ने मजसी ने, परत मातृभूमीला |
सागरा.... प्राण तळमळला ||
सागरा.... प्राण तळमळला ||
या विश्वविख्यात ओळींतील गुढ आर्तता आजही अनुभवता येते. महाकवी विनायक दामोदर सावरकर यांच्या अलवार मनातून या ओळी उतरल्या असल्या तरी पारतंत्र्यात राहूनही जगाचा नेमका ठाव घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे जगातील महान साहस विरांच्या पंक्तीत नक्कीच उजवे होते. अनेक धाडसी कार्यांतून आपली ही वेगळी ओळख त्यांनी अनेकदा सप्रमाण सिध्द देखील केली आहे. ब्रिटीशांच्या कैदेत असतांनाही मार्सेलिस येथे बोटीतून त्यांनी घेतलेली उडी ही पृथ्वीवरील कोणत्याही साहसकार्याच्या तुलनेत अद्वितीय अशीच ठरेल.
५० वर्षे उलटून गेली, तरी स्वातंत्र्यवीरांचे अजरामर साहित्य आणि साहसी कारनाम्यांनी भारावलेल्या पिढया त्या अद्भूत गारूडातून आजही बाहेर आलेल्या नाहीत. सावरकर आणि साहस हे दोन शब्द वेगळे नाहीतच हे दाखवून देण्याचा एक धाडसी प्रयत्न आम्ही काही सावरकरभक्तांनी केला त्याचीच ही साहसगाथा....
२०१५ हे वर्ष स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पणाचं ५०वं स्मृतीवर्ष. या वर्षात स्वा. सावरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादी भव्यदिव्य कामगिरी करण्याची तगमग देवेंद्र गंद्रे या निस्सीम सावरकरभक्तास लागली होती. जानेवारी २०१५च्या सुमारास यावर विचारचक्र सुरू असतांनाच विजेसारखी एक कल्पना अचानक त्याच्या मनात डोकावली. अन् ही धुरा त्याच्यासह काही सावरकरप्रेमींनी अगदी डोक्यावर घेतली.
विजयी एव्हरेस्टवीरांच्या हस्ते शुभारंभ.....
आत्मार्पणाच्या ५०व्या वर्षांत हिमालयातील एखादया बेलाग हिमशिखरावर चढाई करून त्याचं ”शिखर सावरकर“ असं समर्पक नामकरण करण्याची योजना आकार घेवू लागली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संचलीत सावरकर माऊंटेनिअरिंग क्लबने याकामी पुढाकार घेतला. या क्लबचे संस्थापक सदस्य स्व. श्री. विजय मदन यांचे कार्य डोळयांसमोर ठेवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली.
पृथ्वीचा मानबिंदू नगाधिराज एव्हरेस्टवर १९६५ साली पहिला भारतीय विजय नोंदविण्याच्या ऐतिहासिक घटनेचं २०१५ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्त मे महिन्यात स्मारकातर्फे, त्या रणझुंजार पथकाच्या सन्मानार्थ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या भारतीय ऐव्हरेस्टवीरांच्याच हस्ते आमच्या या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेकरीता हा फार मोठा शुभशकून होता.
स्वा. सावरकर यांच्या नांवाने गौरवांकित होणारं हिमशिखर देखील त्याच तोलामोलाचं असणं अनिवार्यच होतं. एखादया सर्वसाधारण शिखराने काम भागणारं नव्हतं. किंबहुना हे भागवायचं किंवा उरकायचं कामच नव्हतं. इथं गाठ होती, विनायक दामोदर सावरकर या बहुआयामी, प्रचंड प्रतिभाशाली आणि धगधगत्या अग्निकुंडरूपी ज्वलंत देशभक्ताच्या अकलंक राष्ट्रभक्तीशी.
हिमशिखर आणि संघनिवडीचे काम फत्ते....
आसेतूहिमाचलाचा शोध घेतल्यानंतर या राष्ट्रकार्याकरीता एका मातब्बर, अजिंक्य, अनामिक हिमशिखराची निवड नक्की झाली.... या महाकार्याचं महत्व लक्षात घेवून जुन्या पिढीतील अग्रेसर महिला आरोहक व स्मारकाच्या सदस्या के. सरस्वती आणि अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिटयुट आॅफ माऊंटेनिअरिंग अॅंड अलाईड स्पोर्ट्स, मनाली या हिमाचल प्रदेश सरकारच्या गिर्यारोहण प्रशिक्षणालयाचे निवृत्त उपसंचालक आणि भारतीयांचे लाडके गिर्यारोहक श्री. राजीव शर्मा यांनी आपला प्रचंड अनुभव आणि सावरकरभक्ती पणाला लावून या कामाचा धडाकाच उडवला. भारतबाला श्रीमती बचेंद्री पाल यांच्या पथकातून ऐव्हरेस्टलाही यशस्वीरीत्या धडक देणा ऱ्या या जोडीने मोहिमेकरीता काहीही उणीव ठेवली नाही.
हिमशिखराच्या निवडीनंतर महत्वाची बाजू म्हणजे नियोजित ”शिखर सावरकर“ या बलदंड शिखराशी झुंजण्याची उत्तम मनोशारीरीक क्षमताधारक जिगरबाज आरोहकांची. ही बाजू देखील देशभरातुन निवडलेल्या ७ ताकदीच्या, कुशल आरोहकांमुळे मजबूत झाली.
शिवछत्रपतींचा खडकांचा न् दगडांचा हा देश कौशल्य अन् कतृृत्वाची देखील खाण असल्याने या संघनिवडीच्या कामालाही फारसा वेळ गेला नाही. हिमालयीन प्रशिक्षणांबरोबरच, प्रत्यक्ष हिमालयातील अनेक नामांकित शिखरांवर यशस्वीरीत्या आरोहणाचा तगडा अनुभव, नुसत्या दर्शनानेही थरकाप उडवणाऱ्या सहयाद्रीतील शेकडो बेलाग कडे-सुळक्यांवरील प्रत्यक्ष चढाई, नियोजन आणि आयोजनातले विशेष नैपुण्यप्राप्त अशा संपन्न संघाच्या पाठीवर अनेक मान्यवरांच्या कौतुकाची थाप होती... आणखी काय हवं? उत्तम संघभावना जपणाऱ्या अन् स्मारकाच्या कामात अहोरात्र झोकून दिलेल्या, अनुभवी देवेंद्र गंद्रे या आरोहकाची मोहिमनेतेपदाकरीता निवड करण्यात आली. संघव्यवस्थापक म्हणून सहयाद्री आणि हिमालयातील भ्रमंतीचा सुमारे २० वर्षांचा अनुभव असलेल्या आणि स्मारकाचे सहकार्यवाह असलेल्या श्री. राजेंद्र वराडकर यांनी जबाबदारी स्विकारली. अशा उमदया मोहिमेच्या चलचित्रणाकरीता एखादया तगडया, संयमी चलचित्रकाराची उणीव, उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि अनुभवी आरोहक असलेल्या राहुल दंडवते याने पूर्ण केली.
स्वा. सावरकर हे कोणा एका प्रांताचे वा समुहाचे प्रतिक नव्हते, तर राष्ट्रीय स्वातंत्र्याचे ते खरे प्रणेते होते. या मोहिमेकरीता देशभरातून संघनिवडीला प्राधान्य देतांना ही बाब प्रामुख्याने लक्षात ठेवण्यात आली. त्यामुळे मोहिमेची घोषणा होताच, महाराष्ट्राचा बंधुप्रांत कर्नाटकातून संदीप शेट्टी याची तर सावरकरांना प्रिय अषा वंगदेषातून दिलीप साहू या तरूण, तडफदार आरोहकांची विशेषत्वाने निवड करण्यात आली.
इथेही पोलीस ?...
अशा मोहिमेत पोलीसांचे काम काय? असा एक प्रश्न उगाच उगवला. याला कारण मुंबई पोलीस दलातील दोन आघाडीचे ज्येष्ठ आरोहक. पोलीस आणि जनता एकत्र आल्यास सर्वसाधारण कायदा आणि सुव्यवस्थाच नाही तर हिमालयातील उत्तुंग हिमशिखरांनादेखील सहज गवसणी घालता येईल. याच विचाराने कुर्ला विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीरंग नाडगौडा तसेच गुन्हे शाखेत कार्यरत आणि यापूर्वी १२ हिमालयीन मोहिमांचा अनुभव असलेल्या आनंद शिंदे अर्थात माझी निवड करण्यात आली. मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. राकेश मारिया आणि गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री. प्रसन्ना यांनी आम्हा दोघांचीही या मोहिमेत सहभागी होण्याची अनावर इच्छा आणि त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम पाहून आमच्या रजेकरीता तात्काळ मंजूरी दिली. अशा प्रकारे स्वा. सावरकरांच्या सेवेत विशेष क्षमताधारक ७ आरोहकांचा एक जबरदस्त संघ तयार झाला.
या सर्व रणधुमाळीवर एक साहसप्रेमी व्यक्ती अहोरात्र नजर ठेवून होती. ती म्हणजे रणजित सावरकर.... स्वा. सावरकर यांचे कनिष्ठ बंधू श्री. नारायण सावरकर यांचे चिरंजीव आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक श्री. विक्रमजी सावरकर यांचे पुत्र रणजित सावरकर. म्हणजेच साक्षात स्वा. सावरकर यांचेच धगधगते खानदानी रक्त. या मोहिमेवर येणाऱ्या प्रत्येक अडचणी त्यांनी अगदी लिलया दूर केल्या. आणि ७ आॅगस्ट रोजी कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, श्री. भारतकुमार राऊत आणि सर्वांच्या लाडक्या श्रीमती के. सरस्वती यांच्या हस्ते मोहिमेचा फ्लॅग आॅफ अर्थात मोहिमेकरीता विजयध्वज प्रदान करण्याचा समारंभ संपन्न झाला.
१० आॅगस्ट २०१५ रोजी मित्र, हितचिंतक, आप्तेष्ट यांनी मोहिमसदस्यांना निरोप दिला. सर्वांच्या आशा, अपेक्षा आणि आशिर्वादाचे गोड ओझे पाठीशी घेवून आम्ही मोहिमसदस्यांनी मुंबईतून दिल्लीमार्गे गिर्यारोहकांची पंढरी मनालीकडे कूच केले. १३ आॅगस्ट रोजी मनालीची ग्रामदेवता माता हिडींबा मंदिरात अष्टकमलदलांकित, चंद्रसूर्यांने तेजोमय तिरंगा हा स्वा. सावरकर संकल्पीत व मादाम कामांनी फडकवलेला हिंदुस्थानचा प्रथम ध्वज फडकवून मोहिमेच्या यशाकरीता आशीर्वाद घेतले. बरोबर १०५ वर्षांपूर्वी याच दिवशी मादाम कामा यांनी हाच ध्वज स्टुटगार्ट येथील आंतरराश्ट्रीय परिषदेत मोठया अभिमानाने फडकवला होता..

अप्रतिम
ReplyDeleteसर आपले आशिर्वाद असेच पाठीशी असू द्या.
Deleteधन्यवाद. आशिर्वाद आपले असूद्यात.
Deleteदि. २८ मे या क्रांतीसुर्य वि. दा. सावरकरांच्या सुवर्ण जन्मदिनाचे अौचित्य साधून तुमच्या blog ची सुरूवात झाली. छानपैकी मन, मत व्यक्त करणारे हे हक्काचे व्यासपीठ तुमच्या लिखाणातून रंजक, प्रबोधन व प्रेरणा देणारे असेल यात शंकाच नाही. मनःपुर्वक खुप खुप शुभेच्छा.
ReplyDeleteधन्यवाद सरिताजी आपली अशीच साथ लाभावी या सदिच्छेसह
ReplyDeleteएक नंबर शिंदे सर
ReplyDeletewe r proud of u
Thanx Vinod, all credit goes to great support from my associates like u.
ReplyDeleteउत्तम गिर्यारोहणा बरोबर उतम लेखन कौशल्य वाखाणण्याजोगे आहे असाच लेखन प्रपंच वाचकांना आपल्या कडून उपलब्ध होवो
ReplyDelete