राजमाता जिजाऊसाहेब पुण्यस्मरण
रविवार , दिनांक - १८ जून २०१७
मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : भाग ३
शिखर सावरकर दर्शन.... आणि शिबीर क्र. १ ची उभारणी ....
तळशिबिर उभारण्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ आॅगस्टला आंम्हांला धीर धरवला नाही. नियोजित शिखर सावरकर दर्शनार्थ आम्ही लगेच सरसावलो. तळशिबिरावरून आरोहण आयुधे आणि आवश्यक खाद्यसामुग्री पाठीवर लादून आम्ही प्रचंड उत्सुकतेने पहिल्या लोडफेरीकरीता कूच केले.
लोडफेरी म्हणजे मोहिमेच्या पुढील वाटचालीकरीता आवश्यक शिधा व साधन-सामुग्रीची मोहिमसदस्यांकडून होणारी वाहतूक. अतिउंची आणि तेथील प्रतिकूल हवामान यांच्याशी एकरूप होण्याकरीता ही एक आवश्यक प्रक्रियादेखील मानली जाते. या पहिल्याच लोडफेरीदरम्यान कर्चा पर्वतकडून येणाऱ्या नाल्याच्या सोबतीने सुमारे तासभर चालल्यानंतर तो नाला दोन भागांत विभागला गेला. त्याचे डावा आणि उजवा असे दोन भाग झाले. ही विभागणी केली होती एका महाप्रचंड शिखरधारेने. या दोन नाल्यांना विभागून त्या घोंघावत्या प्रवाहात पाय सोडुन ती मस्तपणे पहुडली होती. आणि याच शिखरधारेचे उत्तरेकडील टोक म्हणजे आमचे नियोजित ”शिखर सावरकर“.
समोरील डाव्या नाल्याशी आता आंम्हांला काही देणेघेणे उरले नव्हते. त्यामुळे उजव्या नाल्याच्या उजव्या तीराने आम्ही हळू-हळू एक वेगळीच उंची गाठत पुढे निघालो. त्या उंचीवर आम्हीच नाही तर आमचे सखेसोबती मार्गदर्शकांची देखील चांगलीच फॅ....फु... होत असल्याचे दिसून आले.
लोडफेरीच्या पहिल्या तासांभरातच अपेक्षित हिमशिखराचे दुरून का होईना अचानक दर्शन झाल्याने मंत्रमुग्ध झालेले आम्ही साडेचार तासांची पायपीट करून सुमारे ५००० मीटर उंचीवरील शिबीर क्र. १ कधी गाठले ते कळलेच नाही. पूर्वनियोजित शिखर दृष्टीपथात आल्याने आणि शिबीर क्र.१ उभारल्याने मोहिमेचा रथ विजयपथावर आता वेगाने दौडू लागला.
तळशिबिरापासून शिबिर क्र. १ ची ही वाटचाल हा एक मोठा छळ म्हटल्यास वावगे ठरू नये. महायुद्ध काळात हिटलरला जर याची कुणकुण लागली असती तर त्याने छळछावण्या उभारल्याच नसत्या. अगदी चार आण्याच्या नाण्याएवढया आणि त्याहूनही चपटया आकारापासून ते मोठ-मोठाले अवाढव्य शिलाखंड सुद्धा नखशिखांत धार लावून पहुडलेले आणि अस्थिर देखील. त्यांच्यावर चालतांना पाठीवरच्या ओझ्यासह स्वतःचा तोल सांभाळण्याची कसरत करणे हे एक दिव्यच होते. चुकूनही तोल गेला तर एखादया कोळीणीने उभा-आडवा मासा चिरावा त्याप्रमाणे कापले जाणे नक्की होते. एकदोन वेळा अशी वेळी देखील आली पण किरकोळ दुखापतींवर निभावून गेलं हे नशिब.
या दिव्यातून सहीसलामत पार पडावं तर एक खूप मोठा प्रश्न तेथे आवासून उभा होता... पाणी.... हो शिबिर क्र. १ वर पाणीच नव्हतं... अथांग पसरलेल्या या दगडराशी जशा वरून कोरडया तसेच त्यांच्या खालीदेखील पाणी उरले नव्हते.
हा प्रदेश तसा कोरडाच. इथे पावसाचे प्रमाण अगदी अत्यल्प. हवामानात देखील एक कोरडेपण सतत जाणवतो. इथला भुरभुरता बर्फ देखील कोरडाच असतो. कपडयांवर पडला तरी कपडे भिजत नाहीत हे विशेष.. पाण्याचा खूप शोध घेवूनही ते न मिळाल्याने शेवटी अगदी उंचावरून बर्फ आणून त्यांपासून पाणी मिळवले.... आमचे इंधन संपण्याचा एक मोठाच धोका इथे पत्करावा लागला... वरच्या शिबिरांकरीता वेगळे इंधन आरक्षित ठेवूनच ही रिस्क घेतली गेली... तसेच अनेक सदस्यांनी पिण्याकरीता गरम पाण्याचा त्याग करून या प्रश्नावर अंशतः का होईना मात केली.
पहिल्याच लोडफेरीत अतिरिक्त सामानासह केलेली मजबूत तंगडतोड, भयंकर कोरडया हवामानातील दगदग, पाण्याची कमतरता अशा कसरती काहीशा जास्त झाल्याने मोहिमसदस्यांना विश्रांतीची नितांत गरज होती. तसेच मोहिमेचे एक ज्येष्ठ सदस्य श्रीरंग नाडगौडा यांचे आजच तळशिबीरावर आगमन होणार होते. या दोन्हीं महत्वाच्या बाबी पाहता मोहिमनेता देवेंद्र याने आज तळशिबीरावर राष्ट्रीय सुटी जाहिर केली. देवेंद्र नांवाचा अगाध महिमा दुसरं काय ?
अतिशीत हवामानातही मोहिमेचं वातावरण आता चांगलंच तापू लागलं होतं... एक वेगळं गांभीर्य आमच्यात भिनू लागलं होतं... तरी शिबिरांवरील थट्टा मस्करी काही केल्या कमी होत नव्हती... रोज रामप्रहरीच उठून राहूल किचनमधील विकी, अशोक आणि प्यारेलाल चाचा यांना पिडायला एकदम तय्यार असायचा... नाश्त्यापासून दिलीप आणि संदीपची एकमेकांवरील शेरेबाजीच्या बेफाम जुगलबंदीला सुरूवात व्हायची... त्यात देवेंद्र आणि मी असे दोन निष्पाप जीव मात्र उगाच भरडले जात असू...
मोहीमेतील मोठया प्रमाणातील खाद्यपदार्थांची चंगळ आणि सतत त्यावरील रेसिपिंची अनावश्यक बकवास यामुळे हाडाचा आरोहक असलेला बंगाली बाबु दिलीप वैतागून जायचा... ”तुम लोगोंको खाने के सिवा और कुछ दिखताही नहीं क्या?“ संदीप म्हणजे बेंगलोर की चटणी आणि देवेंद्र हा पुण्याचा लाडू असे त्याने नामकरणच केले होते... त्यातही सगळयाच बाबतीत तपशीलवार माहिती सांगण्याच्या सवयीमुळे त्याने संदीपला कुत्सितपणे सांयटिस्ट देखील ठरवून टाकलं होतं... या सगळयातून सतत हास्याचा एक हलकल्लोळ शिबिरांवर तयार व्हायचा...
आंम्हांला एकत्र नांदतांना पाहून, आम्ही सर्वजण पहिल्यांदाच भेटत होतो यावर कोणीही विश्वास ठेवला नसता. इतकं छान आमचं मेतकुट जमलं होतं... तळशिबिरावर हा लेख लिहित असतांना देखील या सर्व चाळीशी उलटलेल्या बालकांच्या गमती-जमती पाहून मला देखील त्यांत सामील होण्याचा मोह आवरत नव्हता... पण या सर्वांगसुंदर अनवट मोहिमेवर लिहिण्यातला आनंद देखील खूप मोठा होता.
मोठी कामगिरी.... शिबिर क्र. २ उभारले....
अतिउंचीवरील अतिश्रमाने आता मोहिमसदस्य जेरीस येवू लागले, पण म्हणतात ना ”हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा“ या न्यायाने आम्ही २० आॅगस्टला सर्व चंबूगबाळं आवरून शिबीर क्र. १ वर शिफ्ट झालो. इतकेच नाही तर पुढील चढाईचा आढावा घेण्याच्या दृष्टीने त्याच दिवशी तात्काळ सुमारे ५४०० मिटर उंचीवरील शिबीर क्र. २ ची काहीशी दुरून का होईना पण पाहणी देखील केली.
दुसऱ्या लोडफेरीहुन तळशिबीरावर परतल्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान असं ठरवण्यात आलं की, मोहिमेच्या तळशिबीरावर आता एक आणीबाणी कक्ष उभारावा. कारण आता वरच्या शिबीरांवर कधी काय होईल? याची काहीही शाश्वती नव्हती. आणि तळशिबीरावरील या आणिबाणी कक्षात दोन निधड्या हिंमतीच्या, अनुभवी, तरबेज शिलेदारांची आवश्यकता होती.
मोहिमेची ही अतिमहत्वाची बाजू लक्षात घेवून अनेक मोहिमांचा अनुभव असलेलेल्या श्रीरंग नाडगौडा आणि राजेंद्र वराडकर यांना ही जबाबदारी देण्यात आली. मोहिमेच्या यशाकरीता या दोघांनीही ही जबाबदारी मोठया आनंदाने स्विकारली आणि अहोरात्र इमानेइतबारे निभावली देखील.
शिबीर क्र. १ वरील दोन लोडफेऱ्यांमुळे यशासमिप पोहोचलेल्या संघाला आता लक्ष्य खुणावू लागले होते. त्यामुळे २१ आॅगस्ट रोजी लगोलग शिबीर क्र. २ पर्यंत म्हणजे मोहिमेतील निर्णायक टप्प्याची लोडफेरी देखील मोठया उत्साहात, साग्रसंगीत पूर्ण करण्यात आली.
शिबीर क्र. १ पासून अथांग पसरलेल्या प्रचंड आणि धार लावून बसलेल्या दगडराशींतून पाठीवरील ओझ्यासह कशीबशी मार्गमक्रणा पूर्ण करावी तर प्रचंड टणक अशा बर्फउतारावरील अघोरी चढाई समोर दत्त म्हणून हजर. त्या खडकाळ बर्फउतारावरील अडचणींना तर अंतच नव्हता. अनेक ग्लेशिअर टेबल्स ( मश्रुमच्या आकाराची नैसर्गिक बर्फरचना) तेथे तयार झाली होती. दिवसाच्या वाढत्या तपमानामुळे ती टेबल्स कधीही कोसळण्याच्या बेतात होती. पायाखालचा बर्फ कितीही टणक असला तरी त्याखालून वाहणा ऱ्या , रक्त गोठविणाऱ्या बर्फाळ प्रवाहाच्या विचारांनीच आम्ही थिजून जात होतो. छुप्या हिमदऱ्यांचा धोका देखील मोठा होता, पण त्यांना भ्यायला, त्यांचा घास व्हायला आम्ही इथे आलोच नव्हतो.
उरात धमक आहे, आणि ध्येयमूर्ती साक्षात शिखर सावरकर समोर आहे, तर मग येवू दे, संकटे कितीही, भिणार आम्ही नाही या आवेशात त्या पूर्णपणे गोठलेल्या हिमनदीच्या पृ़ष्ठभागावर जरा त्यातल्या त्यात बरी व सुरक्षित जागा पाहून शिबीर क्र. २ ची उभारणी केली. तोच हिमवृष्टी आणि चाव ऱ्या आणि वाऱ्याचा बेफाम कहर सुरू झाला. सोबत आणलेली साधनसामुग्री कशीबशी तेथील मोठ्या दगडांच्या आडोशाला व्यवस्थितरीत्या झाकून आम्ही तेथून पळ काढला... तोही, उदया पुन्हा भेटूच... असा सज्जड दम देवूनच.
वाईट हवामानाचा असहकार...
शिबीर क्र. १ वर २२ आॅगस्टचा दिवस उगवला तोच मुळी वाईट हवामानाची लक्षणे घेवून. सर्वत्र धूक्याचे साम्राज्य ... पाउस... आणि साबुदाण्यासारख्या हिमकणांचे बरसणे... आज उन आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. भयंकर थंडीचा सामना करीत आम्हीच त्याला शिबीर क्र. २ वर गाठले. चांगलेच खडसावले त्याला....
दुपारनंतर मात्र हिमवृष्टीने पुन्हा बराच जोर धरला आणि आमच्या धैर्याचा कडेलोट सुरू केला. पण आम्हीही काही कच्च्या गुरूचे चेले नव्हतो, हे त्याला समजायला थोडा वेळ गेला.
शिबिर क्र. २ वरील रात्रीची थंडी निर्दयी होती. मॅट्रेसच्या, तंबूच्या खालूनही शरीराचा संपूर्ण कारभार गोठविणाऱ्या या भयंकर थंडीने आमची झोपदेखील कुठल्या कुठे भिरकावून दिली. थकल्या जीवांना थोडी विश्रांती मात्र नितांत गरजेची होती. त्याचवेळी महान शास्त्रज्ञ कलाम साहेबांच्या शब्दांनी मनात फेर धरला होता. ”स्वप्ने ती नाहीत जी तुम्ही झोपेत पाहता, तर खरी स्वप्ने ती जी तुमची झोप उडवतात“ अशीच काहीशी आमची अवस्था होती.
त्या रात्री झोप अशी आमच्यापर्यंत अालीच नाही. अन् एका साजि ऱ्या दिवसाचा उदयास्त मात्र होऊ लागला होता. २३ आॅगष्ट..... पहाटेचे साडेतीन..... रात्रभरात झोप अशी नाहीच... तपमान जवळ-जवळ उणे १० ते १५.... अगदी कुडकुडत बाहेर येवून पहातो... तर हाय रे दैवा... संपूर्ण खोरे धुक्याने ओसंडून वहातंय.... दुष्यमानता शुन्य... काहीही निर्णय घेणे अशक्य... शेजारच्या तंबूला आवाज दिला.... तर ती भूतंदेखील रात्रभर अशीच जागी...
अशा निर्णायक क्षणी देखील तुमची प्रसंगावधानता जागी असेल तर गिर्यारोहणात एक जादुई शब्द आपल्या मदतीला नक्की धावुन येतो, तो म्हणजे ”कॅलक्युलेटेड रिस्क“... बोलून-बोलून गुळगुळीत झालेला असला तरी या शब्दात जादू नक्कीच आहे. ती वापरता मात्र आली पाहिजे. अशा वेळी आम्ही त्याच जादूचा करिष्मा पहायचा निर्णय घेतला.
Wow
ReplyDeleteThanx sir
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete