श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी ... भाग - २
महाद्वाराशी पोहोचताच त्या बुलंद बलिष्ठ बुरुजांना अगदी झुकुन मुजरा केला. या सन्मानाचा तो हक्काचा मानकरीच आहे. अशा रात्रीच्या काळोखभरल्या वातावरणात देखील महाद्वाराची भव्यता आणि देखणेपण भारुन टाकणारं होतं. नजरेच्या मिठ-मोह-या उतरवून टाकाव्यात कि काय असंच काहिसं भारून सोडणारं वातावरण होतं.
रायगडाचं महाद्वार हा महान वास्तुविशेष माझ्यासाठी नेहमीच आकर्षणाचा एक परमोच्च बिंदु होऊन राहिलाय. अगदी पहिल्यांदा रायगड दर्शन केलं तेंव्हापासून एक गुढ संवेदना ईथं आल्यानंतर आपोआपच जाणवते. अंगावर शहारे उठतात. इथल्या सुखद, अकलंक आणि निवांत वातावरणामुळे कधी-कधी असंही वाटतं की या अजस्त्र वास्तूतच रायगडाच्या गडपुरुषाचं ठाणं असावं. त्या महापुरूषाला गडापेक्षा इथला सहवास जास्तच आवडत असावा. आणि म्हणूनच माझ्यासारख्या गडभटक्याला रायगडाला भेट दिल्याच्या समाधानाची पहिली पावती इथंच मिळते.
या वास्तूत काहीतरी जादू नक्कीच आहे. मला चांगलंच आठवतं... एकदा रायगडाच्या तिनही कड्यांच्या आरोहणाकरीता गडावर येणं झालं होतं. २५०/३०० किलो साधनसामग्रीची जाम गर्दी झाली होती. आणि रोपवेने येण्याशिवाय गत्यंतरच उरलं नव्हतं. काही इलाजच नव्हता. त्यामुळे मनावर भलामोठा दगड ठेऊनच हे (कु)कर्म केलं होतं. पण त्याही वेळेला मी गडावर पोहोचताच भारल्यासारखा वायुवेगाने महाद्वारी येऊन गेलो. काय करणार ? इथल्या पवित्र मातीची धुळ कपाळी लावल्याशिवाय चैनच पडत नाही. कारण इथल्या मातीत स्वराज्यसुर्याच्या पदचिन्हाचं शिवतेज विखुरलंय. तिला स्पर्श झालाय तो साक्षात युगपुरुषाचा. हि माती आम्हां भटक्यांसाठी साधीसुधी नाही तर एका प्रचंड ऊर्जेचा अखंड स्त्रोत आहे.
किती तरी वेळा गड चढाईदरम्यान शिवछत्रपतींनी काही क्षण का असेना इथं विसावा घेतला असेल. त्या जाणत्या राजाने पालखीच्या भोयांसह इथल्या पहारेदार, तटावरील धारकरी, त्यांच्या पोराटोरांची लेकिसुनांची ख्याली-खुशाली पुसली असेल, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले असतील. चांगल्या कामगिरींच्या बक्षिशीसाठी मोहरांचा कसा इथं रिता केला असेल. महाद्वाराच्या अवाढव्य भिंतींवर ती करारी, भेदक नजर मायेेच्या ओलाव्याने परत परत अंतर्बाह्य फिरली असेल. महाद्वाराला बांधणाऱ्याचं, त्याला राखणाऱ्यांचं राजांनी तोंडभरुन कौतुक, कैकवेळा इथंच केलं असेल. त्या अजस्त्र बलाढ्यपणाकडे पाहुन त्या शिवावताराने इथल्या चिऱ्या-चिऱ्यावरुन आपला वरदहस्त प्रेमाने फिरवला असेल. त्या स्वर्गीय स्पर्शाने तो जडशीळ पत्थर देखील शहारून उठला असेल. काय आणि किती तरी गोष्टी इथं घडल्या असतील त्याची मोजदादच नाही. आणि याचमुळे महाद्वारात आल्यानंतर काहि गुढ संवेदनांची आपोआप जाणीव आजही होते.
कितीही रात्र, कोणतीही वेळ असली तरी महाद्वारात का कोणास ठाऊक कधीच भय वाटलं नाही. भटकंतीला सुरूवात केल्यानंतर, खुप वेळा मी इथं रात्री-बेरात्री आणि एकटाही आलोय. पण इतरत्र जाणवणारी असुरक्षिततेची भावना या काळ्याकभिन्न बुरुजांच्या सान्निध्यात यायला धजावत नाही. त्या जुळ्या, बळकट बुरुजांच्या बलदंड बाहुपाशात आणि जपमाळेच्या गोमुखी आवरणासारख्या स्थापत्यरचनेच्या अंतरंगात असतांना तर साक्षात त्या गडरूपी पुराणपुरुषाच्या छत्रछायेखाली अत्यंत सुरक्षित असल्यासारखं वाटतं.
एक बरंय कि हि वास्तु महाद्वार असल्याने गडभेटीत प्रथम दर्शन याचंच होतं. आणि याचं दर्शनच असंय कि कितीही थकलेल्या तना-मनाचा कणन् कण अगदी सुखाऊन जातो.
माझ्या अल्प-स्वल्प ज्ञानानुसार खरं तर स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यावेळी गडाची महाद्वाराकडची ही उतरती बाजू खरं तर एक मोठी ऐब म्हणजेच कमजोरी असणार. अन् गनिमांच्या हल्ल्यात गडाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरणारी देखील. पण तिच्या त्या उताराच्या खोलगट भागात महान हिंदवी स्वराज्याच्या राजधानीला साजेसं अतिभव्य महाद्वार ज्या चपखलपणे उभारून गडाला जे परमोच्च वैभव मिळवून दिलंय याची तोड जगात कुठेही मिळणार नाही.
महान स्वराज्याच्या त्या जाणकार स्थपतीने, हिरोजी ईंदुलकरांनी याच्या उभारणीत आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचं सारसर्वस्वच नव्हे तर थेट आत्माच अोतलेला दिसून येतो. उगाच राजधानीचा कोट म्हणून अगडबंब पसारा अशी त्याची बांधणी नाही. तर फार सखोल विचाराअंती हे बांधकाम आणि विलक्षण मोहक अशी रचना केलेली आहे. खरं तर रायगडाचं स्थापत्य हा एक स्वतंत्र अभ्यासाचा गहन विषयच आहे. पण ते अजब-गजब वास्तू अंगावर घ्यायची कुवत मात्र हवीच हवी.
अस्सं रांगडं, देखणं अन् भव्यदिव्य महाद्वार भारतातच काय तर जगाच्या पाठीवर कोणत्याही डोंगरी किल्ल्याला निश्चितच नसेल. सन १८१८ च्या आसपास महाराष्ट्र काबिज करतांना अनेक डोंगरी गडकोटांना इंग्रजांचा सुरूंगरुपी नाग डसला. त्या विखारी दंशाने अनेक देखण्या गडांच्या वाटा-वास्तुंनी दम तोडला. पण रायगडाच्या या बळीवंत, लढवय्या महाद्वारापुढे तर त्या परकिय नागाचाही फणा नतमस्तक झाला असणार... भव्यतेचे भोक्ते असणारे इंग्रज याचा बेसुमार आवाका पाहुन अवाकच झाले असतील. आणि म्हणूनच याला हात लावायची त्यांची छाती झाली नाही... किंवा छत्रपतींनी उभारलेल्या अशा देखण्या वास्तुमंदिराचा विध्वंस करायला त्यांचंही मन धजावलं नसेल. आमच्या महान राजाची किरत आहेच तशी मोठी.
इथं आलं कि गड चढून आल्याच्या समाधानाने अंगचा रोम रोम पुलकित होऊन उठतो... हे समाधान रोप वेने आलेल्यांना मात्र लाभत नाही. एखाद्या मंदिरात मागल्या दाराने किंवा चोरपावलाने आलेल्यांसारखीच त्यांची अवस्था असते... आजारी, हतबल, वृद्ध, महिला आणि मुलांना वगळले तरी हट्टेकट्टे पुरुष अन् आजच्या तरुण समजणा-या मंडळींना रोपवेने वर येताना पाहुन त्यांच्या तारुण्याची किव आल्याशिवाय रहात नाही. सांगणं एवढंच कि रणमर्दांचा रायगड पहायला मर्दानी वाटेनेच यावं, असं मागल्या दाराने प्रवेश करायला आपण का बाजारबुणगे आहोत ?
रोपवेचा एक किस्सा सहजच आठवला म्हणुन नमुद करतो. आमचा मोठा मुलगा कु. आदित्य जेमतेम चार महिन्यांचा असतांना त्याला शिवसमाधीवर घालायला न्यायचं ठरवलं. घरातुन फार कोलाहल झाला. पण मागं हटलो नाही, कि विचारही बदलला नाही.
पत्नी सरिताला याबाबत विचारलं तर ती एका पायावर तयार. सिझेरियन झालेल्या परिस्थितीत ही आमची सईबाई (तिचं जन्मनांव खरंच सईबाई आहे ) चार महिन्यांच्या तान्ह्या लेकराला उराशी कवटाळून उभा रायगड, कसलीही सबब न सांगता चढून गेली. मी रोपवेचा पर्याय विचारला तर म्हणाली "अजून इतके काही वाईट दिवस आले नाहीत माझे. तुम्हांला जायचंय तर जा रोपवेने मी व माझा लेक, राजांच्या अन् त्यांच्या रायगडाच्या दर्शनाला गड चढुनच जाणार". यावर मी काय बोलणार? हि सारी किमया त्या थोर राजाची आणि जीवही अोवाळुन टाकावा अशा दुर्गदुर्गेश्वराची... असो...
महाद्वाराशी काही वेळ विसावल्यानंतर गडात प्रवेश करण्यास सज्ज झालो. प्रवेशद्वारी नव्यानेच बसवलेला अप्रतिम रणमस्त कलाकारीचा भव्य लाकडी दरवाजा पाहून खुप आनंद झाला. अगदी शिवकालानुरुप बनवलेला हा दरवाजा महाद्वाराच्या वैभवात चांगलीच भर घालणारा आहे. यापुढे गडाचे दरवाजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार आणि शिवकालीन प्रथेनुसार उघड-बंद होणार असं दिसतंय. आता गडावर कधीही येण्या-जाण्याची आपली राजेशाही मिजास बंद होणार याचं मात्र भारी दुःख झालं.
महाद्वार भेटीचा कौतुकसमारंभ आवरेपर्यंत रात्रीचे अकरा वाजत आले होते. दाट धुकं, झिरमिर पाऊस आणि गच्च काळोखाने इथं आमची चांगलीच फिरकी घ्यायला सुरुवात केली. फक्त पायाखालच्या वाटेशिवाय काहीच नजरेत येत नव्हतं. गडावर लागलेले दिवे धुकंभरल्या काळोखामुळे खुपच लांबवर लागल्याचे भासत होते.
शेवटी धुकं आणि काळोखात चाचपडत का होईना महत्प्रयत्नानंतर एकदाची आमची स्वारी गडावर दाखल झाली. जिल्हा परिषदेच्या निवासस्थानांजवळ मोठी लगबग उडाल्याचं दिसून आलं. श्रीशिवराज्याभिषेक समितीतर्फे दरसालाप्रमाणे गडावर आलेल्या शिवभक्तांच्या दोन दिवसांच्या पोटापाण्याची सोय लावली जात होती. रात्रभर गडावर येत असलेल्या आणि दुसऱ्या दिवशी मुख्य सोहळ्यात सामील होणाऱ्या शेकडो मावळ्यांच्या भोजनाची सोय करणाऱ्या या समितीचं करावं तेवढं कौतुक कमीच होईल. यंदाच्या वर्षी तर दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने देखील या समितीच्या कार्यात मोठा हातभार लावून आपले भरीव योगदान दिले होते.
गडावर आल्यानंतर शिवप्रेमींच्या भेटीगाठी आणि विचारपूस करण्यात मध्यरात्र कधी झाली ते कळलंच नाही. ऐवढ्या रात्रीसुद्धा अाल्या-आल्या मला गड पहायची इच्छा होती. म्हणून लगोलग पोटात गरमागरम पुलाव्याचे चार घास झटापटीने कोंबले. सोबतच्या गड्यांनीही गडफेरीच्या प्रस्तावाला लगेच मान्यता दिल्याने तडक निघालो. तेंव्हा पावसाचा मंदगतीने शिडकावा सुरूच होता.
झेडपीच्या निवासापासून पासून वर चढत शिर्काईचं छान सजवलेलं राऊळ उजवीकडे ठेवत होळीचा माळ गाठला. आमच्यासारखेच काही निशाचर मावळे त्या माळावर मौजेत भटकताना दिसले. तर काहीजण माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ होते. गडाचेच नाही तर तमाम स्वराज्याचे धनी असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अशा उघड्या बोडक्या माळावर दिलेली हि जागा मनाला नेहमीच सलते. वेळ पडल्यास जन्मदात्यालाही घराबाहेरचा रस्ता दाखवतील अशांकडून अपेक्षा ती काय ठेवायची ?
शिवप्रतिमेची ती जागा कशीही असली तरी पण राजांचा हा पुतळा मात्र केवळ सुखद, अवर्णनीय असा आहे. हा पुतळा त्या माळावर चैतन्य आणतो. तिथल्या सा-या आसमंतात जान आणतो. या सर्वांगसुंदर शिवपुतळ्यामुळे तो उजाड, वैराण होळीचा माळ मात्र पावन होऊन गेला.
त्या पुतळ्याचा महिमा काय वर्णावा ? त्यातील शिवरायांची भेदक नजर आरपार जाऊन समोरच्या बाजारपेठेतून पलिकडील गगनचुंबी पर्वतशिखरांवर फिरुन घे-यातील रहाळाचा अदमास घेत असते. त्याचवेळी नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या काळनदीच्या खो-यातील कोकणदिवा, लिंगाणा, बाजारपेठेच्या पलीकडे दिसणारा गडदेव जगदीश्वर अन् त्याही पलीकडुन साद घालणा-या जिवासखा राजगड-तोरण्यावरही महाराज नजर फिरवतसत कि काय ? असं वेड लावणारं दृश्य इथं दिसतं.
तेथून सरळ निघालो तो नगारखान्यासमोर येऊन थबकलो. अहाहा... काय तो थाट न् काय ती अदब ? अख्खा नगारखाना कसा नखशिखान्त नवरदेवासारखाच सजलेला होता. अन् का सजु नये त्यानं ? या राज्याभिषेक सोहळ्याचा तोच तर खरा यजमान होता. प्रत्येक खाशा स्वाऱ्याच नाही तर आलेल्या प्रत्येक आम आदमीचंही स्वागत तो तितक्याच अगत्याने करीत होता. नगारखान्याचा कोपरा न् कोपरा रंगबिरंग्या फुलमाळा न् रांगोळ्यांनी सुशोभित झाला होता. आत येणारा प्रत्येकजण नगारखान्याच्या पायरीला वंदन करूनच प्रवेशत होता. आत पहारेकऱ्यांच्या देवडीत काही जण मावळ्यांच्या वेशात आगत-स्वागत करतांना दिसले. सारं काही कसं शानदार न् जानदार वाटत होतं.
आस्ते-आस्ते नागारखान्यातुन मोठ्या अदबीनं राजसदरेच्या अंतर्भागात प्रवेश करते झालो. आतील दृश्य पाहुन तर खरोखर स्तिमितच होऊन गेलो. शिवभक्तांच्या या आनंदसोहळ्यात पावसाचं विघ्न येऊ नये म्हणून इतक्या अवाढव्य सदरेवर मंडप घालुन सदरेला चांगलीच शोभा आणली होती. त्या मंडपाखाली जमिनीवर अंथरलेल्या आच्छादनावर भक्तगण बैठक घालुन बसले होते. हजारोंचा समुदाय शिस्तबद्धरित्या बसून अशा मध्यरात्रीला शिवचरित्राख्यानाचा आनंद घेतांना पाहुन अंगावर रोमांच उठल्याशिवाय राहतील काय ?
राजसभेच्या मधोमध शिस्तबद्धरित्या मोकळ्या सोडलेल्या मार्गिकेतुन तसेच पुढे जात थेट सिंहासनाच्या चौथ-याजवळ आलो. अशा मध्यरात्री तो चौथरा सोन्यासारखा झळकायचाच काय तो बाकी राहिला होता. आणि झळकायला तो दिसायला तर हवा ना ? अनाम सजावटकारांनी त्याला सजवतांना कसलीही उणीव म्हणून सोडली नव्हती.
एखाद्या स्वर्गीय राजसभेतच आल्यासारखे वाटत होते. चौथ-याच्या खालच्या मोकळ्या जागेत आमच्या पंकज भोसलेच्या शिवमय कुटुंबसदस्यांनी कवीराज भुषणरचित खड्या बोलीतलं अप्रतिम शिवाख्यान चालु ठेवले होते. आणि सदरेत जमलेल्या शेकडो शिवभक्तांकडुन अगदी शांत चित्ताने ते श्रवण केले जात होते. आणि विशेष म्हणजे बाहेर पावसाच्या मंदशा रिपरिपीनेही त्यावर मस्त ताल धरला होता.
चौथ-याच्या वरच्या भागात सिंहासनाधीश्वर शिवछत्रपतींचा विरासनातील पुतळा विराजला होता. त्यांच्या बैठकीसाठी उभारलेल्या राजमंदिराचं तर पुष्पमंदिरातच रुपांतर झालं होतं. कसलेल्या कसबी कलावंतांनी अवर्णनीय अशी पुष्परचना करुन रंगांची मस्त उधळण केली होती. त्या मखरात विसावलेला आमचा दिगंत कीर्तीचा, फुलांइतक्याच कोमल हृदयाचा दिगंत किर्तीचा आमचा राजा समोर जमलेल्या रयतेकडे अभिमानाने पहात असल्याचे ते दृश्य नजर लागेल असंच होतं.
आंम्हां दोघांना आता, मोटारसायकलवरुन मुंबई सोडल्यापासून आता सुमारे १७ तास उलटून गेले होते. शरीरातला विश्रांतीचा अलार्म घणघणायला केंव्हाच सुरुवात झाली होती. तरी राजसदरेवरच्या त्या भारलेल्या वातावरणातून निघायला मन काही तयार होत नव्हतं. त्याला कसंबसं बाबापुता करुन, समजूत काढून एमटीडीसीच्या विश्रामस्थळावर आणलं. आणि काही वेळासाठी का होईना थकल्या शरीराला विश्रांती दिली.
दुस-या दिवशी मात्र पक्ष्यांच्या गुंजारवाने भल्या पहाटे रामप्रहरीच तयार होऊन पुन्हा एकदा जोरदार उत्साहातच बाहेर पडलो. होळीचा माळ, नगारखाना व राजसदरेवर जनसागराचं उधाण आलं होतं. सारा आसमंत श्रीशिवघोषाच्या नादानं दुमदुमत होता. छत्रपतींच्या वैशिष्टयपूर्ण बिरुदावल्या ऐकून शरीराचा रोम-रोम सुखाऊन जात होता.
राज्याभिषेकाच्या समंत्र विधीकरीता अनेक ठिकाणाहुन आलेल्या ब्रम्हवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारणाने तेथील वातावरण भारुन गेलं होतं. कोल्हापुरच्या राजघराण्यातील वंशज असलेल्या राजे यांचे हस्ते तेथे वेगवेगळ्या धार्मिक विधींकरीता मांडलेल्या धातुच्या पुतळ्यावर राज्याभिषेकाच्या मंत्रविधींचा शुभारंभ झाला.
गडावरील गंगासागराच्या परम पावन जळाभिषेकाबरोबरच दह्या-दुधाची स्नानादि विधिही आमंत्रण सुरू होते. अनेकप्रकारचे गंध, चंदनादि लेप आणि अत्तरांच्या परिमळाने तर सारी राजसभाच सुगंधित होऊन गेली होती. राजांच्या सेवेतील ब्रम्हवृंदांची लगबग पाहण्यासारखी होती. त्याचवेळी सदरेवर काही तरुण मावळ्यांच्या वेशात तेथे अदबशीरपणे उभे राहून आपली दरबारी सेवा बजावत होते. करारी चेहरा, पिळदार मिशा, बाराबंद्यांची बंधन तटतटतील अशा मर्दानी छात्यांचे ते वीर मावळे पाहुन आपण खरंच शिवकालात तर नाहि ना आलो ? असंच वाटून गेलं.
तिकडे होळीच्या माळावर तर आणखी मोठा जल्लोष सुरु होता. अनेक ठिकाणच्या ढोल पथकांंमार्फत आपापल्या कलेचा नजराणा शिवचरणी सादर करण्यासाठी चुरशीची चढाओढच सुरु केली होती. त्या ढोलांचा एक अपुर्व असा नाद त्या माळावर अवतरला होता. त्याच तालावर काही शिवकालीन शस्त्रपारंगत मंडळींनी उपस्थितांसमोर तलवार, भाले, दांडपट्टयांचे हात दाखवून डोळ्यांचे पारणे फेडले. आजच्या मिसाईल युगातही या पुराणकालीन शस्त्रांवरली त्यांची पकड आणि कौशल्य जबरदस्त होते. विविध प्राचिन हत्यारांनी त्या मावळ्यांकडुन दाखविण्यात आलेली ती प्रात्यक्षिकं डोळ्यांच्या पापण्या लवु देत नव्हती. आज राजे असते तर नक्कीच त्यांच्यावर सोनमोहरांची तुफान उधळण झाली असती.
असा सगळा अानंदसोहळा होळीच्या माळावर सुरु असतांनाच, राजसदरेवरील अभिषेकाचा सोहळा संपन्न होऊन शंख, कर्णे, तुता-यांच्या नादात महाराजांची पालखी गडदेवतांच्या दर्शनाला निघाल्याची इशारत झाली. सारा सारा जनसमुदाय त्या अपूर्व अशा पालखीसोहळ्यात सामील झाला होता. श्रीजगदीश्वराच्या मंदिराकडे निघालेला तो रयतेचा सागर पाहून चंद्रभागेच्या वाळवंटी तीरावर जमलेल्या भागवत भक्तांच्या महामेळ्याचीच आठवण होत होती...
श्रीशिवरायांना "पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ राजा" असं संबोधलं जातं तर शिवराज्याभिषेक हि जगाच्या मानवी इतिहासातली एक महान घटना मानली जाते. आणि अशा विश्वविख्यात सोहळ्याच्या समारोपप्रसंगी जयजयकारी आरोळ्यांच्या आनंदसोहळ्यात नखशिखांत डुंबून गेलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड पाहणं हे तर अापल्या आयुष्यातील अत्यंत समृद्ध क्षण म्हणून कायमचे नोंदले गेले.
कदाचित आपल्या लाडक्या पुत्राला, सह्याद्रीची किर्त जगात गाजवणा-या छाव्याला, अभिषिक्त महाराजा झाल्याचा हा सोहळा पाहिल्यानंतर आता काहीही पाहू नये असंच झालं असेल... आणि म्हणुनच जिजाऊ माँसाहेबांनी अवघ्या १२व्या दिवशीच अत्यंत कृतार्थ आणि भरल्या मनाने इहलोकाचा निरोप घेतला असावा.
देवांनीही हेवा करावा असं स्वराज्यच नाहि तर सुराज्य घडवलेल्या, जगाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ आणि रयतेचा राजा अशी दिगंत कीर्ती लाभलेल्या शिवछत्रपतींना राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानाचा त्रिवार मुजरा...

No comments:
Post a Comment