावर होतो. ( लवकरच त्या हिमशिखराला स्वा. सावरकर असं महान नामाभिधान अधिकृतपणे लाभणार आहे.)


गिर्यारोहण क्षेत्रातील बामसरांचं योगदान असामान्य असं होतं. हे नांव माहित नाही असा क्रिडाप्रेमी निदान महाराष्ट्रात तरी अाढळणार नाही. गिर्यारोहण आणि गिर्यारोहकांकरीता तर त्यांची कवाडं सदाच उघडी असत. त्यांचं याबाबत म्हणणं असायचं कि इतर खेळ कायम लाईमलाईटमध्ये असतात. पण गिर्यारोहणाला तसं भाग्य नाही, अन् त्याची गरजही नाही. गिर्यारोहक स्वयंभु असतात. कारण स्वतः निसर्गच त्यांचा खरा मार्गदर्शक असतो. हा सर्वसामान्यांनी जोपासलेला खेळ असला तरी ना तो खेळ सामान्य आहे ना त्यातील खेळाडु सामान्य असतात.

मर्दाचा पोवाडा मर्दानेच गावा अशी एक म्हण आहे. कारण गिर्यारोहण हा येऱ्या- गबाळ्यांचा छंदच नाही असं बामसरांचं गिर्यारोहण आणि गिर्यारोहकाबाबतचं मत होतं.


१९९८ सालच्या हृषिकेश यादवांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आलेल्या मा. ऐव्हरेस्ट मोहीमेला मानसिक रसदबळ पुरवण्याचं कार्य बामसरांनीच केलं. या लेखात सुरुवातीपासून उल्लेख असलेला रफीक शेख हा तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाचा पहिला एव्हरेस्टवीर जवान. हा त्यांच्या अतिशय जवळच्या खेळाडुंपैकि एक. त्याचं तर बामसरांनी ओल्या मातीच्या गोळ्यातुन एका महान कलाकृती साकारावी असंच रुपांतर केलंय. मा. एव्हरेस्टला सलग धडका देऊन त्याने तिस-यांदा विजयश्री अक्षरशः खेचून आणली. हा विजय त्याच्या एकट्याचा नक्कीच नव्हता. तर यात बामसरांच्या वाणीचा वाटा खुप मोठा होता. साताऱ्याची पहिली महिला एव्हरेस्ट वीरांगना प्रियांका मोहितेलाही एव्हरेस्टपुर्वी अनमोल गुरुमंत्र सरांनीच दिलेला आहे.


माझ्या आणि त्यांच्यातले स्नेहबंध तर शब्दांच्या पलीकडले होते. माझ्या कौशल्यावर, नेतृत्वगुणांवर सरांना ठाम विश्वास होता. एकदा तर मला म्हणाले "आनंद तु जेंव्हा कधी माऊंट ऐव्हरेस्टला जाशील तेंव्हा सोबत माझ्या मुलाला घेऊन जा " साक्षात देववाणीसह देवाच्या विश्वासाचा अनुग्रह. यापरतं आणखी काय हवं ?


सर गेले त्यादिवशी अवघं क्रीडाविश्वच दोलायमान झालं. खेळ आणि खेळाडुंसाठी तर भिषण धरणीकंपच होता तो. आता गोंधळलेल्या, भांबावलेल्या क्रिडाजनांचं मानसिक बौद्धिक कोण घेणार ? चुकिच्या क्रिडाधोरणांना स्वतःच्या हातांनी सुयोग्य असं घडीव-ताशीव रुप कोण देणार ? खेळ आणि खेळाडुंची न्याय्य बाजू शासनदरबारी वजनदारपणे कोण मांडणार?


या गहन प्रश्नांची उत्तरे सरांनी आपल्या हयातीतच देऊन ठेवलीयत. त्यांची भरपुर ग्रंथसंपदा, हज्जारोंनी प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख, शेकडोंनी दिलेली व्याख्यानं यामधून सर आपल्याला भेटत राहणार, अलौकिक मार्गदर्शन करीतच राहणार.


अंधारून अाल्यानंतर भक्तांना मार्ग दाखविण्याचं काम देवालाच करावं लागतं. आणि सर तर क्रीडाविश्वातील साक्षात देवच होते. भक्तांना वरदहस्त दिल्यानंतर देव अंतर्धानच पावत असतात.


देवाने दाखवलेल्या मार्गावर निरंतर वाटचाल करीत अंतिम ध्येयाच्या स्वर्गसुखाचा यशोसोपान गाठण्याची जबाबदारी मात्र भक्तांचीच असते.


नाशिकसारख्या पावन तिर्थक्षेत्री मला घडलेलं हे साक्षात देवदर्शन, देवाचा सहवास, प्रासादिक देववाणीचा अनुग्रह निदान या जन्मात तरी मी विसरू शकणार नाही... कधीही नाही.




भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व - भाग १

गुरूपौर्णिमा 

रविवार , दिनांक - ०९ जुलै  २०१७.

Image result for bhishmaraj bam

भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व...

दिनांक १३.५.२०१७ शनिवारचा दिवस. संध्याकाळी साडेसात- पावणे आठचा सुमार. एकदम भकास आणि कमालीचं उदास वातावरण. पिक अवर असुनही कोलाहल नव्हता पण शांततेने कहर केलेला. का कोणास ठाऊक पण काही तरी अशुभाच्या शंकेचं मनावर उगाच मळभ दाटून आलं होतं. आयुष्यातील आणखी एक दिवस रेटला गेला म्हणत, लोकलला लटकलेल्या टिपिकल मुंबईकरासारखा आपल्या वारुळात परतत होतो.


ऐन मे चा रसरशीत उकाडा. त्यातही आकाशाने नको तितकं काळवंडुन त्या उदासीत भर घातलेली. इतक्यात, काय होतंय ते कळायचा अवकाश.... अन् दाटून आलेला मेघाच्या धारा अचानक झरु लागल्या... तो मुंबईतला पहिला पाऊस.... खरं तर पहिला पाऊस म्हटलं तर अवर्णनिय आनंदाची बरसात असते. पण हा तसा नव्हता. तो बरसत नव्हता तर उगाच अश्रुंसारखा झरतांना दिसत होता.

सोबत विजांचं मुकरुदन घेऊन अवेळी आलेला हा अवकाळी होता. मनातल्या शंकेची खातरजमा करावी अन् खरंच कुठं काही घडलंय का ? ते पाहण्यासाठी सहजच खिशातील मोबाईलमध्ये डोकावून पाहिलं अन् एक तिक्ष्ण अोरखडा काळजात अगदी खोल रुतत गेला. सर्वश्री भिष्मराज बाम यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी होती. क्रिडारंगपटावरील एक महानायकाने एक्झिट घेतली होती.

Image result for bhishmaraj bam

कधी-कधी व्हाट्सेपी अन् फेसबुकांच्या आभासी जगातही वास्तवाला नको तेवढं अधोरेखीत करणाऱ्या बातम्या मिळून जातात. ही बातमीही इतरांसारखीच खोटी ठरू दे... अफवा ठरून सरांना दीर्घायुष्य लाभावे याकरीता खुप यत्न केले. पण व्यर्थ ... बातमी खरी होती. त्या निस्सिम ज्ञानयोगियाने आपल्या शेवटच्या श्वासाचीदेखील आहुती एका ज्ञानयज्ञातच अर्पण केली होती.

नाशकातील एका व्याख्यानात रंगुन गेले असतांनाच बामसरांच्या हृदयाने अनामिक ओढीने जगनियंत्या परब्रम्हात लिन होण्यासाठी धाव घेतली होती. सरांच्या लाडक्या संतवाणीतच सांगायचे झाल्यास "भेटी लागी जीवा" ने आसावलेल्या जिवाचा "शेवटचा दिस गोड" झाला होता. "अवघा रंग येक जाला" होता.

विमनस्क अवस्थेतच मी स्वतःला घाटकोपर स्टेशनवर उतरून घेतलं. काहीच सुचत नव्हतं. ज्या लोकलमधुन मी प्रवास केला तीच्यात काही तांत्रिक बिघाड होऊन तीच्यातुन मोठमोठ्या आवाजांसह ठिणग्या उडत होत्या. त्यातील उतारू अन् प्रवाशांनी स्टेशनवर एकच गोंधळ माजवला होता. तशातच ती लोकल प्लेटफाॅर्मवरच थांबून राहीली होती. हे सर्व पहायला, ऐकू यायला मी भानावर कुठे होतो ? क्रीडाविश्वाच्या देवासोबत झालेल्या एका दृष्टांताच्या फ्लॅशबॅकमध्ये कधीच हरवून गेलो होतो.

२०१३ मध्ये काही कामानिमित्त अौरंगाबाद पोलीस मधील रफिक शेख याचेसोबत नाशिकला जाणं झालं होतं. हुन्नरी आणि प्रयोगशील क्रिडाप्रशिक्षक असलेल्या विकास लाटे यांचेकडे मुक्काम होता. रविवार असल्याने विशेष काही काम नव्हतं म्हणून निवांत बसुन गप्पा चालल्या होत्या. इतक्यात लाटेसरांना एक फोन अाला. पलीकडील व्यक्ती कोणीतरी मोठ्या मानाची असामी असावी. कारण लाटेसरांच्या बोलण्यात एक खास अदब जाणवली.

मी मोठ्या उत्सुकतेने विचारलं कोण होतं? ते म्हणाले बाम सर. कोण बाम ? मी पुन्हा विचारलं. त्यांनी अगदी शांतपणे सांगितलं भीष्मराज बाम. मी अक्षरश: तीन ताड उडालो. क्क्काय ? ते बाम सर होते ? ते नाशिकमधे असतात ? ते तुमच्या परिचयाचे आहेत ? त्यांनी तुंम्हांला फोन केला होता ? मी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उत्तरादाखल लाटेसरांनी मला विचारलं तुम्ही ओळखता त्यांना ? अहो देवाला कोण ओळखणार नाही ? आता... देवाने आपल्याला ओळखावं असं काही त्यांच्यावर बंधन नसतं.

मी बामसरांबाबत विचार करु लागलो.... बामसरांनी क्रिडाक्षेत्रातील ज्या अतिविशेष कार्यासाठी आयुष्यातील जास्तीत जास्त आणि महत्वाचा कार्यकाळ वेचला ते म्हणजे क्रिडामानसशास्त्र. या क्षेत्रातील ते खुप मोठे अधिकारी पुरुष होते. या विषयातील त्यांच्या योगदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले होते.
Image result for bhishmaraj bam

माझ्या माहितीनुसार तर खेळाचेही मानसशास्त्र असते हि बाब निदान महाराष्ट्रात तरी कोणाला निश्चितच माहित नसावी. या विषयातील त्यांच्यामार्फत आयोजित प्रशिक्षण शिबिरे, चर्चासत्रे, व्याख्याने यांतील सकारात्मक उर्जेद्वारे विविध क्रिडाप्रकारातील अनेक खेळाडु राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच चमकत असतात. त्यांचे अनेक खेळाडू शिष्योत्तम तर जगज्जेते झालेले आहेत.

नेमबाजीवर सरांचं विशेष प्रेम असावं. कारण त्यांच्या शिष्यांमध्ये नेमबाजांची संख्या लक्षणिय आहे. प्रख्यात नेमबाज अंजली भागवत तर सरांची मानसकन्याच जणू. इतर शिष्योत्तमांमध्ये अनेक आॅलिंपिकपटू आहेत- तसेच अनेकवेळेचा विश्वविजेता असलेला बिलियर्डपटू गित सेठी, क्रिकेटमधील जागतिक स्तरावर नावाजलेला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा विक्रमवीरांची यादी पाहिली कि बामसरांच्या कार्याचा आवाका काय जबरदस्त होता ? त्यांची वाणी काय ताकदीची होती हे समजायला मोठी मदत होते.

सर स्वतः एक निष्णात क्रिडामानसशास्त्रज्ञ तर होतेच पण पूर्वायुष्यातील एक निष्णांत खेळाडु तसेच राज्यशासनामार्फत क्रिडाक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरीही होते. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानसन्मानांचे धनी असूनही त्यांची जीवनपद्धती अगदी साधीच होती. पण क्रिडाक्षेत्र हि त्यांची बादशाहत होती.

असा सारा सारा मी बामसरमय होऊन गेलेला असतांनाच लाटेसरांनी मला बामसरांना भेटायला आवडेल का? असं विचारलं. मी म्हणालो अहो त्याकरीता मी डोक्यावर चालत येईन. तयारच असल्याने लगोलग निघालो. थोड्याच वेळात काही गोष्टी विजेच्या वेगाने लक्षात आल्याने कारच्या एसीत देखील मला घाम फुटला. करु नये ती गोष्ट उत्साहाच्या भरात करुन बसलो होतो.

Image result for bhishmaraj bam


मुंबई पोलीस दलात कनिष्ठ पदावरील मी एक अंमलदार, अन् भेटायला निघालो होतो उत्तुंग पर्वतांनाही ज्यांच्यासमोर खुजं वाटावं अशा एका बुलंद व्यक्तीमत्वाला. काय तो आब न् काय तो दरारा ? हे सर्व कमी म्हणून कि काय... क्रीडाविश्वातलं त्यांचं आभाळाएवढं कार्य... त्यांच्या खेळ आणि खेळातील मानसशास्त्रावरील लेखांची केलेली पारायणं , त्यांच्या "मना सज्जना" आणि "विजेत्यांचे मानसशास्त्र" या ग्रंथांनी क्रिडाजगतावरच नाही तर सर्वसामान्य जनमानसावर गाजवलेले अधिराज्य पाहता, क्रिडाक्षितीजावरल्या लखलखत्या सूर्याला माझ्यासारख्यानं भेटायला जाणं म्हणजे अतिच झालं ना ?

Image result for bhishmaraj bam

माझ्यातल्या शिस्तबद्ध पोलीस अंमलदारासाठी दुसरा पेच होता तो म्हणजे बाम सर हे माझ्याच खात्यातील एक अतिवरिष्ठ, कमालीच्या कडक शिस्तीचे आणि नामांकित अधिकारी होते. त्यांना मी भेटणं हे कितपत योग्य होईल ? ते शिष्टाचारात बसेल का ? असे एक ना हजार प्रश्न मला छळु लागले.

ज्येष्ठ आय.पी.एस. अधिकारी असलेले बाम सर अपर पोलीस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त जरी झाले असले तरी सिंहाचा, एका वनराजाचा रुबाब कधीच कमी होत नाही. आणि सर तर साक्षात दिमाखदार नरकेसरीच होते.

या अजब विचारचरकात मी पिळला जात असतांनाच लाटेसर आणि रफिकने मला तंद्रीतुन जागं केलं. शक्तिपात झाल्यासारखा मी धडधडतं काळीज हातावर घेऊन गाडीतुन खाली उतरलो. त्या छोटेखानी बंगल्यातला प्रवेश अत्यंत सुखद होता. छान वास्तुला साध्याशा हिरवाईचा साज चढवून मस्त सजवलेला होता. त्यामुळे दडपण कमी होऊन मला थोडं सावरायला मोलाची मदत झाली. लाटेसर सवयीचे असल्याने त्यांनी पटापट सर्व खोल्यांमधुन डोकावून बाम सर कुठे बसलेत ते लगेच शोधून काढलं नी मला बोलवायला पुन्हा बाहेर आले. तोपर्यंत मी प्रवेशद्वारीच घुटमळलेला.

मला हाताला धरून लाटेसरांनी बाम सर बसले होते त्या ठिकाणी म्हणजे बंगल्याच्या एका बाजूस छोट्याशा बागेला बिलगून असलेल्या पडवीत नेलं. त्या ठिकाणची प्रसन्नता खरंच नजरेत भरण्यासारखी होती. पण माझं हृदय क्षमतेपेक्षाही जोरजोरात धडाडू लागलं. चेहरा खळाखळा धुतल्यासारखा घामेजला. पायातलं त्राण पूर्णपणे संपायला आलं होतं. अशा अवस्थेत मला बाम सरांसमोर उभं करुन लाटेसर कुठेतरी गायब झाले. बाम सरांच्यां त्या पहिल्याच दर्शनाने मात्र मन सुखाऊन गेलं. नाशिकची वारी सार्थक होऊन साक्षात देवदर्शन झालं होतं.
Image result for bhishmaraj bam

याची देही याची डोळा पुढ्यात शांत बसलेल्या बाम सरांना मी एकचित्त होऊन पहात होतो. मी शब्दशः निःशब्द. आकर्षक तेजपुंज गौरवर्ण अन् विशाल भालप्रदेश त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची, व्यक्तिमत्वाची ग्वाही देत होता. वयाची सत्तरी ओलांडली असली तरी चेहरा वयापेक्षा अनुभवानेच पोक्त झालेला. भेदक नजर. तरी डोळे मात्र अलौकिक मायेने भरलेले.

मस्त मर्दानी सौंदर्याचे धनी असलेल्या बाम सरांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन चारी खाने चित झालेला मी बराच वेळ त्यांच्याकडे पहातच राहिलो. इतक्यात सरांनी मंदसे स्मित करत मला व रफिकला त्यांच्या पुढ्यातल्या खुर्चीकडे निर्देश करुन बसायला सांगितले. त्या आवाजात पोलीस खात्याची करारी जरब तर होतीच पण एका खास अशी आपलेपणाची साधीशी झाकसुद्धा होती.

मी पट्कन भानावर येत चेस्ट सॅल्यूटद्वारे एक कडक सलाम ठोकला. परवलीच्या या कृतीमुळे हा आपलाच माणूस आहे हे सरांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. अत्यंत प्रेमाने त्यांनी माझ्याबद्दल विचारलं. पोलीसातील पोटा-पाण्याची नोकरी आणि माझ्या आवडीच्या गिर्यारोहणाच्या छंदाबाबत मी थोडक्यात सांगितले. आणी चाचरतच का होईना पण त्यांच्यासारख्या अवाढव्य व्यक्तिमत्त्वाच्या माणसाला भेटण्याची, मार्गदर्शन मिळवण्याची खुप ईच्छा असुनही इतकी वर्षे मी फक्त भीड आणि भितीपायी त्यांना भेटु शकलो नाही हे देखील सांगितले. धत्तेरेकी... असं बोलून ... आपण मराठी मंडळी "भिड ही भिकेची बहिण असते" हे फक्त वाक्प्रचार म्हणून वापरतो नाही का ? असा एक सणसणीत शेरा हाणला. मी चांगलाच खजिल झालो. अरे भल्या माणसा यामुळे तुझंच नुकसान झालं ना? माझा नंदीबैल झाला होता. हो म्हणण्याचंही धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. आणि तसंही सरांचं म्हणणं अगदी खरं होतं. केवळ पुढे होऊन विचारण्याचीही तसदी माझ्यतील भिडेमुळे न घेतल्याने मी अनेक संस्थांच्या मोठ्या गिर्यारोहण मोहिमांना मुकलो होतो. माझं हे नुकसान कधीही भरून येणारं नव्हतं.

पोलीस खात्यात असुनही मी गेल्या अनेक वर्षांपासुन सातत्याने गिर्यारोहण करतोय अशी रफिक आणि लाटेसरांनी माझी अोळख सांगितली. याचं मात्र त्यांनी खुपच कौतुक केलं. पण त्याचबरोबर पोलीस आणि गिर्यारोहण हे काॅम्बिनेशन त्यांना थोडं विचित्रही वाटलं. पट्कन म्हणाले आनंद, तु दोन्हीपैकी एक सोडुन दे. याचं कारण विचारताच म्हणाले "माझं खातं कसंय ते मला चांगलंच माहित आहे रे बाबा.".. बघ विचार कर म्हणाले. इतक्या कमी वेळेत जुळलेल्या स्नेहामुळे त्यांच्या बोलण्यातली खोच आणि माझ्या गिर्यारोहणाबद्धल त्यांना वाटत असणारे ममत्व अत्यंत भावस्पर्शी होते. इतक्या महान माणसाच्या मनात आपल्याबद्धल इतकी जागा आहे हे पाहून मी मात्र खुपच आनंदित झालो.

पाहुणचार म्हणून पुढयातील छोटेखानी टेबलावर पाण्याचे ग्लास आले. सरांनी आवाज दिल्याने पाठोपाठ उत्तम चवीच्या लाडवांची एक प्लेट आली. सरांनी स्वतः उचलून एक लाडू मला दिला. साक्षात देवाच्या हातून लाडू (महाप्रसाद) घेतांना मी शहारून गेलो होतो. आपणही घ्या ना म्हणताच सरांनी मी आत्ताच घेतलाय म्हणत छानशा कारंजाची सर उडावी असं मिश्किल हास्य करीत कोणी बघत तर नाही ना ? याची खात्री करुन एखाद्या लहान मुलासारखा तो लाडू झटकन उचलला अन् तोंडाला लावला देखील. त्यांच्यातील ती बालसुलभ निरागसता पाहून ही माणसं डोंगराएवढी मोठी कशी होतात ? याचं कारण उमगायला मोठी मदत झाली.

सर्वच क्रिडाप्रकारांशी सरांचा अगदी थेट नसला तरी क्रिडा आणि क्रिडामानसशास्त्र असा अगदी जीवा-शिवाचा बंध होता तो. गिर्यारोहण या आगळया छंदाविषयी तर सरांना विशेष आत्मियता दिसून आली. याला खास कारण असं कि सरांच्या चिरंजीवांना याची आवड होती आणि सर त्याच्याकडून यातील चालू घडामोडींची वेळोवेळी माहित घेत असत.

गिर्यारोहक आणि विशेषतः प्रस्तरारोहक यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याबाबत सर भरभरून बोलू लागले. व्यायामाचं सातत्य, सत्तत सैराट होऊ पाहणाऱ्या मन नावाच्या अवखळ वारुचा लगाम आवळुन त्याचा बंदोबस्त करणे, सर्वांगिण विकास आणि आत्मोन्नतीकरीता त्याला नेहमी प्रसन्न ठेवण्याकरीता प्रयत्नरत राहणे हे कसं आणि किती महत्वाचं आहे ? हे पटवून देण्याची पद्धत, आवाजातील चढ उतारांसह मनात अस्सं ठसलं की या देववाणीपुढे आणखी काही ऐकूच नये असंच वाटून गेलं.

अमोघ अमृतवाणीच्या वर्षावात न्हाऊन निघत असतांनाच रुचकर मेजवानीच्या घासात अचानक दाताखाली गारेचा खडा येऊन रसभंग व्हावा तसा आत्म्याचा परमात्म्याशी सुखसंवाद सुरू असतांनाच सरांचं भ्रमणध्वनीयंञ किणकिणलं.

काहीशा नाराजीनेच सरांनीही त्यात डोकावून पाहिलं आणि एक छानसं स्मित सरांच्या देखण्या चेहऱ्यावर तरळून गेलं. एक एसेमेस होता. तो पाहून सर चांगलेच आनंदित झाल्याचे दिसले. एखाद्या लहान मुलासारखा त्यांनी तो मला दाखवला. तो पाहताच मी अक्षरशः होश-हवास हरवून बसलो. सरांच्या देववाणीसम मार्गदर्शनाकरीता आभार मानणारा तो एसेमेस होता क्रिकेटच्या देवाचा... अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या तेंडुलकरांच्या सचिनचा. हे असे देवांचे देवांशी ऋणानुबंध असतात. या दोन देवांच्या मुकसंवादाचा साक्षीदार होण्याचं परमभाग्य मात्र मला लाभलं होतं.



Image result for bhishmaraj bam


क्रमशः