मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व अंतिम भाग ४

राजमाता  जिजाऊसाहेब  पुण्यस्मरण.  

रविवार , दिनांक - १८  जून  २०१७.



मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : अंतिम  भाग  ४ 





निर्णायकी झुंज सुरू....






त्या घनघोर आरोहणाच्या पहिल्या तासाभरातच आंम्हांला कळले की आम्ही काय पेलायला निघालो आहोत ? ... तेथील एकंदर परिस्थिती पाहून माघारीचा एक विचार देखील डोक्यांत काहूर माजवू लागला होता... पण आता माघार नाही... आणि का घ्यायची माघार?... भ्यायचे कुणाला?... ज्या शिखराचे नामकरण स्वा. सावरकरांच्या नांवाने होणार आहे त्याला?... छे... छे....ते शक्य नाही... मान उंचावून, एक दिर्घ श्वास घेऊन त्या शिखरराजाचे दर्शन घेतले. मनोमन स्वा. सावरकरांचे, त्यांच्या साहसी कारनाम्यांचे स्मरण केले... शरीराच्या अणूरेणूंना आदेश दिले गेले आणि सुरू झाला एक झुंझार रणसंग्राम....






हे कसलंही युध्द नव्हतं की स्पर्धा.... हे एकप्रकारचं द्वंद्व होतं... स्वतःचं स्वतःशी... इथं कोणी जेता वा पराजित होणार नव्हता... आणि गिर्यारोहण म्हणजे तरी काय हो ?... डोंगरावर चढून... मी चढलो...मी चढलो असा डिंडीम बडवणे ?... मी जेता... मी विजेता असा डांगोरा पिटणे ?.... नाही.... मी तर म्हणेन, अद्भूत निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याचा, निसर्गाला अधिकाधिक जवळून अनुभवण्याचा, त्याला आपल्या कवेत घेऊन गुजगोष्टी करण्याचा तो एक सर्वात शिस्तबध्द आणि सोपा मार्ग आहे.



इथं आपला प्रतिस्पर्धी जरी निसर्ग आहे. त्याला आपण जिंकू शकतच नाही... पण त्यालाही जिंकता येतं ते त्याच्या जवळ जाऊन, भरभरून त्यसच्यावर आभाळाएवढं प्रेम करून. अनादि काळापासून त्यानं आपल्याला फक्त दिलंय आणि आपण? त्याला ओरबाडण्याशिवाय काहीही केलेलं नाहीये.


अपरिमित श्रमाला पर्याय नाही...


आरोहणाच्या खडतर वाटेवर आता सुमारे ६ तास उलटून गेले होते.... काहीही दृष्टीपथात येत नव्हते.... छातीचा भाता आता फुटायला आला होता... या चढाईत फक्त दगड.. दगड आणि दगड... फरक एवढाच काही छोटे काही भले मोठे.... काहींचे बूड तळातील बर्फात घटट् रोवलेले तर काही उथळ... थोडयाशा सूर्यप्रकाशाच्या उबेने देखील बूड सोडून खाली झोकून द्यायला आणि वाटेतल्यांचा कपाळमोक्ष करायला सदैव तयार... या सर्व वेगवान धबडग्यात राहूलच्या छायाचित्रणाच्या आवडीचं आणि कौशल्याचाही कस लागत होता. प्रस्तरारोहण म्हणजे जीव की प्राण असलेला मी देखील चांगलाच एग्झाॅस्ट झालो होतो. कित्तीही थकलो असलो तरी... नो वरी... आमची ध्यासमुर्ती आमच्या समक्ष होती.


दुपारचे १२ वाजून गेले होते. तापमान अद्यापही शून्याच्या आसपास असावं... त्यामुळे आमच्या कॅमलबॅगमधील पाण्याचा संपूर्ण साठा गोठल्याने साधं पाणी देखील आता खूप महागलं होतं. क्षणभर थांबून सॅकमधील काही तरी तोंडात टाकावं म्हटलं तरी तेही शक्य नव्हतं. त्या अस्थिर दगडराशींतून सर्व जामानिमा आणि तोल सांभाळत असतांना अनवधानाने जरी एखादा दगडोबा सुटला तर जो काही कहर होईल त्याची कल्पना न केलेलीच बरी... आयुष्याचा तोल जाणे.... पाय घसरणे.... म्हणजे नेमके काय याचा, याची देही याची डोळा अनुभव घेत होतो. सुमारे दोन हजार फुट उंचीवरून खालच्या दरीतील दृष्य पाहणे नकोसे होत होते. एवढ्यात एक कलिंगडाएवढा दगड सुटावून दरीत झेपावलाच. त्याच्या पडण्याचा आवाज कित्तीतरी वेळ येत होता. सारं खोरं दुमदुमलं.



हिंमतीची परीक्षा अजून चालूच होती... पुढील तासाभरात अचानक प्रस्तरखंडांमधील तो जीवघेणा चढ संपून क्षितीजावर काही हवंहवंसं दिसू लागलं... थकलेल्या गात्रांनीही वेग घेतला... इप्सीत जवळ येवू लागलं.... तसं रात्रीपासून रूसलेल्या हवामानानेही साथ द्यायला सुरूवात केली.... आणि मग कळलं की, आजूबाजूची धुक्यात डोकं खुपसून बसलेली शिखरं आमच्या हालचालींकडे निरखून पहात होती... पश्चिमेकडील विख्यात बडा शिगरी हिमनदीवरील नामांकित शिखरांपैकी सेंट्रल, टायगर टूथ, पापसूरा, धर्मसूरा आणि इतर अनेक पर्वतशिखरांनी आमच्यावर रोख धरला होता... अंतिम टप्प्यातील चढाई सुरू असतांनाच उत्तर पूर्वेला, अगदी शेजारीच एक शिखर तर आनंदाने टाळया पिटण्याच्याच तयारीत दिसून आलं... इतक्यात तो क्षण जवळ आला आणि अघटीतच घडलं... आमचा दोर संपला... पण काही झालं तरी आता माघार नाही... आता आम्ही देखील चांगलेच पेटलो होतो...



आणि मेहनत सफल झाली.....

हीच वेळ होती... आमच्या साहसी कौशल्याच्या प्रदर्शनाची... इतक्या वर्षात कमावलेल्या अनुभवाच्या आजमावण्याची... शेवटचे सुमारे २०० फुटांचे अंतर एकावेळी एकच जण चालू शकेल अशा त्या चिंचोळया, धारेवरील सैलसर चपटया दगडी चिपांवरून तोल सावरत... थकल्या-भागल्या शरीराने चालायचं होतं... आमचा बंगाली सहोदर दिलीप साहू थोडासा गोंधळला... त्याला देवेंद्र आणि मी आमच्या दोघांच्या मध्ये घेऊन ती धार आक्रमण्यास घेतली... गेली ७ तास सोबत करणारी ती विशाल प्रस्तरधार बर्फाळ शिखरमाथ्याच्या कुशीत अचानक बेमालूमपणे लुप्त झाली होती.... सरतेशेवटी तीच्याच सोबतीने दुपारी १ वाजून १० मिनिटांनी देवेंद्र गंद्रे, राहुल दंडवते, दिलीप साहू, संदीप शेट्टी, प्यारेलाल चाचा, नामग्याल नेगी, अमर नेगी, प्रविण, अशोक आणि मी अशा दहा जणांनी शिखरमाथ्यावर पोहोचण्याचा सुलतानढवा केला .... या साहसाची पूर्तता करू दिल्याबद्दल त्या आजवर अजिंक्य, अनामिक अशा शिखरमाथ्याला सामूहिक साष्टांग दंडवतच घातला गेला.



अशा वेळी डोळयांनी शांत रहायचं नसतं. त्यांनी दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि उष्ण अश्रुधारांनी माथ्यावरील त्या मऊशार, शुभ्र बर्फावर रांगोळी काढायला सुरूवात केली... स्वा. सावरकरांच्या मार्गदर्शक विचारांची द्वाही जगभर फिरविण्याकरीता हा साहसरथ आता हिमशिखरांवरूनही दौडू लागला होता... लवकरच तो पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूवरही जाऊन पोहोचला तर नवल वाटायला नको.



लहरी वातावरणावर विसंबून चालणार नव्हते... फटाफट कॅमेरे चमकू लागले... शिखरमाथ्याला विधीवत श्रीफळ अर्पण केले गेलेेे आणि विविध ध्वज त्या अकलंक, अनाघ्रात शिखरमाथ्यावर सन्मानाने फडकू लागले.... स्वा. सावरकर संकल्पीत मादाम कामांचा पहिला भारतीय ध्वज, प्राचीन वैभवशाली हिंदुत्व आणि शिवरायांचा भगवा.... जनसामान्यांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या महारा़ष्ट्र पोलीसांचा निळा ध्वज, त्याचबरोबर देशाच्या अस्मितेचा मानबिंदू राष्ट्रध्वज तिरंगा.... सन्मानाने फडकवण्यात आले... हाकेच्या अंतरावरील भव्य असा मा. कर्चा पर्वत, मा. चेमा आणि परिसरातील इतर शिखरेही आमच्या जल्लोषात सामील झाली होती. शिखर सावरकर असं उंची नामाभिधान प्राप्त होणार या आनंदात अनादी काळापासून अनामिक राहिलेला तो शिखरपुरूष देखील नक्कीच गहिवरला असेल.


अत्यंत आनंदाच्या या क्षणी देखील काही विचार मनात उगाच डोकावू लागले... आजची तरूण पिढी आणि साहस यांच्यातील दुरावत चाललेलं अंतर... तरूण हा साहसी असलाच पाहिजे ... आजच्या तरूणांच्या साहसाची परिभाषा मात्र खूप वेगळी आणि नकारात्मक असल्याचे जाणवते... व्यसनांमध्ये थ्रिल शोधणा ऱ्या या माॅडर्न जनरेशनची मात्र किव येते.... गिर्यारोहणच केले पाहिजे असे काही नाही... तरूणाईची रग आणि रेटा प्रचंड असतो, ताकतीचा महापूर असतो... पण ती खरंच चांगल्या, विधायक कामांसाठी वापरली जाते का? हा प्रश्न मोठा आहे... गिर्यारोहण म्हणजे काय? हे ध्यानात न घेता, केलेल्या, घडलेल्या किरकोळ चुकांमुळे होणारे अपघात, होणारी जिवीत हानी .... याला जबाबदार कोण? गिर्यारोहण हे डोंगरात करायचं असलं तरी याला शिकारीचा एक साधा नियम तंतोतंत लागू होतो... ”सशाच्या शिकारीला वाघाची तयारी“ या संकेताचं तंतोतंत पालन व्हायला हवं.... शासन दरबारी देखील गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांची सतत उपेक्षाच केली जाते.... आता तर दहिहंडीला खेळाचा दर्जा द्यायचा विचार सुरू आहे म्हणे... आनंदी आनंद आहे... आपण मात्र चांगलं तेवढं घ्यावं आणि मस्त डोंगरात फिरून यावं.


शिखरमाथ्यावर बसून, साऱ्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव आणि मागील ४-६ महिन्यांच्या खडतर सरावाची, अथक तयारीची मेहनत आज फलद्रुप होतांना पाहणे खूपच आनंददायी होते. मोहीम जाहिर झाल्यापासून जीवा-सखा सहयाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुंब्रा, माहुली आणि नाणेघाटात सरावाकरीता मारलेल्या फेऱ्या.. अनेक हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थना, त्यांचे आशिर्वाद, कुटूंबियांना वाटणारी काळजी.... मोहिमेत १२ ते १५ किलो वजनासह रोज ८ ते १० तासांची प्राण कंठाशी आणणारी अतिउंचीवरील भटकंती, सहायक सहकाऱ्यांचे अपरिमित कष्ट हे सारं... सारं... डोळयासमोर चलचित्रपटासारखं दिसू लागलं.... त्याचवेळी तिन्ही सांजेला, घरटयाची ओढ लागलेल्या पक्ष्यासारखी आमची स्थिती झाली होती.


शिखरमाथ्याला पुन्हा एकदा वंदन करून माघारी फिरत असतांनाच अचानक क्षणभरच का होईना हिमपुष्पांचा वर्षाव झाला. या वृष्टीमुळे, आमच्या या दुर्दम्य साहसाला साक्षात स्वा. सावरकरांनीच शुभास्ते पंथानः असा आशिर्वाद दिल्याचा भास झाला... आणि ”ने मजसी ने....परत मातृभुमीला“ या ओळींतून महाकवींनी अनुभवलेल्या आर्ततेच्या नादातच आम्ही परतीच्या दिशेने मार्गस्थ झालो....



                                                                                                                                                                                                             धन्यवाद ---- 



मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व :- भाग ३

राजमाता  जिजाऊसाहेब  पुण्यस्मरण  

रविवार , दिनांक - १८  जून  २०१७

मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : भाग ३



शिखर सावरकर दर्शन.... आणि शिबीर क्र. १ ची उभारणी ....

तळशिबिर उभारण्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ आॅगस्टला आंम्हांला धीर धरवला नाही. नियोजित शिखर सावरकर दर्शनार्थ आम्ही लगेच सरसावलो. तळशिबिरावरून आरोहण आयुधे आणि आवश्यक खाद्यसामुग्री पाठीवर लादून आम्ही प्रचंड उत्सुकतेने पहिल्या लोडफेरीकरीता कूच केले. 


लोडफेरी म्हणजे मोहिमेच्या पुढील वाटचालीकरीता आवश्यक शिधा व साधन-सामुग्रीची मोहिमसदस्यांकडून होणारी वाहतूक. अतिउंची आणि तेथील प्रतिकूल हवामान यांच्याशी एकरूप होण्याकरीता ही एक आवश्यक प्रक्रियादेखील मानली जाते. या पहिल्याच लोडफेरीदरम्यान कर्चा पर्वतकडून येणाऱ्या नाल्याच्या सोबतीने सुमारे तासभर चालल्यानंतर तो नाला दोन भागांत विभागला गेला. त्याचे डावा आणि उजवा असे दोन भाग झाले. ही विभागणी केली होती एका महाप्रचंड शिखरधारेने. या दोन नाल्यांना विभागून त्या घोंघावत्या प्रवाहात पाय सोडुन ती मस्तपणे पहुडली होती. आणि याच शिखरधारेचे उत्तरेकडील टोक म्हणजे आमचे नियोजित ”शिखर सावरकर“. 





समोरील डाव्या नाल्याशी आता आंम्हांला काही देणेघेणे उरले नव्हते. त्यामुळे उजव्या नाल्याच्या उजव्या तीराने आम्ही हळू-हळू एक वेगळीच उंची गाठत पुढे निघालो. त्या उंचीवर आम्हीच नाही तर आमचे सखेसोबती मार्गदर्शकांची देखील चांगलीच फॅ....फु... होत असल्याचे दिसून आले.





लोडफेरीच्या पहिल्या तासांभरातच अपेक्षित हिमशिखराचे दुरून का होईना अचानक दर्शन झाल्याने मंत्रमुग्ध झालेले आम्ही साडेचार तासांची पायपीट करून सुमारे ५००० मीटर उंचीवरील शिबीर क्र. १ कधी गाठले ते कळलेच नाही. पूर्वनियोजित शिखर दृष्टीपथात आल्याने आणि शिबीर क्र.१ उभारल्याने मोहिमेचा रथ विजयपथावर आता वेगाने दौडू लागला.



तळशिबिरापासून शिबिर क्र. १ ची ही वाटचाल हा एक मोठा छळ म्हटल्यास वावगे ठरू नये. महायुद्ध काळात हिटलरला जर याची कुणकुण लागली असती तर त्याने छळछावण्या उभारल्याच नसत्या. अगदी चार आण्याच्या नाण्याएवढया आणि त्याहूनही चपटया आकारापासून ते मोठ-मोठाले अवाढव्य शिलाखंड सुद्धा नखशिखांत धार लावून पहुडलेले आणि अस्थिर देखील. त्यांच्यावर चालतांना पाठीवरच्या ओझ्यासह स्वतःचा तोल सांभाळण्याची कसरत करणे हे एक दिव्यच होते. चुकूनही तोल गेला तर एखादया कोळीणीने उभा-आडवा मासा चिरावा त्याप्रमाणे कापले जाणे नक्की होते. एकदोन वेळा अशी वेळी देखील आली पण किरकोळ दुखापतींवर निभावून गेलं हे नशिब.






या दिव्यातून सहीसलामत पार पडावं तर एक खूप मोठा प्रश्न तेथे आवासून उभा होता... पाणी.... हो शिबिर क्र. १ वर पाणीच नव्हतं... अथांग पसरलेल्या या दगडराशी जशा वरून कोरडया तसेच त्यांच्या खालीदेखील पाणी उरले नव्हते. 





हा प्रदेश तसा कोरडाच. इथे पावसाचे प्रमाण अगदी अत्यल्प. हवामानात देखील एक कोरडेपण सतत जाणवतो. इथला भुरभुरता बर्फ देखील कोरडाच असतो. कपडयांवर पडला तरी कपडे भिजत नाहीत हे विशेष.. पाण्याचा खूप शोध घेवूनही ते न मिळाल्याने शेवटी अगदी उंचावरून बर्फ आणून त्यांपासून पाणी मिळवले.... आमचे इंधन संपण्याचा एक मोठाच धोका इथे पत्करावा लागला... वरच्या शिबिरांकरीता वेगळे इंधन आरक्षित ठेवूनच ही रिस्क घेतली गेली... तसेच अनेक सदस्यांनी पिण्याकरीता गरम पाण्याचा त्याग करून या प्रश्नावर अंशतः का होईना मात केली.



पहिल्याच लोडफेरीत अतिरिक्त सामानासह केलेली मजबूत तंगडतोड, भयंकर कोरडया हवामानातील दगदग, पाण्याची कमतरता अशा कसरती काहीशा जास्त झाल्याने मोहिमसदस्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. तसेच मोहिमेचे एक ज्येष्ठ सदस्य श्रीरंग नाडगौडा यांचे आजच तळशिबीरावर आगमन होणार होते. या दोन्हीं महत्वाच्या बाबी पाहता मोहिमनेता देवेंद्र याने आज तळशिबीरावर राष्ट्रीय सुटी जाहिर केली. देवेंद्र नांवाचा अगाध महिमा दुसरं काय ? 




१८आॅगस्ट रोजी मोहिमेची कुमक वाढली. मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त श्रीरंग नाडगौडा म्हणजे आमचे रंगासर मोहिमेवर रूजू झाले. दिवसभरात मोहिमेच्या पुढील हालचालींवर सल्लामसलत घडून दुसऱ्या  दिवशी म्हणजे १९ आॅगस्टला आणखी एका जादा लोडफेरीचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.






अतिशीत हवामानातही मोहिमेचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं होतं... एक वेगळं गांभीर्य आमच्यात भिनू लागलं होतं... तरी शिबिरांवरील थट्टा मस्करी काही केल्या कमी होत नव्हती... रोज रामप्रहरीच उठून राहूल किचनमधील विकी, अशोक आणि प्यारेलाल चाचा यांना पिडायला एकदम तय्यार असायचा... नाश्त्यापासून दिलीप आणि संदीपची एकमेकांवरील शेरेबाजीच्या बेफाम जुगलबंदीला सुरूवात व्हायची... त्यात देवेंद्र आणि मी असे दोन निष्पाप जीव मात्र उगाच भरडले जात असू... 




मोहीमेतील मोठया प्रमाणातील खाद्यपदार्थांची चंगळ आणि सतत त्यावरील रेसिपिंची अनावश्यक बकवास यामुळे हाडाचा आरोहक असलेला बंगाली बाबु दिलीप वैतागून जायचा... ”तुम लोगोंको खाने के सिवा और कुछ दिखताही नहीं क्या?“ संदीप म्हणजे बेंगलोर की चटणी आणि देवेंद्र हा पुण्याचा लाडू असे त्याने नामकरणच केले होते... त्यातही सगळयाच बाबतीत तपशीलवार माहिती सांगण्याच्या सवयीमुळे त्याने संदीपला कुत्सितपणे सांयटिस्ट देखील ठरवून टाकलं होतं... या सगळयातून सतत हास्याचा एक हलकल्लोळ शिबिरांवर तयार व्हायचा... 



कितीही वादावादी, चिडाचिडी झाली तरी शेवटी दिलीपचा एक मायेचा हात मात्र सगळयांवरून अलगद फिरायचा... त्याच्या हातात खरंच जादू होती... तो अगदी आवडीने सगळयांची मालीश करून दयायचा... 


आंम्हांला एकत्र नांदतांना पाहून, आम्ही सर्वजण पहिल्यांदाच भेटत होतो यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. इतकं छान आमचं मेतकुट जमलं होतं... तळशिबिरावर हा लेख लिहित असतांना देखील या सर्व चाळीशी उलटलेल्या बालकांच्या गमती-जमती पाहून मला देखील त्यांत सामील होण्याचा मोह आवरत नव्हता... पण या सर्वांगसुंदर अनवट मोहिमेवर लिहिण्यातला आनंद देखील खूप मोठा होता.


मोठी कामगिरी.... शिबिर क्र. २ उभारले....

मोहीमेतील सुरुवातीचे मजे-मजेचे दिवस मावळतीला आल्याने आता संगराचा अंदाज येऊ लागला होता. अजिंक्य शिखराचा मान-मरातब काय असतो, त्यातील आव्हानांची प्रतवारी काय असू शकते ? याची चाहूल एव्हाना आंम्हांला लागली होती. दुसऱ्या लोडफेरीने याची जाणीव आंम्हांला चांगलीच करून दिली. 





अतिउंचीवरील अतिश्रमाने आता मोहिमसदस्य जेरीस येवू लागले, पण म्हणतात ना ”हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा“ या न्यायाने आम्ही २० आॅगस्टला सर्व चंबूगबाळं आवरून शिबीर क्र. १ वर शिफ्ट झालो. इतकेच नाही तर पुढील चढाईचा आढावा घेण्याच्या दृष्टीने त्याच दिवशी तात्काळ सुमारे ५४०० मिटर उंचीवरील शिबीर क्र. २ ची काहीशी दुरून का होईना पण पाहणी देखील केली. 



या पाहणीतच पुढच्या सुलतानढव्यामुळे एकिकडे मन कातरणीची सुरुवात तर दुसरीकडे चांगल्या, दर्जात्मक आरोहणाची भुक उत्तमप्रकारे भागण्याचा बहारदार कार्यक्रम पुढ्यात दिसू लागला.




दुसऱ्या लोडफेरीहुन तळशिबीरावर परतल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान असं ठरवण्यात आलं की, मोहिमेच्या तळशिबीरावर आता एक आणीबाणी कक्ष उभारावा. कारण आता वरच्या शिबीरांवर कधी काय होईल? याची काहीही शाश्वती नव्हती. आणि तळशिबीरावरील या आणिबाणी कक्षात दोन निधड्या हिंमतीच्या, अनुभवी, तरबेज शिलेदारांची आवश्यकता होती. 




मोहिमेची ही अतिमहत्वाची बाजू लक्षात घेवून अनेक मोहिमांचा अनुभव असलेलेल्या श्रीरंग नाडगौडा आणि राजेंद्र वराडकर यांना ही जबाबदारी देण्यात आली. मोहिमेच्या यशाकरीता या दोघांनीही ही जबाबदारी मोठया आनंदाने स्विकारली आणि अहोरात्र इमानेइतबारे निभावली देखील.


शिबीर क्र. १ वरील दोन लोडफेऱ्यांमुळे  यशासमिप पोहोचलेल्या संघाला आता लक्ष्य खुणावू लागले होते. त्यामुळे २१ आॅगस्ट रोजी लगोलग शिबीर क्र. २ पर्यंत म्हणजे मोहिमेतील निर्णायक टप्प्याची लोडफेरी देखील मोठया उत्साहात, साग्रसंगीत पूर्ण करण्यात आली. 




शिबीर क्र. १ पासून अथांग पसरलेल्या प्रचंड आणि धार लावून बसलेल्या दगडराशींतून पाठीवरील ओझ्यासह कशीबशी मार्गमक्रणा पूर्ण करावी तर प्रचंड टणक अशा बर्फउतारावरील अघोरी चढाई समोर दत्त म्हणून हजर. त्या खडकाळ बर्फउतारावरील अडचणींना तर अंतच नव्हता. अनेक ग्लेशिअर टेबल्स ( मश्रुमच्या आकाराची नैसर्गिक बर्फरचना) तेथे तयार झाली होती. दिवसाच्या वाढत्या तपमानामुळे ती टेबल्स कधीही कोसळण्याच्या बेतात होती. पायाखालचा बर्फ कितीही टणक असला तरी त्याखालून वाहणा ऱ्या , रक्त गोठविणाऱ्या बर्फाळ प्रवाहाच्या विचारांनीच आम्ही थिजून जात होतो. छुप्या हिमदऱ्यांचा धोका देखील मोठा होता, पण त्यांना भ्यायला,  त्यांचा घास व्हायला आम्ही इथे आलोच नव्हतो. 




उरात धमक आहे, आणि ध्येयमूर्ती साक्षात शिखर सावरकर समोर आहे, तर मग येवू दे, संकटे कितीही, भिणार आम्ही नाही या आवेशात त्या पूर्णपणे गोठलेल्या हिमनदीच्या पृ़ष्ठभागावर जरा त्यातल्या त्यात बरी व सुरक्षित जागा पाहून शिबीर क्र. २ ची  उभारणी केली. तोच हिमवृष्टी आणि चाव ऱ्या आणि वाऱ्याचा बेफाम कहर सुरू झाला. सोबत आणलेली साधनसामुग्री कशीबशी तेथील मोठ्या दगडांच्या आडोशाला व्यवस्थितरीत्या झाकून आम्ही तेथून पळ काढला... तोही, उदया पुन्हा भेटूच... असा सज्जड दम देवूनच.





वाईट हवामानाचा असहकार...

शिबीर क्र. १  वर २२ आॅगस्टचा दिवस उगवला तोच मुळी वाईट हवामानाची लक्षणे घेवून. सर्वत्र धूक्याचे साम्राज्य ... पाउस... आणि साबुदाण्यासारख्या हिमकणांचे बरसणे... आज उन आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. भयंकर थंडीचा सामना करीत आम्हीच त्याला शिबीर क्र. २ वर गाठले. चांगलेच खडसावले त्याला.... 




दुपारनंतर मात्र हिमवृष्टीने पुन्हा बराच जोर धरला आणि आमच्या धैर्याचा कडेलोट सुरू केला. पण आम्हीही काही कच्च्या गुरूचे चेले नव्हतो, हे त्याला समजायला थोडा वेळ गेला. 


शिबिर क्र. २ वरील रात्रीची थंडी निर्दयी होती. मॅट्रेसच्या, तंबूच्या खालूनही शरीराचा संपूर्ण कारभार गोठविणाऱ्या या भयंकर थंडीने आमची झोपदेखील कुठल्या कुठे भिरकावून दिली. थकल्या जीवांना थोडी विश्रांती मात्र नितांत गरजेची होती. त्याचवेळी महान शास्त्रज्ञ कलाम साहेबांच्या शब्दांनी मनात फेर धरला होता. ”स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही झोपेत पाहता, तर खरी स्वप्ने ती जी तुमची झोप उडवतात“ अशीच काहीशी आमची अवस्था होती.




त्या रात्री झोप अशी आमच्यापर्यंत अालीच नाही. अन् एका साजि ऱ्या दिवसाचा उदयास्त मात्र होऊ लागला होता. २३ आॅगष्ट..... पहाटेचे साडेतीन..... रात्रभरात झोप अशी नाहीच... तपमान जवळ-जवळ उणे १० ते १५.... अगदी कुडकुडत बाहेर येवून पहातो... तर हाय रे दैवा... संपूर्ण खोरे धुक्याने ओसंडून वहातंय.... दुष्यमानता शुन्य... काहीही निर्णय घेणे अशक्य... शेजारच्या तंबूला आवाज दिला.... तर ती भूतंदेखील रात्रभर अशीच जागी... 




अशा निर्णायक क्षणी देखील तुमची प्रसंगावधानता जागी असेल तर गिर्यारोहणात एक जादुई शब्द आपल्या मदतीला नक्की धावुन येतो, तो म्हणजे ”कॅलक्युलेटेड रिस्क“... बोलून-बोलून गुळगुळीत झालेला असला तरी या शब्दात जादू नक्कीच आहे. ती वापरता मात्र आली पाहिजे. अशा वेळी आम्ही त्याच जादूचा करिष्मा पहायचा निर्णय घेतला. 




रात्रभराच्या जागरणाने सकाळी काहीच खायची इच्छा होत नव्हती... हवामानाने असा खो दिल्यामुळे आम्ही सर्वजण काहीसे उदासच होतो... सुमारे ६ वाजेपर्यंत वातावरण निवळण्याची वाट पाहून मोठ्या हिंमतीने शिबीर क्र. २ सोडले आणि एका महान घटनेच्या निर्माणाकरीता प्रत्यक्ष चढाईचा शुभारंभ केला.






                                                                                                                                क्रमशः 

मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व भाग २

प्रातःस्मरणिय गो. नि. दांडेकर स्मरणदिन 

गुरूवार, दिनांक - ० १  जून  २०१७


मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : भाग २ 

स्वातंत्र्यदिन जल्लोशात साजरा....



मोहिमेच्या जय्यत तय्यारीत सम्पूर्ण पथक मनालीतून निघण्यापूर्वी 

श्री. राजीव शर्मा आणि त्यांच्या ट्रेक इंडिया या संस्थेमार्फत योग्य ते मार्गदर्शन, साधनसामुग्री आणि सहायक मदतनीस यांचेसह मोहिमेने मनालीतून सुमारे ११५ कि.मी. अंतरावरील बातल हे ४,२०५ मिटर उंचीवरील मोहिमेचे मुख्य ठिकाण गाठले. राष्ट्रकार्याची एक भव्य, महत्वाकांक्षी मोहिम १४ आॅगष्टला म्हणजे स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला नगाधिराज हिमालयाच्या बाहूपाशात येवून विसावली.


बातल म्हणजे फार मोठे ठिकाण नाही. दोन तीन कच्च्या झोपडीवजा टपऱ्या, एक शासकीय विश्रामधाम, चंद्रा नदीवरील एक भक्कम लोखंडी पूल, आणि शेवटी एक देवीचे लहानसे मंदिर बस्स. एवढाच बातल. येथील सर्वात मोठ्या टपरीवजा हाॅटेलचा मालक दोर्जे बोध हा देखील एक जबर इंटरेस्टिंग माणूस. अतिहिमवृष्टीमुळे उद्भवलेल्या प्रलयंकारी घटनेत या वृध्द दोर्जे दांपत्याने अनेकांचे जीव वाचविल्याने या पती-पत्नीला चक्क "नॅशनल ब्रेव्हरी अॅवार्ड" ने गौरविण्यात आले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे अगदी हसतमुखाने आदरातिथ्य करण्यात हे दांपत्य सहकुटूंब कायम व्यस्त असते. मनाली ते कुंजूम पास, चंद्रताल किंवा काजाकडे जाणाऱ्या मार्गावरील एक विश्रांतीचा थांबा म्हणून बातलचे महत्व मोठे आहे.



बातल येथे पोहोचलेले मोहीम सदस्य  

प्रत्येक देशाभिमानी नागरिकाच्या दृष्टीने आनंदाचा दिवस म्हणजे आपल्या लाडक्या देशाचा स्वातंत्र्यदिन. याच दिवशी बातलपासून १४ कि.मी. अंतरावरील व सुमारे १३,५०० फुट उंचीवरील ”कुंजूम पास“ येथे सकाळीच भेट देवून, तेथील धर्मस्थळाचे दर्शन घेतले. तेथून आमची पायगाडी निघाली ते थेट चार तासांच्या मजबून पायपीटीनंतर "ल्हामो ला" पास ओलांडून सुमारे १४,००० फुट उंचीवरील ”चंद्रताल“ या विशाल हिमालयीन सरोवराच्या तीरावर येवून विसावलो. चंद्रतालचे ते अस्सल आरस्पानी, सौंदर्य पाहताच सर्वजण सुखावून गेले. असं म्हणतात की या सरोवराच्या किनारी देव-देवतांचा वावर असतो. त्या सर्व आख्यायिका बाजूला ठेवल्या तरी तेथील स्वच्छता, शांतता, असमंतात भरून राहिलेला एक अवर्णनिय आनंद यांमुळे त्या निखालस जलसौंदर्यात सुखनिधान निसर्गदेवतेचा वावर नक्की असावा असे वाटून गेले. तेथे जमलेल्या स्थानिक गावकऱ्यांसमवेत भारताचा मानबिंदू तिरंगा उंचावून स्वातंत्र्यदिवस मोठया उत्साहात साजरा केला.



चंद्रताल येथे स्थानिकांसमवेत मोहीम सदस्यांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला ... 

तळशिबिराच्या दिशेने मोहिम रवाना....

चंद्रताल येथील भेटीने अतिउंचीवरील हवामानाशी एकरूप होण्याचा विधी समारंभपूर्वक संपन्न झाल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी सक्काळीच मुंबईहून आणलेल्या पुरणपोळया लाडू आणि भरपूर चहाचा आस्वाद घेवून बातल सोडले. आणि कुख्यात अशा कर्चा नालाच्या उगमाच्या दिशेने आगेकुच केले. कर्चा नाला ओलांडून पुढे गेलो असतो तर कदाचित, चूकून हिमाचल प्रदेशातील एक मोठी हिमनदी ”बडा शिगरी“ वर आमची वरात दाखल झाली असती. पण घरचा अभ्यास चांगला झाल्याने मोहिमेचा प्रवास योग्य दिशेनेच सुरू राहिला. ”कर्चा नाला“.... कसला नाला? नाले शहरात असतात. तो तर साक्षात नद होता. तिथल्या बोलीनुसार त्याला नाला हे काहीसं ओंगळवाणं संबोधन प्राप्त झालं होतं. पण बेसावध क्षणी हत्तीदेखील वाहून नेण्याची त्याची असामान्य क्षमता होती.


खवळलेल्या कर्चा नालयाशी पंगा नको म्हणून डोंगरवाटेने मार्गक्रमणा करताना मोहीम सदस्य 

अनेक बळी घेतल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातच नाही तर जगभरातून बदनाम असा कर्चा नाला अगदी भरात असल्यामुळे उगाच शहाणपणा न करता आम्ही जागोजागी दोर लावून काही अवघड जागा ओलांडल्या. अचानक समोर उभे राहणारे नकोसे वाटणारे भयंकर चढ, बर्फाळ पाण्याचे बेफाम प्रवाह, ते सहीसलामतरीत्या पार करण्याकरीता नैसर्गिक हिमसाकव (स्नोब्रिज).... त्यावरदेखील धोका होताच .... कारण वर-वर जरी बर्फावरून चालणे असले तरी त्याखाली वाहणारे हिमनदीचे घोंघावते पाणी काळजात धडकी भरवत होते.



स्नोब्रिजच्या खालून घोंघावत वाहणारा प्रवाह 


ही सर्व सर्कस पूर्ण करून काही अंतर काटले असता, एका अवखळ खोडकर नाल्याने उगाच आमची फिरकी घेतली. अचानक रौद्र रूप धारण केलेल्या या नाल्याने आमची चांगलीच जिरवली... सहा वेळा एव्हरेस्ट सर केलेल्या पेंम्बा शेर्पा यांची या नाल्यातच भेट झाली.


महान गिर्यारोहक पेम्बा शेर्पा यांचेशी भेट 



आमच्या पूर्वनियोजित हिमशिखराच्या परिसरातील ६,०६६ मिटर उंचीचे शिखर सर करून एका बंगाली टिमसह ते परतत होते. त्या जलप्रपातात आपादमस्तक न्हावून, एका महाप्रतापी गिर्यारोहकाची अशी ओलीचिंब भेट घेवून आम्ही थेट सुमारे ४,४०० मिटर उंचीवरील मोहिमेचे तळशिबीर गाठूनच श्वास घेतला.

आमचे सर्वात तरूण सहकारी, ६५ वर्षांचे प्यारेलाल चाचा, नामग्याल नेगी, अमर नेगी, मॅनेजर प्रविण, मास्टर शेफ विकी आणि त्याचा सहायक अशोक यांची डोंगरातली चाल, त्यांचं निसर्गाशी असलेलं घट्ट नातं, सलगी पाहून आमचा जोष वाढतच होता.


अद्वितिय हिमशिखराचे तळशिबिर उभारले....




कर्चा नालयाच्या शेजारी  उभारण्यात आलेले मोहिमेचे तलशिबीर 
कर्चा नाल्याच्या उजव्या तीरावरील मस्त गवताळ काठावर मोहिमेचे सर्वात महत्वाचे असे तळशिबीर अर्थात ”बेसकॅम्प“ उभारण्यात आला. तळशिबीर नांदू लागण्यापूर्वी, तेथे आधीच दगडा-खडकांनी उभारलेल्या क्षेत्रपालाच्या मंदिरात आमचेकडील तुळजाभवानी आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा देखील स्थानापन्न झाल्या. विधीवत पूजा होवून नैवेद्याचा छान शिरा प्रसाद म्हणून वाटण्यात आला. आमच्या या तळशिबीराचा थाट मात्र काही औरच होता. पूर्वेला भव्य असा कर्चा पर्वत मायेने आमच्यासारख्या अवखळ पोरांवर हिमवृष्टी करीत होता तर पश्चिमेला बातल गावाने एखादया सलगीतल्या गाववाल्यासारखी पाठराखण केली होती. दक्षिणेला प्रचंड डोंगरधारेखालून कर्चा नाला भयंकर गर्जनेसह धमकावत, धुसफुसत पण गपगुमान, खालमानेने वहात होता आणि दक्षिणेला या दरीने एक वळण घेतले होते. तेथेच एका जंक्षनवर कर्चा नाला एका अवाढव्य शिखरधारेमुळे मधूनच विभागला गेला होता. ही शिखरधार मात्र आम्हाला सतत खुणावत होती.





भौगोलिकदृष्टया पाहिले तर खोऱ्याच्या वरच्या भागातील हिमनदयांमुळे होणारा पाण्याचा अखंड पुरवठा व त्यामुळे अहोरात्र वाहणारा कर्चा नाला. या नाल्याच्या अविरत वाहण्यामुळे तयार झालेल्या या दरीच्या दोन्ही अंगाने विशाल पर्वतधारा निर्माण झाल्या. त्यावरील एक प्रमुख शिखर म्हणजेच २०,५७० फुट उंचीचा भव्य असा कर्चा पर्वत. काही वर्षांपूर्वीच या खोऱ्यात भारतीय गिर्यारोहणाचे अध्वर्यू हरिश कपाडीया यांनी देखील भटकंती केली होती. राजीव शर्मा यांचे पथकाने येथे २००९ पासून अनेक विदेशी पथकांसोबत सर्वेक्षण करून येथील कित्येक अजिंक्य हिमशिखरांची नोंद घेतली. आणि तेंव्हापासून जपान, सिंगापूर तसेच प. बंगालच्या पथकांनी येथील अनेक अजिंक्य अनामिक हिमशिखरांवर यशस्वीरीत्या स्वारी केली होती. पण आम्ही निवडलेलं शिखर हे एकमेवाद्वितीयच होतं. कारण अनेक देशी-विदेशी पथकांनी या शिखराच्या आजूबाजूची शिखरे पादाक्रांत केली. पण याच्याकडे नजर उंचावून पाहण्याचे धारिष्ट्य त्यांना झाले नाही. ”दगडापेक्षा बर्फ बरा“ म्हणून त्यांनी इतर शिखरांची वाट धरली.... याच्या वाटेला गेली नाहीत. कारण चढाईमार्गावर पायथ्यापासून माथ्यापर्यंत या शिखरावर बर्फाचा लवलेष नाही. थोडयाशा चुकीमुळे कपाळमोक्ष करायला मात्र दगडराशींचा महासागरच उभा होता.


दगडराशींच्या महासागराच्या पार्श्वभूमीवरील नयनरम्य शिखर सावरकरांचे विलोभनीय दर्शन...