त्याला "ट्रेकर" म्हणू नये....

                                                                                                          जागतिक पर्वत दिवस.
                          दिनांक  ११  डिसेम्बर  २०१७ .

त्याला "ट्रेकर" म्हणू नये...
ज्याची न जुळे नाळ अथांग निसर्गाशी
ज्याला न कळे साद उत्तुंग गिरीशिखरांची
ज्याचे लागेबांधे केवळ भ्रष्ट हव्यासाशी

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याला नाही जाण वैभवी इतिहासाची
ज्याला नाही आण अभिमानी स्वराज्याची
जो भटके केवळ सेल्फी अन् धिंगाण्यासाठी

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याच्या उरात न जपली छबी शिवरायांची
ज्याने न राखली शान ताना, बाजींच्या पराक्रमाची
ज्याच्या नसांत नुरली रग मावळ्यांच्या रक्ताची

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याला न चाड भटकंतीच्या नियमांची
ज्याची न निष्ठा गडकोटांच्या पावित्र्याशी
जो न राखे इमान इथल्या पावन मातीशी

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याला न माहित निसर्गाची शिस्त
ज्याची केवळ मौज मजेवर भिस्त
जो नाहकच करी पर्यावरणाचा अस्त

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याच्या नेतृत्वाला नाही नियोजनाची साथ
ज्याच्या तोंडी केवळ फुशारकीची बात
ज्याने केला सदा संघभावनेचा घात

त्याला ट्रेकर म्हणू नये...

ज्याच्या कृतीने होई अवमान महाराष्ट्राचा
ज्याने न राखला मान बुलंद सह्याद्रीचा
ज्याला नसे गंध गिरी-निसर्ग संवर्धनाचा

त्याला ट्रेकर म्हणू नये...
 

2 comments: