माहुलीची लेक , निघाली सासरला ....

देवशयनी आषाढी  एकादशी 

मंगळवार , दिनांक - ०४ जुलै  २०१७.

लेक माहुलीची, निघाली सासरला...


रात्री उशिराचा सुमार. जेवणं इत्यादी आवरून आम्ही सर्वजण निवांत बसलो होतो. इतक्यात फोनची रिंग वाजली. इतक्या उशिरा कोणाचा फोन म्हणत न पाहताच मोबाईल कानाला लावला. अन् कडक आवाजात एक खणखणीत धमकीच कानी पडली.


त्या फोनकाॅलमुळे घाबरून जाण्याऐवजी आम्ही दोघंही खुप आनंदित झालो. "नाना ssss... नानीला घेऊन लग्नाला आला नाहीस तर बघ, मी तुझ्याशी बोलणारच नाही." फोनवर मिळालेला अस्सा साॅल्लीड, कडक दम, हा जितका मजेशिर होता तितकाच गंभीर सुद्धा होता.


सह्याद्री पर्वतरांगेतील माझ्या सर्वात लाडक्या किल्ल्याच्या पायथ्याशी रहाणाऱ्या व कालपर्यंत गावभर उंडारणा-या, चिमुरड्या माधुरी आगिवले हिने फोनवरून असं धमकाऊन आंम्हांला एक सुखद धक्का दिला.


माझ्या उण्या-पु-या भटकंतीमधील अर्ध्या-अधिक गडफे-या तर बलदंड, बेलाग अशा किल्ले माहुलीवरच झाल्या असतील. कोणतीही फेरी या आगिवले कुटुंबियांच्या सढळ आदरातिथ्याशिवाय कधी पार पडलीच नाही. मलाच नाही तर माझ्यासारख्या कोणाही भटक्याला त्यांनी कधिही, काही कमी पडू दिले नाही.


अल्पसा परिचय होता-होता त्यांच्या घरचा कधी झालो ते कळलंच नाही. दिवस आणि रात्र अशा भौतिक काळ-वेळेचं बंधन जसं बलदंड किल्ले माहुलीकरीता पाळलं नाही, तितक्याच हक्काने ते या अगत्यशिल आगिवले कुटुंबाच्या भेटीसाठी देखील कधीच पाळलं गेलं नाही. या दोन्हीही ठिकाणी कधीही यावं...अन् आपलंसं होऊन जावं अशीच इथली परंपरा.


सुमारे ३०-४० हुन अधिक, एकापेक्षा एक सरस अशा चुरशीच्या आणि आव्हानात्मक सुळक्यांचा समुह या माहुलीच्या घेऱ्यात आहे. इतकंच नाही तर हा बेलाग किल्ला देखील अत्त्युत्तम अशा दुर्गत्रयींचा संगम-समुहच आहे. त्यामुळे माहुलीला भटक्यांबरोबरच साहसी गिर्यारोहकांची पंढरी म्हटलं तर ते अधिक सयुक्तिक होईल. आणि अशा साहसपंढरीच्या वारीचा वारकरी, गुरुच्या घरी अर्थात् या पंढरीच्या वाटेवरील "नामदेवाच्या पायरीवर" माथा टेकल्याशिवाय अन् क्षणभर विसावल्याशिवाय विठ्ठलाच्या दर्शनाला पुढे जात नाही. अशा नामयाच्या पायरीवर वाढलेल्या आमच्या माधुरीला एक संस्कारी सुकन्याच म्हटलं पाहिजे. अश्शी गुणाची खाण असलेली लेक सासरी जातांना आई-बापाच्या जीवाची काय अवस्था होत असेल याची कल्पना देखील काळीज पोखरून काढते.


काही वर्षांपुर्वी गुरुच्या घरात प्रवेश केला की एक इवलीशी परकरी पोरगी उगाच एखाद्या बिनबुडाच्या छोट्याशा गडुसारखी मधे-मधे लुडबूडत असायची. तीची ती लगबग, घाई-गडबड बघून खरंतर खुप हसु यायचं, पण त्या आडरानातील दुर्गम गावात तीची पराकोटीची आपुलकी आणि ओतप्रोत पाहुणचाराचं भारी कौतुक वाटायचं. अनेक वेळा तर या चिमुरड्या माधुरीने आई-बाबा शेतावर गेल्यानंतर, घरी कोणी नसतांनाही आंम्हां भटक्यांच्या मुखी दोन घास घातल्याशिवाय परतू दिले नाही. बरं.. मुंबईच्या जवळ, तरीही सोयीसुविधांपासुन वंचित अशा दुर्गम खेड्यात जन्मली, वाढली तरीही माधुरी काही अशी-तशी राहीली नाही. तर चांगली सुज्ञ, सालस आणि ज्याच्या घरी जाईल त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, अशीच घडत गेली. उगाच म्हणत नाहीत "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी".


माझी एवढीशी मुलेही या माधुरीची कट्टर फॅन आहेत बरं का? तीला कोणीही अन् काहीही बोललेलं त्यांना चालत नाही. अन् माझ्या दोन्ही मुलांवर तीचा तर इतका जीव की, माझ्या परिचयाचं कोणीही त्यांच्या घरी गेलं की मुलांच्या आवडीची तांदळाची लोण्यासारखी मऊ मुलायम भाकरी न् खोबऱ्याची खमंग चटणी तीने पाठवलीच पाहिजे असा दंडकच आहे.


जेवणाबाबत कायम उदासिन असलेलं आमचं शेंडेफळ ८ वर्षांचा समर्थ अाणि मोठा १२ वर्षांचा आदित्य यांना तर माधुरीताईने भाकरी दिलीय म्हणायचा अवकाश दोघेही त्यावर आधाशीपणे तुटून पडतात. कालपरवापर्यत माझ्या बच्चेकंपनी सोबत अगदी लहान होऊन खेळणारी माधुरी अचानक कधी मोठी झाली ते कळलंच नाही. मुली या अशाच असतात. वेड लावतात, भराभर वाढतात अन् आपापल्या घरट्यांकडे भुर्रकन उडून जातात.


रटाळ, शहरी दैनंदिन आयुष्यात भटकंती किंवा गिर्यारोहणाची ओढ शांत बसु देत नाही. मग कितीही थकुन कामावरुन सुटलो तरी रात्री-अपरात्री धडपडत शेवटच्या लोकलने आसनगाव आणि तेथुन तासाभराची तंगडतोड करीत माहुली गाव गाठायचा. तोपर्यंत अर्धी रात्र सरलेली असायची. आधीच ठरल्याप्रमाणे आंम्हां डोंगरवेड्यांचा माहुलीतला हक्काचा आधार, माहुलीचा किल्लेदार गुरुनाथ (जंगलगुरु) आगिवले न् त्याच्यापेक्षाही प्रेमळ त्याची पत्नी जागसुदच आढळणार. अशा अपरात्री देखील घरात आमची चाहुल लागताच कुठूनतरी सांदीकोप-यातुन हळुच एक परिचित आवाज यायचा "नाना तुझा आवडता खर्डा न् भाकरी ठेवलीय ती खाऊन घे, तोवर तुझी काली चाय तयार ठेवते." या हुकुमानंतर आपली काय बिशाद? पुढे जायची? नाही म्हणजे अजिब्बात नाही. हि धमकावणी असायची आमच्या गोडुल्या माधुरीची.


आख्ख्या घरावर तिचं राज्य असायचं. तिच्या उपस्थितीत, तीच्यापेक्षा लहान भाग्यश्री, नवनाथ अन् मोठ्या रोहिणीचंच काय तर वडील कमी अन् माहुलीचा धारकरीच जास्त असलेल्या गुरुचं अन् तीच्या मायमाऊलीचंही का ssss ही चालत नसे.


अशा निरागस अन् चंचल माधुरीला भरल्या मांडवात सालंकृत वधूवेषात छान नटलेली पाहिल्यानंतर गलबलून गेलो. आंम्हां उभयतांना लग्नाला आलेलं पाहुन सद्गदित झालेली माधुरीदेखील हेलावुन गेली. माझी पत्नी सरिता व तिच्यात अल्पावधीत एक वेगळंच नातं विणलं गेलेलं मी जवळुन पाहिलंय. गेल्या काही वर्षात माहुली-माधुरी नी अाम्ही दोघं अशी एका स्वच्छंद नात्याची मस्त श्रुंखला तयार झाली होती. माधुरी ही त्यातील एक महत्वाची कडी. तीच माधुरी आज तीच्या स्वतःच्या हक्काच्या संसारसाखळीत गुंतण्याकरीता आमच्यातुन मोकळी होऊन चालली होती. गेले काही दिवस माझी पत्नी सरिताची तब्येत बरी नाहीये. तरी केवळ अन् केवळ माहुली व माधुरीवरील अपार प्रेमाखातर, अशा अवस्थेत प्रवासाची काही सोय होत नाही हे पाहून जीवाची काहिली करणाऱ्या उन्हा-तानांतही इतक्या लांब मोटारसायकलवर जाऊन आम्ही या लग्नाला आवर्जुन हजर राहिलो याचं खुप मोठं समाधान वाटून गेलं.


आता माहुलीला गेल्यानंतर "ना ssss...ना" अश्शी प्रेमाची हाळी कोण घालणार ? तो हक्काचा मस्सालेदार काळा चहा आता आग्रह करुन परत-परत कोण विचारणार? लाघवी बडबडीने डोकं कोण खाणार ? या विचाराने काहीसा खिन्न होऊन गेलो. मीच काय... तर गावावर सदोदित मायेची पाखर घालणारा असा पुराणपुरूष किल्ले माहुलीदेखील आज वधुपित्यासारखाच उदासवाणा भासू लागला होता.


घरच्या अंगणातच उभारलेल्या मांडवात ऐतिहासिक किल्ले माहुलीच्या साक्षीने जीवनातील एका नव्या मंगल पर्वाची सुरुवात करणा-या आमच्या या लाडाच्या लेकीला, पुढील आयुष्यात भरभरुन सुख समाधान लाभो असं साकडं त्या प्राचिन गडदेवतेला घालूनच आम्ही उभयतांनी जड पावलांनी परतीची वाट धरली...

9 comments:

  1. सह्याद्रीतल्या किल्ल्याच्या पायथ्याशी राहणार्‍या मंडळींशी भटक्यांचे जे ऋणानुबंध निर्माण होतात ते जवळच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट!
    खरं तर या मंडळीं शिवाय आपली भटकंती अपूर्णच राहून जाते...त्यामुळे त्यांचा पाहुणचार मुद्दामहून घेण्यासाठी आम्ही बर्‍याचदा नुसते त्यांच्या गावापर्यंत जाऊन आल्याचे अनेकदा घडले आहे...

    ब्लॉग उत्तम तयार झालाय...अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरंय...डोंगरात जुळलेली हि नाती आपल्या ख-या नात्यांपेक्षा कितीतरी अधिक शुद्ध आणि पवित्र असतात...आपण भटक्यांनी हि नाती मनापासून जोपासली पाहिजेत...धन्यवाद

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद तुषारजी...

      Delete
    2. सोबत कधीतरी भटकंतीचा योग लाभू द्या...

      Delete
  3. मा-माहुली, मा-माधुरी ह्या नावांशी जोडल्या गेलेल्या नात्याशी शब्दांची गुंफण सुंदरच.

    ReplyDelete
    Replies
    1. देवा, सुचतं कधी तरी असंही...धन्यवाद मित्रा..

      Delete
  4. हृद्य लेख. वाचता वाचता अलगद धूसर झाली सगळी अक्षरं.

    ReplyDelete
  5. उत्तम अभिप्रायाकरीता मनःपूर्वक आभारी आहे.

    ReplyDelete