जागतिक पर्यावरण दिवस
दिनांक ०५ जून २०१७
पर्वतकन्या कारवी
विसेक वर्षांपुर्वी डोंगरांशी जन्म जन्मांतरीचं सख्य जमलं. तेंव्हापासुन पायाला लागलेली भटकंतीची भिंगरी आजही थांबलेली नाही. या नादापायी सखा-सांगाती सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगेतील गडकोटांवर अहोरात्र बेहिसाब भटकलोय. या अतरंगी घाटवाटांवर सोबतीला इतर कोणी असो-नसो पण "ती" मात्र असतेच. तीची भेट नाही, असं सहसा होत नाही.
ती माझी वाट पहात नाही, पण मी मात्र तीला भेटायला सदैव उत्सुक असतो. आणि या भेटीला तीची कधीच ना नसते. जर कधी नजरचुकीने माझं दुर्लक्ष झालंच तर मात्र हमखास वाट अडवुनच ती उभी राहते.
सुरूवातीला तर ती अोळखच दाखवत नाही. ब-याच मोठ्या दुराव्यानंतरचा रूसवा असतो तो. पण एकदा का सलामीची नजरा-नजर झाली कि मग मात्र पुढचं काम अगदी सोपं होऊन जातं. थोडं इकडचं-तिकडचं झालं कि वेळ-काळ पाहुन आमच्या गुजगोष्टींना हळुवार सुरुवात होते. आणि एकदा का ती रंगात आली कि मग आपलं काहीच चालत नाही. ना आकर्षक रंगरूप, ना चाफेकळीचा नाकनक्षा. तरीही ती सर्वांगसुंदर आहे यात वादच नाही.
अवखळ वाऱ्याच्या झोतावर अलवार हेलकावे घेणारी... टप्पोऱ्या, भरदार कळ्यांच्या भाराने जराशी झुकलेली... अन् दिलखेचक हलक्याशा निळ्या-जांभळ्या फुलांनी भरगच्च डवरलेली लावण्यवती कारवी पाहिली कि बस्स ... s s s s... आणखी काही पहायला मन राजीच होत नाही.
नाजुक, मखमली, कोवळ्या फुलांच्या आगमनाने तीची चांगलीच कळी खुलते. त्यावेळी तीचा अवघा रागरंग पालटून गेलेला असतो. काय तीचा तो थाट सांगावा... रानटी असली तरी अस्सल खानदानी सौंदर्यानं देखील पहातच रहावं अस्सा शालीन दिमाखाचा बाज ती सहजी सांभाळते. लाडाकोडानं वाढलेल्या, छचोर, भावखाऊ अन् नटमोगऱ्या सुवासाचा माज मिरवणाऱ्या अनेकींना ती लीलया गुंडाळते. अशी ही चितचोर कारवी गेल्या दोन दशकांहुनही जास्त काळ काळजात अश्शी घट्ट रूतून बसलीये कि तौबा तौबा..
बरं... झुडुप म्हणावं तर इतकी काही ती खुरटी नाही. अन् झाड म्हणायची सोय नाही. अशा शेलाटया अंगकाठीची कारवी, काही निबीड रानां- वनांत मात्र आपली वहिवाट मोडुन, पदर खोचून ताडमाड झाडांशी पैजा करताना दिसते. त्यावेळी तीचा आवेश एखाद्या झुंजार रणरागिणीसारखाच असतो.
किशोरावस्थॆत असतांना "जैत रे जैत" हा वेगळया धाटणीचा नितांत सुंदर चित्रपट पाहण्यात आला होता. यातील मराठमोळ्या, सोनसावळ्या स्मिता पाटील यांचा खणखणीत अभिनय तर काळजाचा ठाव घेऊन गेला कि हो.... स्मिताजींनी आपल्या अप्रतिम आंबट-गोड चवीच्या रायवळी सौंदर्याला, गहिऱ्या पाणीदार अभिनयाचा जो काही साज चढवलाय माशाल्ला....
अभिजात अभिनयाचा तो उत्तुंग आविष्कार पाहुन त्या घनघोर, रानातील अनवट रानवाटा न् किल्ले कर्नाळ्याचा तो बेलाग पाषाणस्तंभ देखील मोहरून गेला असेल.
राना-वनांतील, वाडी- वस्त्यांवरील दुर्धर तरीही रंगारंग आदिवासी जीवनाच्या दुर्गम पार्श्वभूमीवर साकारलेला हा एक मस्त, अविस्मरणीय चित्रपट. आपल्या लाडक्या स्मिताजींनी यात बिनधास्त, चंचल, काळ्या-कभिन्न फत्तरासारखी कणखर पण वनलावण्याची खाण असलेल्या चिंधीचा लाजवाब रोल उंची वकुबाने साकारलाय.
आसमानाला गवसणी घालू पाहणा-या चिंधी-नाग्याच्या या चित्रपटाची रंजक कथा चितारलीये ती साक्षात गोपाल नीलकंठ दांडेकर अर्थात समस्त भटक्यांसाठी प्रातःस्मरणीय अशा सह्यसखा गोनिदा यांनी.
तमाम सह्याद्रीचा ७-१२च नांवावर असणाऱ्या आप्पांसारख्या आशक मस्त फकिराने चिंधीसारखं हळव्या गाभ्याचं, निबर पात्र नक्कीच कारवीला समोर धरून रेखाटलं असावं. कारण उभा-आडवा सह्याद्री पालथा घालणा-या आप्पांच्या नजरेतून बेमिसाल कारवी सुटणं अशक्य. आजही कारवी दिसली कि आप्पांच्या जैत रे जैतमधील स्मिताजींनी साकारलेली बिनधास्त, रांगडी चिंधी सर्र..कन डोळ्यांसमोर उभी राहते.
कारवीच्या वेगळेपणाचा शोध घेत गेलो तर जंगली म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या वनस्पतीच्या उपकारांपुढे लोटांगणच घालायला हवं. सह्याद्रीची पर्वतशिखरे अन् गडकोटांवर अपार प्रेम करणारांनी तर या कारवीच्या कर्जातच राहिलेले बरे. कारण इतकं अवाढव्य कर्ज आपल्या पिढ्या- पिढ्यांनीही फिटणारं नाही.
खरं तर प्रेमळ पित्याच्या विशाल देहावर लडीवाळपणे पहुडलेली कारवी हि सह्याद्रीची लाडकी लेक. पण हिच पर्वतकन्या बापाची आधारकाठीही झालीय हे आपल्या लक्षातही येत नाही. या कारवीनेच आपला महान सह्याद्री जपलाय, सांभाळलाय असं म्हटलं तर धक्का बसेल कि नाही ? पण असं धाडसी विधान करण्यामागे सबळ कारणं देखील आहेत. कारवीच्या प्रेमात पडून मी उगाच बरळत नाहीये.
उतारांवरील सैलसर माती ही द-या-डोंगरांचं सर्वस्व असते. त्यांच्या अस्तित्वात या मातीचा बेहिशेबी वाटा असतो. तीची धुप रोखण्याची बेमिसाल कामगिरी करुन कारवीने आपल्यावर डोंगराएवढे उपकार करुन ठेवलेत. डोंगररांगांमधील अगदी अडचणीच्या जागा देखील आपल्या कुटुंब-कबिल्यासह मजबूतरित्या व्यापण्याच्या या विलक्षण कर्तृत्वामुळेच सह्याद्री न् त्याच्या अंगा-खांद्यावर रचलेले गडकोट, अन् तटाबुरुजांच्या माळा आजही सहीसलामत, शाबुत आहेत.
इतिहास काळात तर या वनराणीने काय काय पाहिलं असेल या कल्पनेनेच शहारून जायला होतं. कधी कधी तर वाटतं की, मर्द मावळ्यांनी जाणत्या राजाच्या शब्दाखातर अख्खा सह्याद्री रक्तानं शिंपुन काढला. त्याच सह्याद्रीच्या मातीतुन उगवलेली हि... कारवी नाही तर थोरल्या धन्यांचे इमानी मावळेच कारवीच्या रुपात येऊन गडकोटांवर नजर रोखून उभे ठाकलेत कि काय या भावनेनेच शहारुन जायला होतं.
शिवछत्रपतींनी स्वराज्यकार्यात वतनं, इनामं मंजूर करतांना अस्मानी चंद्र-सुर्य असेपर्यंत गडकोट जागते ठेवण्याच्या आज्ञा दिल्या होत्या. त्यांच्या जिंदादील मावळ्यांनी जीवात जीव असेपर्यंत ही आज्ञा काटेकोरपणे निभावलीच. पण थोरल्या धन्याचा शब्द म्हणजे थेट काळजावर कोरलेला लेख. तो पाळण्यासाठी तत्पर मावळा कुडीतला प्राण गेल्यानंतरही, भुईत रोवलेल्या उभ्या भाल्यासमान कारवीचं रुप घेऊन जणु अविरत सेवा बजावतोय. गडकिल्ल्यांवर पसरलेल्या कारवीच्या अथांग शिस्तबद्ध फलटणी पाहिल्या कि याची प्रचिती येते.
आपला सह्याद्री म्हणजे लाव्हारसापासुन निर्मित अग्निजन्य खडकांची अत्त्युच्च अशी विस्तीर्ण पर्वतमाला. कालांतराने लाव्हा थंड होऊन नैसर्गिक प्रक्रियेत त्याच्या वरच्या थरांची यथावकाश झिज होऊन त्याचे सर्जनशील मातीत रूपांतर झाले. या संपुर्ण प्रक्रियेत या मातीची भुमिका नितांत महत्वाची ठरते. हीच माती वैशिष्टयपूर्ण निसर्ग अन् जैववैविधता यांची जननी होते. पर्यावरणाचा असामान्य असा समतोल साधते. या किंमती मातीची धुप रोखण्याची अवघड कामगिरी मात्र कारवीने आपल्या शिरावर घेतल्याने तीच्या थरांखालचा, सह्यांचलाच्या मुळाशी असलेला आधाराचा मुळ कणखर खडक मात्र अभंग राहिलाय. सांगा राव आहे का काही तोड या अजोड कामगिरीला ?
वरवर पाहता इतर रानटी झाडी-झुडुपांसारखी वाटणाऱ्या या कारवीचा नीट, सांगोपांग अभ्यास केल्यास लक्षात येते कि उगाच कुठेतरी आगंतुकासारखी ती रुजत नाही. निगुतीने जपलेल्या बागा-उद्यानांमध्ये तर ती ढुंकूनही दिसणार नाही. तीचा स्वतःचा एक वेगळा क्लास आहे, स्टँडर्ड आहे. अन् ती तो जबरदस्तरीत्या जपते.
सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतराजीत घुमणा-या भर्राट वाऱ्याचा बेलाग कडे-कपारींचा, गड-किल्ले आणि पर्वतपठारांचा स्वच्छंद सहवास कारवीला खुप भावतो. लोचटपणे कुणाच्याही वळचणीला जाणाऱ्यातली ती नाही. दऱ्या- खोऱ्यांत भटकतांना हिचं अपरंपार सामर्थ्य डोळे दिपवल्याशिवाय रहात नाही.
सह्याद्रीच्या कडेकपारींवर एकहाती मालकीहक्क गाजवणारी, मैलोगणती अथांगपणे पसरलेल्या साम्राज्याची ती एक अनभिषिक्त महाराणी. तरी तीला याचा ना गर्व ना अभिमान. गर्भश्रीमंत असूनही बडेजाव न करता साधं रहावं तरी किती? याचं जिवंत उदाहरण म्हणून कारवीचं नांव बिनधास्त घ्यावं.
असं म्हणतात कि कारवी सात वर्षांतुन एकदा फुलते. ती कसली फुलते ? ती सारा आसमंत फुलवून सोडते. तीचं ते फुलणं नसतंच मुळी. सह्याद्री अन् कारवी या बाप-लेकीचा तो एक आनंदोत्सव असतो. आणि या उत्सवात चराचराने सामील व्हावं असा तीचा अट्टाहास असतो. यात खरी लगबग उडते ती सतत भिरभरणाऱ्या मधमाशांची. या अपुर्व सोहळ्याचा आनंद लुटण्याकरीता मधमाशांच्या एकुण एक जाती-जमाती हिरीरीने सहभागी होतांना दिसतात. जणूकाही त्यांचं एक असं वेगळं संमेलनच भरलं असावं. याचं कारण विचाराल तर तेही तितकंच गोड आहे. कारवीच्या सर्वांगसुंदर फुलांना गंधमाधुर्य नसलं तरी मधुमकरंदाने ती मुसमुसलेली असतात. इतकंच नाही तर कारवी फुलते त्या मोसमातला मध हा खूप उच्च प्रतीचा असतो असं जाणकार सांगतात.
नारळ जरी कल्पवृक्ष म्हणुन विख्यात असला तरी कारवीचाही कोणताच भाग वाया जात नाही याकडे कधी कोणी लक्ष दिलंय? मान्य आहे , टिकाऊ लाकूड म्हणून कारवी उपयुक्त नाही. पण दधिची ऋषींनी देवांना शस्त्रं म्हणुन स्वतःच्या अस्थि दान केल्या होत्या अगदी तसंही नसलं तरी कष्टाळू गिरीजनांच्या चंद्रमौळी झापांच्या भिंती होण्यासाठी कधी कारवी स्वतःला शेणा-मातीत लिंपुन घेते. तर कधी त्यांच्या मिठ-भाकरीसाठी यज्ञकुंडातल्या समिधांप्रमाणे स्वतःला चुलकांडात झोकून देते. थकल्या-भागल्या भटक्यांच्या मुखी लागणारा चहाचा पहिला घोट, अन् गरमा गरम पिठलं भातही कारवीचीच मेहेरबानी असते. रानावनातल्या गिरिजनांना तर हिचे अनेक असाध्य रोगांवरील रामबाण अौषधी गुणधर्म देखील चांगलेच माहिती आहेत.
केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या बेलाग पर्वतरांगा हे कारवीचं वसतीस्थान नाही. तर मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि पोषक वातावरण असलेल्या इतरही काही राज्यांतुन कारवीच्या विविध प्रकारांचा टवटवीत फुललेला संसार पहावयास मिळतो. ही आनंददायक माहिती मला नुकतीच मिळालीय. तेंव्हापासुन तर मी हवेतच वावरतोय.
गुलछबु फुलांचा हंगाम गेल्यानंतर कारवी निस्तेज होत असेल असं जर कुणी समजत असेल तर तो निव्वळ गैरसमज आहे. तीच्या आन, बान, शानमध्ये यामुळे काहीही उणावत नाही. मस्त हिरवट-पिवळसर रंगाने ती वर्षभर तजेलदार दिसते. मोजक्या आयुष्याचा भर अोसरल्यानंतर मात्र ती सदेह उत्तुंग पर्वतांच्या छायेत विलीन होऊन जाते. पण या पर्वतकन्येच्या अंगी तिच्या पित्याचं अर्थात् बा सह्याद्रीचं रांगडेपण इतकं ठासून भरलंय कि जणु काही घडलंच नाही अशा टेचात ती पुढच्या हंगामात मागच्यापेक्षाही जोमदारपणे तरारुन येते.
खरं तर या गुणी वनस्पतीचं सखोल, बैजवार संशोधन होणं आवश्यक आहे. काही अज्ञात, उत्तम, उपकारक गुणवैशिष्ट्ये जगासमोर नक्कीच येतील. कारवीचं शास्त्रीय नांव Strobilanthes callosa असं काहीसं मिळमिळीत, निरसवाणंसं असलं तरी आपादमस्तक कारवी बावनकशी देखणी आहे. काही निसर्गप्रेमी हिचा बारकाईने अभ्यास करताहेत असं सद्या ऐकिवात आहे.
या रगेल आणि रंगेल कारवीची उगवणीची त-हा तर खुपच आनंददायी आहे. पहिल्या पावसातला तीच्या बिजारोपणाचा सोहळा मी सांगण्यापेक्षा न् तुम्ही ऐकण्या-वाचण्यापेक्षा तो प्रत्यक्ष पाहणे हा एक अवर्णनीय आनंद असतो. त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.
यंदाच्या वर्षी तर महाबळेश्वर आणि आसपास परिसरात ४ वेगवेगळ्या प्रकारच्या कारवी अभ्यासकांना दिसून आल्या आहेत. एकाच प्रकारच्या मदमस्त कारवीने मला हा लेखनप्रपंच करावयास भाग पाडले. विचार करा चार-चार प्रकारची दणकुन बेफाम फुललेली कारवी पाहतांना जीवाचे काय हाल झाले असतील? तो बेफाम, बेमिसाल नजारा, नजरेत सामावताना, हदयात साठवतांना, आठवणीच्या कप्प्यांत ठासून भरतांना खरंच जीव कातावून गेला असेल. आणि हा अपूर्व सोहळा पाहण्याचे ते आयुष्यातील समृद्ध क्षण असतील यात शंकाच नाही.
अगदी पहिल्यापासुन माझ्या प्रत्येक निसर्गभेटीला अविस्मरणीयतेचा साज चढवणाऱ्या , दऱ्या-डोंगरांना, गड-किल्ल्यांना स्वर्गिय सौंदर्याने मनमुराद सजवणाऱ्या, सह्याद्रीचा कोपरा न् कोपरा कणखरतेने व्यापून त्याच्या संरक्षणासाठी आपलं अवघं अस्तित्वच खर्ची घालणाऱ्या या लाडक्या पर्वतकन्येस मानाचा मुजरा...
ऋणनिर्देश :- लाडक्या कारवीच्या सजावटीकरीता आपली सर्वोत्तम छायाचित्रे देऊन उपकृत करणाऱ्या सर्वश्री संजय अमृतकर, शेखर राजेशिर्के, योगेश अलकेरी, यतिन नामजोशी, निखील हळबे, सुरेंद्र मसुरकर यांचे मनःपूर्वक आभार.













जागतिक पर्यावरण दिनाच्या माझ्या लाडक्या कारवीस मनःपूर्वक शुभेच्छा.
ReplyDeleteसतरा अठरा वर्षांपूर्वी जिवधनला गेलो होतो... पावसाळ्यात...धुक्यामुळे दृष्टीचा परिघ फार कमी.... नानाचा अंगठा काय तर वानरलिंगी दिसत नव्हता... उतरताना कारवीच्या घनदाट पट्ट्यात आलो.... ती ऐन भरात होती.. मग काय काळवेळ देहभान विसरून तिथेच बसलो तो निळा जांभळा उत्सव न्याहाळत... पुढील वेळेची गणितं चुकली... पण ब्रह्मानंदी टाळी वाजलेली... तसाच काहीसा अनुभव सर तुमचा लेख वाचताना झाला. लेख वाचताना मन कारवीसंबधी जुन्या नव्या आठवणीत गुंतते. असामान्य कारवीवर असामान्य लेख. हा 'आनंद'असाच आम्हा भटक्यांना मिळत राहो.
ReplyDeleteरुपेशभाऊ १७/१८ वर्षांपूर्वीचं सोडा... नेहमी फिरते रहा आणि आपले ताजे-ताजे सह्नुयानुभव आठवणीने कळवा...
Deleteहल्ली दोन वर्षांपूर्वीचे आठवत नाही तेव्हा अठरा वर्षांपूर्वीचे कोरलेले कारवीचे सख्य आठवत राहते।
Deleteखरंय रे... कारवी आहेच तशी लोभस अन् लाघवी ... आणि तुझी तर मजाच आहे .. तुझ्या लाडक्या लेकिचंच नांव कारवी ठेऊन तु हे सख्य रोजच अनुभवतोस...तुझी कारवी बारोमास फुलती राहो
Deleteसुंदर करविवर अप्रतिम लिखाण
ReplyDeleteआज पर्यंत कारवी एवढी सुंदर अनुभवली नव्हती, या पुढे तो प्रयत्न नक्की असेल
अभिनंदन
ReplyDeleteThanx Desai Saheb...
DeleteKhup Chan dar varshi amhi sudha experience gheto ani man prasann hote paryavaran divsachya subhecha
ReplyDeleteमामासाहेब तुम्हांलाही पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा...
ReplyDeleteकारवीचा वापर लहानपणापासून पाहत आलो. कारली, शिराळे, पडवळ पानवेली इत्यादीचे मांडव कारवी वापरून बनविले जातात. परंतु कारवीची खरी ओळख सह्याद्रीतील भटकंतीमुळे झाली. घसरणाऱ्या गिर्यारोहकाला कारवीनीच आधार दिला आहे. आनंदरावांच्या ह्या लेखाने हे सर्व आठवले. लेख खूपच माहितीपूर्वक आहे.
ReplyDelete-- सुधीर राऊत
धन्यवाद सर, अत्यंत लोभस अशा कारवीने सा-यांनाच भुरळ घातली आहे...
ReplyDeletesuperb sir,
ReplyDeleteLekhanshaili apratim sir ani aapan shabda saundarya chi ji kahi sundar ashi sangad ghatali ahe lobhasvani ahe ti.
Thanx Yogita...
Delete