भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व - भाग १

गुरूपौर्णिमा 

रविवार , दिनांक - ०९ जुलै  २०१७.

Image result for bhishmaraj bam

भिष्मराज बाम... एक देवतुल्य व्यक्तिमत्त्व...

दिनांक १३.५.२०१७ शनिवारचा दिवस. संध्याकाळी साडेसात- पावणे आठचा सुमार. एकदम भकास आणि कमालीचं उदास वातावरण. पिक अवर असुनही कोलाहल नव्हता पण शांततेने कहर केलेला. का कोणास ठाऊक पण काही तरी अशुभाच्या शंकेचं मनावर उगाच मळभ दाटून आलं होतं. आयुष्यातील आणखी एक दिवस रेटला गेला म्हणत, लोकलला लटकलेल्या टिपिकल मुंबईकरासारखा आपल्या वारुळात परतत होतो.


ऐन मे चा रसरशीत उकाडा. त्यातही आकाशाने नको तितकं काळवंडुन त्या उदासीत भर घातलेली. इतक्यात, काय होतंय ते कळायचा अवकाश.... अन् दाटून आलेला मेघाच्या धारा अचानक झरु लागल्या... तो मुंबईतला पहिला पाऊस.... खरं तर पहिला पाऊस म्हटलं तर अवर्णनिय आनंदाची बरसात असते. पण हा तसा नव्हता. तो बरसत नव्हता तर उगाच अश्रुंसारखा झरतांना दिसत होता.

सोबत विजांचं मुकरुदन घेऊन अवेळी आलेला हा अवकाळी होता. मनातल्या शंकेची खातरजमा करावी अन् खरंच कुठं काही घडलंय का ? ते पाहण्यासाठी सहजच खिशातील मोबाईलमध्ये डोकावून पाहिलं अन् एक तिक्ष्ण अोरखडा काळजात अगदी खोल रुतत गेला. सर्वश्री भिष्मराज बाम यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी होती. क्रिडारंगपटावरील एक महानायकाने एक्झिट घेतली होती.

Image result for bhishmaraj bam

कधी-कधी व्हाट्सेपी अन् फेसबुकांच्या आभासी जगातही वास्तवाला नको तेवढं अधोरेखीत करणाऱ्या बातम्या मिळून जातात. ही बातमीही इतरांसारखीच खोटी ठरू दे... अफवा ठरून सरांना दीर्घायुष्य लाभावे याकरीता खुप यत्न केले. पण व्यर्थ ... बातमी खरी होती. त्या निस्सिम ज्ञानयोगियाने आपल्या शेवटच्या श्वासाचीदेखील आहुती एका ज्ञानयज्ञातच अर्पण केली होती.

नाशकातील एका व्याख्यानात रंगुन गेले असतांनाच बामसरांच्या हृदयाने अनामिक ओढीने जगनियंत्या परब्रम्हात लिन होण्यासाठी धाव घेतली होती. सरांच्या लाडक्या संतवाणीतच सांगायचे झाल्यास "भेटी लागी जीवा" ने आसावलेल्या जिवाचा "शेवटचा दिस गोड" झाला होता. "अवघा रंग येक जाला" होता.

विमनस्क अवस्थेतच मी स्वतःला घाटकोपर स्टेशनवर उतरून घेतलं. काहीच सुचत नव्हतं. ज्या लोकलमधुन मी प्रवास केला तीच्यात काही तांत्रिक बिघाड होऊन तीच्यातुन मोठमोठ्या आवाजांसह ठिणग्या उडत होत्या. त्यातील उतारू अन् प्रवाशांनी स्टेशनवर एकच गोंधळ माजवला होता. तशातच ती लोकल प्लेटफाॅर्मवरच थांबून राहीली होती. हे सर्व पहायला, ऐकू यायला मी भानावर कुठे होतो ? क्रीडाविश्वाच्या देवासोबत झालेल्या एका दृष्टांताच्या फ्लॅशबॅकमध्ये कधीच हरवून गेलो होतो.

२०१३ मध्ये काही कामानिमित्त अौरंगाबाद पोलीस मधील रफिक शेख याचेसोबत नाशिकला जाणं झालं होतं. हुन्नरी आणि प्रयोगशील क्रिडाप्रशिक्षक असलेल्या विकास लाटे यांचेकडे मुक्काम होता. रविवार असल्याने विशेष काही काम नव्हतं म्हणून निवांत बसुन गप्पा चालल्या होत्या. इतक्यात लाटेसरांना एक फोन अाला. पलीकडील व्यक्ती कोणीतरी मोठ्या मानाची असामी असावी. कारण लाटेसरांच्या बोलण्यात एक खास अदब जाणवली.

मी मोठ्या उत्सुकतेने विचारलं कोण होतं? ते म्हणाले बाम सर. कोण बाम ? मी पुन्हा विचारलं. त्यांनी अगदी शांतपणे सांगितलं भीष्मराज बाम. मी अक्षरश: तीन ताड उडालो. क्क्काय ? ते बाम सर होते ? ते नाशिकमधे असतात ? ते तुमच्या परिचयाचे आहेत ? त्यांनी तुंम्हांला फोन केला होता ? मी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. उत्तरादाखल लाटेसरांनी मला विचारलं तुम्ही ओळखता त्यांना ? अहो देवाला कोण ओळखणार नाही ? आता... देवाने आपल्याला ओळखावं असं काही त्यांच्यावर बंधन नसतं.

मी बामसरांबाबत विचार करु लागलो.... बामसरांनी क्रिडाक्षेत्रातील ज्या अतिविशेष कार्यासाठी आयुष्यातील जास्तीत जास्त आणि महत्वाचा कार्यकाळ वेचला ते म्हणजे क्रिडामानसशास्त्र. या क्षेत्रातील ते खुप मोठे अधिकारी पुरुष होते. या विषयातील त्यांच्या योगदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले होते.
Image result for bhishmaraj bam

माझ्या माहितीनुसार तर खेळाचेही मानसशास्त्र असते हि बाब निदान महाराष्ट्रात तरी कोणाला निश्चितच माहित नसावी. या विषयातील त्यांच्यामार्फत आयोजित प्रशिक्षण शिबिरे, चर्चासत्रे, व्याख्याने यांतील सकारात्मक उर्जेद्वारे विविध क्रिडाप्रकारातील अनेक खेळाडु राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच चमकत असतात. त्यांचे अनेक खेळाडू शिष्योत्तम तर जगज्जेते झालेले आहेत.

नेमबाजीवर सरांचं विशेष प्रेम असावं. कारण त्यांच्या शिष्यांमध्ये नेमबाजांची संख्या लक्षणिय आहे. प्रख्यात नेमबाज अंजली भागवत तर सरांची मानसकन्याच जणू. इतर शिष्योत्तमांमध्ये अनेक आॅलिंपिकपटू आहेत- तसेच अनेकवेळेचा विश्वविजेता असलेला बिलियर्डपटू गित सेठी, क्रिकेटमधील जागतिक स्तरावर नावाजलेला सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड अशा विक्रमवीरांची यादी पाहिली कि बामसरांच्या कार्याचा आवाका काय जबरदस्त होता ? त्यांची वाणी काय ताकदीची होती हे समजायला मोठी मदत होते.

सर स्वतः एक निष्णात क्रिडामानसशास्त्रज्ञ तर होतेच पण पूर्वायुष्यातील एक निष्णांत खेळाडु तसेच राज्यशासनामार्फत क्रिडाक्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरीही होते. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानसन्मानांचे धनी असूनही त्यांची जीवनपद्धती अगदी साधीच होती. पण क्रिडाक्षेत्र हि त्यांची बादशाहत होती.

असा सारा सारा मी बामसरमय होऊन गेलेला असतांनाच लाटेसरांनी मला बामसरांना भेटायला आवडेल का? असं विचारलं. मी म्हणालो अहो त्याकरीता मी डोक्यावर चालत येईन. तयारच असल्याने लगोलग निघालो. थोड्याच वेळात काही गोष्टी विजेच्या वेगाने लक्षात आल्याने कारच्या एसीत देखील मला घाम फुटला. करु नये ती गोष्ट उत्साहाच्या भरात करुन बसलो होतो.

Image result for bhishmaraj bam


मुंबई पोलीस दलात कनिष्ठ पदावरील मी एक अंमलदार, अन् भेटायला निघालो होतो उत्तुंग पर्वतांनाही ज्यांच्यासमोर खुजं वाटावं अशा एका बुलंद व्यक्तीमत्वाला. काय तो आब न् काय तो दरारा ? हे सर्व कमी म्हणून कि काय... क्रीडाविश्वातलं त्यांचं आभाळाएवढं कार्य... त्यांच्या खेळ आणि खेळातील मानसशास्त्रावरील लेखांची केलेली पारायणं , त्यांच्या "मना सज्जना" आणि "विजेत्यांचे मानसशास्त्र" या ग्रंथांनी क्रिडाजगतावरच नाही तर सर्वसामान्य जनमानसावर गाजवलेले अधिराज्य पाहता, क्रिडाक्षितीजावरल्या लखलखत्या सूर्याला माझ्यासारख्यानं भेटायला जाणं म्हणजे अतिच झालं ना ?

Image result for bhishmaraj bam

माझ्यातल्या शिस्तबद्ध पोलीस अंमलदारासाठी दुसरा पेच होता तो म्हणजे बाम सर हे माझ्याच खात्यातील एक अतिवरिष्ठ, कमालीच्या कडक शिस्तीचे आणि नामांकित अधिकारी होते. त्यांना मी भेटणं हे कितपत योग्य होईल ? ते शिष्टाचारात बसेल का ? असे एक ना हजार प्रश्न मला छळु लागले.

ज्येष्ठ आय.पी.एस. अधिकारी असलेले बाम सर अपर पोलीस महासंचालक म्हणून सेवानिवृत्त जरी झाले असले तरी सिंहाचा, एका वनराजाचा रुबाब कधीच कमी होत नाही. आणि सर तर साक्षात दिमाखदार नरकेसरीच होते.

या अजब विचारचरकात मी पिळला जात असतांनाच लाटेसर आणि रफिकने मला तंद्रीतुन जागं केलं. शक्तिपात झाल्यासारखा मी धडधडतं काळीज हातावर घेऊन गाडीतुन खाली उतरलो. त्या छोटेखानी बंगल्यातला प्रवेश अत्यंत सुखद होता. छान वास्तुला साध्याशा हिरवाईचा साज चढवून मस्त सजवलेला होता. त्यामुळे दडपण कमी होऊन मला थोडं सावरायला मोलाची मदत झाली. लाटेसर सवयीचे असल्याने त्यांनी पटापट सर्व खोल्यांमधुन डोकावून बाम सर कुठे बसलेत ते लगेच शोधून काढलं नी मला बोलवायला पुन्हा बाहेर आले. तोपर्यंत मी प्रवेशद्वारीच घुटमळलेला.

मला हाताला धरून लाटेसरांनी बाम सर बसले होते त्या ठिकाणी म्हणजे बंगल्याच्या एका बाजूस छोट्याशा बागेला बिलगून असलेल्या पडवीत नेलं. त्या ठिकाणची प्रसन्नता खरंच नजरेत भरण्यासारखी होती. पण माझं हृदय क्षमतेपेक्षाही जोरजोरात धडाडू लागलं. चेहरा खळाखळा धुतल्यासारखा घामेजला. पायातलं त्राण पूर्णपणे संपायला आलं होतं. अशा अवस्थेत मला बाम सरांसमोर उभं करुन लाटेसर कुठेतरी गायब झाले. बाम सरांच्यां त्या पहिल्याच दर्शनाने मात्र मन सुखाऊन गेलं. नाशिकची वारी सार्थक होऊन साक्षात देवदर्शन झालं होतं.
Image result for bhishmaraj bam

याची देही याची डोळा पुढ्यात शांत बसलेल्या बाम सरांना मी एकचित्त होऊन पहात होतो. मी शब्दशः निःशब्द. आकर्षक तेजपुंज गौरवर्ण अन् विशाल भालप्रदेश त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची, व्यक्तिमत्वाची ग्वाही देत होता. वयाची सत्तरी ओलांडली असली तरी चेहरा वयापेक्षा अनुभवानेच पोक्त झालेला. भेदक नजर. तरी डोळे मात्र अलौकिक मायेने भरलेले.

मस्त मर्दानी सौंदर्याचे धनी असलेल्या बाम सरांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन चारी खाने चित झालेला मी बराच वेळ त्यांच्याकडे पहातच राहिलो. इतक्यात सरांनी मंदसे स्मित करत मला व रफिकला त्यांच्या पुढ्यातल्या खुर्चीकडे निर्देश करुन बसायला सांगितले. त्या आवाजात पोलीस खात्याची करारी जरब तर होतीच पण एका खास अशी आपलेपणाची साधीशी झाकसुद्धा होती.

मी पट्कन भानावर येत चेस्ट सॅल्यूटद्वारे एक कडक सलाम ठोकला. परवलीच्या या कृतीमुळे हा आपलाच माणूस आहे हे सरांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. अत्यंत प्रेमाने त्यांनी माझ्याबद्दल विचारलं. पोलीसातील पोटा-पाण्याची नोकरी आणि माझ्या आवडीच्या गिर्यारोहणाच्या छंदाबाबत मी थोडक्यात सांगितले. आणी चाचरतच का होईना पण त्यांच्यासारख्या अवाढव्य व्यक्तिमत्त्वाच्या माणसाला भेटण्याची, मार्गदर्शन मिळवण्याची खुप ईच्छा असुनही इतकी वर्षे मी फक्त भीड आणि भितीपायी त्यांना भेटु शकलो नाही हे देखील सांगितले. धत्तेरेकी... असं बोलून ... आपण मराठी मंडळी "भिड ही भिकेची बहिण असते" हे फक्त वाक्प्रचार म्हणून वापरतो नाही का ? असा एक सणसणीत शेरा हाणला. मी चांगलाच खजिल झालो. अरे भल्या माणसा यामुळे तुझंच नुकसान झालं ना? माझा नंदीबैल झाला होता. हो म्हणण्याचंही धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. आणि तसंही सरांचं म्हणणं अगदी खरं होतं. केवळ पुढे होऊन विचारण्याचीही तसदी माझ्यतील भिडेमुळे न घेतल्याने मी अनेक संस्थांच्या मोठ्या गिर्यारोहण मोहिमांना मुकलो होतो. माझं हे नुकसान कधीही भरून येणारं नव्हतं.

पोलीस खात्यात असुनही मी गेल्या अनेक वर्षांपासुन सातत्याने गिर्यारोहण करतोय अशी रफिक आणि लाटेसरांनी माझी अोळख सांगितली. याचं मात्र त्यांनी खुपच कौतुक केलं. पण त्याचबरोबर पोलीस आणि गिर्यारोहण हे काॅम्बिनेशन त्यांना थोडं विचित्रही वाटलं. पट्कन म्हणाले आनंद, तु दोन्हीपैकी एक सोडुन दे. याचं कारण विचारताच म्हणाले "माझं खातं कसंय ते मला चांगलंच माहित आहे रे बाबा.".. बघ विचार कर म्हणाले. इतक्या कमी वेळेत जुळलेल्या स्नेहामुळे त्यांच्या बोलण्यातली खोच आणि माझ्या गिर्यारोहणाबद्धल त्यांना वाटत असणारे ममत्व अत्यंत भावस्पर्शी होते. इतक्या महान माणसाच्या मनात आपल्याबद्धल इतकी जागा आहे हे पाहून मी मात्र खुपच आनंदित झालो.

पाहुणचार म्हणून पुढयातील छोटेखानी टेबलावर पाण्याचे ग्लास आले. सरांनी आवाज दिल्याने पाठोपाठ उत्तम चवीच्या लाडवांची एक प्लेट आली. सरांनी स्वतः उचलून एक लाडू मला दिला. साक्षात देवाच्या हातून लाडू (महाप्रसाद) घेतांना मी शहारून गेलो होतो. आपणही घ्या ना म्हणताच सरांनी मी आत्ताच घेतलाय म्हणत छानशा कारंजाची सर उडावी असं मिश्किल हास्य करीत कोणी बघत तर नाही ना ? याची खात्री करुन एखाद्या लहान मुलासारखा तो लाडू झटकन उचलला अन् तोंडाला लावला देखील. त्यांच्यातील ती बालसुलभ निरागसता पाहून ही माणसं डोंगराएवढी मोठी कशी होतात ? याचं कारण उमगायला मोठी मदत झाली.

सर्वच क्रिडाप्रकारांशी सरांचा अगदी थेट नसला तरी क्रिडा आणि क्रिडामानसशास्त्र असा अगदी जीवा-शिवाचा बंध होता तो. गिर्यारोहण या आगळया छंदाविषयी तर सरांना विशेष आत्मियता दिसून आली. याला खास कारण असं कि सरांच्या चिरंजीवांना याची आवड होती आणि सर त्याच्याकडून यातील चालू घडामोडींची वेळोवेळी माहित घेत असत.

गिर्यारोहक आणि विशेषतः प्रस्तरारोहक यांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य याबाबत सर भरभरून बोलू लागले. व्यायामाचं सातत्य, सत्तत सैराट होऊ पाहणाऱ्या मन नावाच्या अवखळ वारुचा लगाम आवळुन त्याचा बंदोबस्त करणे, सर्वांगिण विकास आणि आत्मोन्नतीकरीता त्याला नेहमी प्रसन्न ठेवण्याकरीता प्रयत्नरत राहणे हे कसं आणि किती महत्वाचं आहे ? हे पटवून देण्याची पद्धत, आवाजातील चढ उतारांसह मनात अस्सं ठसलं की या देववाणीपुढे आणखी काही ऐकूच नये असंच वाटून गेलं.

अमोघ अमृतवाणीच्या वर्षावात न्हाऊन निघत असतांनाच रुचकर मेजवानीच्या घासात अचानक दाताखाली गारेचा खडा येऊन रसभंग व्हावा तसा आत्म्याचा परमात्म्याशी सुखसंवाद सुरू असतांनाच सरांचं भ्रमणध्वनीयंञ किणकिणलं.

काहीशा नाराजीनेच सरांनीही त्यात डोकावून पाहिलं आणि एक छानसं स्मित सरांच्या देखण्या चेहऱ्यावर तरळून गेलं. एक एसेमेस होता. तो पाहून सर चांगलेच आनंदित झाल्याचे दिसले. एखाद्या लहान मुलासारखा त्यांनी तो मला दाखवला. तो पाहताच मी अक्षरशः होश-हवास हरवून बसलो. सरांच्या देववाणीसम मार्गदर्शनाकरीता आभार मानणारा तो एसेमेस होता क्रिकेटच्या देवाचा... अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या तेंडुलकरांच्या सचिनचा. हे असे देवांचे देवांशी ऋणानुबंध असतात. या दोन देवांच्या मुकसंवादाचा साक्षीदार होण्याचं परमभाग्य मात्र मला लाभलं होतं.



Image result for bhishmaraj bam


क्रमशः





9 comments:

  1. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वश्री बामसरांच्या पावन स्मृतींस विनम्र अभिवादन...

    ReplyDelete
  2. Replies
    1. धन्यवाद डाॅ. साहेब...

      Delete
    2. धन्यवाद आपन बाम सरांबद्दल माहीती दिली

      Delete
  3. आनंद, काही वर्षांपूर्वी बाम सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ तमाम महाराष्ट्रातील गिर्यारोहकांना गिरिमित्र संमेलनात झाला होता. त्याचा मीही एक लाभार्थी असण्याचे भाग्य मला लाभले, याचा अभिमान व आनंद वाटतो.

    ReplyDelete
    Replies
    1. छान प्रतिक्रियेकरीता धन्यवाद सर

      Delete
  4. बामसरांच्या केवळ दर्शनानेही प्रफुल्लित वाटायचं आणि त्यांचं मार्गदर्शन तर जबरदस्तच असायचं...असं व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाहीये याची मोठी खंत वाटते.

    ReplyDelete
  5. Nice lekh anand
    Tuzya lekhamuke Khup chhan Mahiti milali

    ReplyDelete
  6. धन्यवाद प्रवीण... अशा महान व्यक्तीसोबत मला काहि काळ घालवता आला हि माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती.

    ReplyDelete