मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व अंतिम भाग ४

राजमाता  जिजाऊसाहेब  पुण्यस्मरण.  

रविवार , दिनांक - १८  जून  २०१७.



मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : अंतिम  भाग  ४ 





निर्णायकी झुंज सुरू....






त्या घनघोर आरोहणाच्या पहिल्या तासाभरातच आंम्हांला कळले की आम्ही काय पेलायला निघालो आहोत ? ... तेथील एकंदर परिस्थिती पाहून माघारीचा एक विचार देखील डोक्यांत काहूर माजवू लागला होता... पण आता माघार नाही... आणि का घ्यायची माघार?... भ्यायचे कुणाला?... ज्या शिखराचे नामकरण स्वा. सावरकरांच्या नांवाने होणार आहे त्याला?... छे... छे....ते शक्य नाही... मान उंचावून, एक दिर्घ श्वास घेऊन त्या शिखरराजाचे दर्शन घेतले. मनोमन स्वा. सावरकरांचे, त्यांच्या साहसी कारनाम्यांचे स्मरण केले... शरीराच्या अणूरेणूंना आदेश दिले गेले आणि सुरू झाला एक झुंझार रणसंग्राम....






हे कसलंही युध्द नव्हतं की स्पर्धा.... हे एकप्रकारचं द्वंद्व होतं... स्वतःचं स्वतःशी... इथं कोणी जेता वा पराजित होणार नव्हता... आणि गिर्यारोहण म्हणजे तरी काय हो ?... डोंगरावर चढून... मी चढलो...मी चढलो असा डिंडीम बडवणे ?... मी जेता... मी विजेता असा डांगोरा पिटणे ?.... नाही.... मी तर म्हणेन, अद्भूत निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याचा, निसर्गाला अधिकाधिक जवळून अनुभवण्याचा, त्याला आपल्या कवेत घेऊन गुजगोष्टी करण्याचा तो एक सर्वात शिस्तबध्द आणि सोपा मार्ग आहे.



इथं आपला प्रतिस्पर्धी जरी निसर्ग आहे. त्याला आपण जिंकू शकतच नाही... पण त्यालाही जिंकता येतं ते त्याच्या जवळ जाऊन, भरभरून त्यसच्यावर आभाळाएवढं प्रेम करून. अनादि काळापासून त्यानं आपल्याला फक्त दिलंय आणि आपण? त्याला ओरबाडण्याशिवाय काहीही केलेलं नाहीये.


अपरिमित श्रमाला पर्याय नाही...


आरोहणाच्या खडतर वाटेवर आता सुमारे ६ तास उलटून गेले होते.... काहीही दृष्टीपथात येत नव्हते.... छातीचा भाता आता फुटायला आला होता... या चढाईत फक्त दगड.. दगड आणि दगड... फरक एवढाच काही छोटे काही भले मोठे.... काहींचे बूड तळातील बर्फात घटट् रोवलेले तर काही उथळ... थोडयाशा सूर्यप्रकाशाच्या उबेने देखील बूड सोडून खाली झोकून द्यायला आणि वाटेतल्यांचा कपाळमोक्ष करायला सदैव तयार... या सर्व वेगवान धबडग्यात राहूलच्या छायाचित्रणाच्या आवडीचं आणि कौशल्याचाही कस लागत होता. प्रस्तरारोहण म्हणजे जीव की प्राण असलेला मी देखील चांगलाच एग्झाॅस्ट झालो होतो. कित्तीही थकलो असलो तरी... नो वरी... आमची ध्यासमुर्ती आमच्या समक्ष होती.


दुपारचे १२ वाजून गेले होते. तापमान अद्यापही शून्याच्या आसपास असावं... त्यामुळे आमच्या कॅमलबॅगमधील पाण्याचा संपूर्ण साठा गोठल्याने साधं पाणी देखील आता खूप महागलं होतं. क्षणभर थांबून सॅकमधील काही तरी तोंडात टाकावं म्हटलं तरी तेही शक्य नव्हतं. त्या अस्थिर दगडराशींतून सर्व जामानिमा आणि तोल सांभाळत असतांना अनवधानाने जरी एखादा दगडोबा सुटला तर जो काही कहर होईल त्याची कल्पना न केलेलीच बरी... आयुष्याचा तोल जाणे.... पाय घसरणे.... म्हणजे नेमके काय याचा, याची देही याची डोळा अनुभव घेत होतो. सुमारे दोन हजार फुट उंचीवरून खालच्या दरीतील दृष्य पाहणे नकोसे होत होते. एवढ्यात एक कलिंगडाएवढा दगड सुटावून दरीत झेपावलाच. त्याच्या पडण्याचा आवाज कित्तीतरी वेळ येत होता. सारं खोरं दुमदुमलं.



हिंमतीची परीक्षा अजून चालूच होती... पुढील तासाभरात अचानक प्रस्तरखंडांमधील तो जीवघेणा चढ संपून क्षितीजावर काही हवंहवंसं दिसू लागलं... थकलेल्या गात्रांनीही वेग घेतला... इप्सीत जवळ येवू लागलं.... तसं रात्रीपासून रूसलेल्या हवामानानेही साथ द्यायला सुरूवात केली.... आणि मग कळलं की, आजूबाजूची धुक्यात डोकं खुपसून बसलेली शिखरं आमच्या हालचालींकडे निरखून पहात होती... पश्चिमेकडील विख्यात बडा शिगरी हिमनदीवरील नामांकित शिखरांपैकी सेंट्रल, टायगर टूथ, पापसूरा, धर्मसूरा आणि इतर अनेक पर्वतशिखरांनी आमच्यावर रोख धरला होता... अंतिम टप्प्यातील चढाई सुरू असतांनाच उत्तर पूर्वेला, अगदी शेजारीच एक शिखर तर आनंदाने टाळया पिटण्याच्याच तयारीत दिसून आलं... इतक्यात तो क्षण जवळ आला आणि अघटीतच घडलं... आमचा दोर संपला... पण काही झालं तरी आता माघार नाही... आता आम्ही देखील चांगलेच पेटलो होतो...



आणि मेहनत सफल झाली.....

हीच वेळ होती... आमच्या साहसी कौशल्याच्या प्रदर्शनाची... इतक्या वर्षात कमावलेल्या अनुभवाच्या आजमावण्याची... शेवटचे सुमारे २०० फुटांचे अंतर एकावेळी एकच जण चालू शकेल अशा त्या चिंचोळया, धारेवरील सैलसर चपटया दगडी चिपांवरून तोल सावरत... थकल्या-भागल्या शरीराने चालायचं होतं... आमचा बंगाली सहोदर दिलीप साहू थोडासा गोंधळला... त्याला देवेंद्र आणि मी आमच्या दोघांच्या मध्ये घेऊन ती धार आक्रमण्यास घेतली... गेली ७ तास सोबत करणारी ती विशाल प्रस्तरधार बर्फाळ शिखरमाथ्याच्या कुशीत अचानक बेमालूमपणे लुप्त झाली होती.... सरतेशेवटी तीच्याच सोबतीने दुपारी १ वाजून १० मिनिटांनी देवेंद्र गंद्रे, राहुल दंडवते, दिलीप साहू, संदीप शेट्टी, प्यारेलाल चाचा, नामग्याल नेगी, अमर नेगी, प्रविण, अशोक आणि मी अशा दहा जणांनी शिखरमाथ्यावर पोहोचण्याचा सुलतानढवा केला .... या साहसाची पूर्तता करू दिल्याबद्दल त्या आजवर अजिंक्य, अनामिक अशा शिखरमाथ्याला सामूहिक साष्टांग दंडवतच घातला गेला.



अशा वेळी डोळयांनी शांत रहायचं नसतं. त्यांनी दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आणि उष्ण अश्रुधारांनी माथ्यावरील त्या मऊशार, शुभ्र बर्फावर रांगोळी काढायला सुरूवात केली... स्वा. सावरकरांच्या मार्गदर्शक विचारांची द्वाही जगभर फिरविण्याकरीता हा साहसरथ आता हिमशिखरांवरूनही दौडू लागला होता... लवकरच तो पृथ्वीच्या सर्वोच्च बिंदूवरही जाऊन पोहोचला तर नवल वाटायला नको.



लहरी वातावरणावर विसंबून चालणार नव्हते... फटाफट कॅमेरे चमकू लागले... शिखरमाथ्याला विधीवत श्रीफळ अर्पण केले गेलेेे आणि विविध ध्वज त्या अकलंक, अनाघ्रात शिखरमाथ्यावर सन्मानाने फडकू लागले.... स्वा. सावरकर संकल्पीत मादाम कामांचा पहिला भारतीय ध्वज, प्राचीन वैभवशाली हिंदुत्व आणि शिवरायांचा भगवा.... जनसामान्यांच्या सेवेत अहोरात्र कर्तव्यावर असलेल्या महारा़ष्ट्र पोलीसांचा निळा ध्वज, त्याचबरोबर देशाच्या अस्मितेचा मानबिंदू राष्ट्रध्वज तिरंगा.... सन्मानाने फडकवण्यात आले... हाकेच्या अंतरावरील भव्य असा मा. कर्चा पर्वत, मा. चेमा आणि परिसरातील इतर शिखरेही आमच्या जल्लोषात सामील झाली होती. शिखर सावरकर असं उंची नामाभिधान प्राप्त होणार या आनंदात अनादी काळापासून अनामिक राहिलेला तो शिखरपुरूष देखील नक्कीच गहिवरला असेल.


अत्यंत आनंदाच्या या क्षणी देखील काही विचार मनात उगाच डोकावू लागले... आजची तरूण पिढी आणि साहस यांच्यातील दुरावत चाललेलं अंतर... तरूण हा साहसी असलाच पाहिजे ... आजच्या तरूणांच्या साहसाची परिभाषा मात्र खूप वेगळी आणि नकारात्मक असल्याचे जाणवते... व्यसनांमध्ये थ्रिल शोधणा ऱ्या या माॅडर्न जनरेशनची मात्र किव येते.... गिर्यारोहणच केले पाहिजे असे काही नाही... तरूणाईची रग आणि रेटा प्रचंड असतो, ताकतीचा महापूर असतो... पण ती खरंच चांगल्या, विधायक कामांसाठी वापरली जाते का? हा प्रश्न मोठा आहे... गिर्यारोहण म्हणजे काय? हे ध्यानात न घेता, केलेल्या, घडलेल्या किरकोळ चुकांमुळे होणारे अपघात, होणारी जिवीत हानी .... याला जबाबदार कोण? गिर्यारोहण हे डोंगरात करायचं असलं तरी याला शिकारीचा एक साधा नियम तंतोतंत लागू होतो... ”सशाच्या शिकारीला वाघाची तयारी“ या संकेताचं तंतोतंत पालन व्हायला हवं.... शासन दरबारी देखील गिर्यारोहणासारख्या साहसी खेळांची सतत उपेक्षाच केली जाते.... आता तर दहिहंडीला खेळाचा दर्जा द्यायचा विचार सुरू आहे म्हणे... आनंदी आनंद आहे... आपण मात्र चांगलं तेवढं घ्यावं आणि मस्त डोंगरात फिरून यावं.


शिखरमाथ्यावर बसून, साऱ्यांच्या चेहऱ्यांवरचे भाव आणि मागील ४-६ महिन्यांच्या खडतर सरावाची, अथक तयारीची मेहनत आज फलद्रुप होतांना पाहणे खूपच आनंददायी होते. मोहीम जाहिर झाल्यापासून जीवा-सखा सहयाद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मुंब्रा, माहुली आणि नाणेघाटात सरावाकरीता मारलेल्या फेऱ्या.. अनेक हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थना, त्यांचे आशिर्वाद, कुटूंबियांना वाटणारी काळजी.... मोहिमेत १२ ते १५ किलो वजनासह रोज ८ ते १० तासांची प्राण कंठाशी आणणारी अतिउंचीवरील भटकंती, सहायक सहकाऱ्यांचे अपरिमित कष्ट हे सारं... सारं... डोळयासमोर चलचित्रपटासारखं दिसू लागलं.... त्याचवेळी तिन्ही सांजेला, घरटयाची ओढ लागलेल्या पक्ष्यासारखी आमची स्थिती झाली होती.


शिखरमाथ्याला पुन्हा एकदा वंदन करून माघारी फिरत असतांनाच अचानक क्षणभरच का होईना हिमपुष्पांचा वर्षाव झाला. या वृष्टीमुळे, आमच्या या दुर्दम्य साहसाला साक्षात स्वा. सावरकरांनीच शुभास्ते पंथानः असा आशिर्वाद दिल्याचा भास झाला... आणि ”ने मजसी ने....परत मातृभुमीला“ या ओळींतून महाकवींनी अनुभवलेल्या आर्ततेच्या नादातच आम्ही परतीच्या दिशेने मार्गस्थ झालो....



                                                                                                                                                                                                             धन्यवाद ---- 



7 comments:

  1. हृदय स्पर्शी लेखन👍

    ReplyDelete
  2. धन्यवाद दीपक सर...

    ReplyDelete
  3. आनंद सर,अप्रतिम लेखन

    ReplyDelete
  4. आभारी आहे जयराजजी...

    ReplyDelete
  5. निसर्गाचे अप्रतिम वर्णन आणि तुमचे साहस अद्वितीय

    ReplyDelete
  6. लिपारे साहेब आभारी आहे, आपले प्रेम असेच वाढते राहो..

    ReplyDelete