श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी -भाग १

श्रीशिवजयंती
दिनांक १९ फेब्रुवारी २०१८.
स्थळ  - शिवमंदिर, किल्ले  माहुली  पायथा , जि - ठाणे.

श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी भाग - १

मुंबई ते  किल्ले रायगड… मोटारसायकल स्वारी...

न भरातल्या कडकडीत उन्हाचा ६ जूनचा दिवस. जूनच्या सुरुवातीचं हे उन तर मेपेक्षाही भयाण जाणवत होतं. तशातच आव बघितला ना ताव. त्या तिक्ष्ण उन्हातच भर दुपारी आम्ही दोघांनी मोटारसायकल सुसाट भिरकावली.

ऐनवेळी प्रवासाची इतर कोणतीही सोय होण्याची लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे महेशसरांनी मोटार सायकलवरुन किल्ले रायगड गाठण्याच्या प्रस्तावाने अगदी हायसं वाटलं.

अजिबात वेळ न दवडता मुंबईतून दोघंही टाकोटाक अन् सुसाट निघालो. पनवेल, पेण, वडखळ अशा मजला मारीत सायंकाळच्या आसपास माणगाव जवळ करीत असतांनाच पावसाने भाॅ... s...s... करण्यास सुरुवात केली


रायगडाचा धारकरी... पाऊस...


एक बरं होतं कि, अाम्ही जसजसे रस्ता कापत होतो, पाऊस आमच्या पुढे पुढेच पळत होता. यावेळी का कोणास ठाऊक तो नेहमीसारखा तिरपीट उडवणारा, खोडकर नाही वाटला. तर त्याच्या येण्याने आमच्या कार्यात बाधा येऊ नये याची मनोमन काळजी घेणारा दिसला. आज तोही जणू रायगडाचा धारकरीच झाला होता. खुपच खुश झाल्याने त्याच्या मेघमल्हाराला आज अवर्णनीय असा सुर, ताल आणि लयही गवसल्याचे दिसत होते.

श्रीशिवराज्याभिषेक सोहळ्याकरीता आंम्हांला इतमामाने घेऊन जायला आलेल्या एखाद्या खास यजमानासारखाच तो वावरत असल्याचेही जाणवले. त्यामुळे आम्ही पोहोचण्यापूर्वीच सगळीकडे अवीट आनंदाची बरसात करत तो आमच्या पुढे निघाला होता. केवळ मनोरंजनासाठीच म्हणून कि काय आंम्हांला तो पाठशिवणीचा एक मस्त खेळही खेळवत होता.

जगाच्या इतिहासातील एका सर्वश्रेष्ठ राजाचा राज्याभिषेक सोहळा पाहण्याची आस जीवाला अश्शी लागली होती की मन तर पाखरू होऊनच केंव्हाच उडु लागलं. अन् विलंबाला जागाच ठेवली नसल्यामुळे मिळेल तसा तडक निघालो होतो. कधी एकदा सर्वांग सजलेला, जाणत्या राजाच्या रयतेने फुलून गेलेला दुर्गेश्वर पाहतोय अस्सं होऊन गेलं होतं.

ज्ञानदानाच्या व्यवसायकार्यात असले तरी उभा आडवा सह्याद्री पिंजून काढण्याचा मनसुबा कायम जागरुक ठेवणारे उच्चविद्याविभुषित महेश कुलकर्णी सर आमच्या दुचाकीचं सारथ्य करीत होते. दादरच्या स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या भव्य संकुलात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परिक्षार्थ्यांकरीता त्यांचा ज्ञानयज्ञ अव्याहत सुरु असतो. शिवाय मोटारसायकलवरुन देशभरात अमाप भटकंती करण्याचा रग्गड अनुभव गाठीशी असल्याने हे परिवहन खातं त्यांच्याकडेच असलेलं बरं असा विचार करुन मी मागे बसून हिरव्याकंच कोकणसफरीचा आनंद लुटायचा मार्ग पत्करला.

रायगडाच्या घे-यात प्रवेश करेपर्यंत केवळ सुखाची बरसात करणाऱ्या पावसाचा मानाचा पाहुणचार स्विकारतच आम्ही चितदरवाजा गाठला. वरूणराजाचा तर आमच्या महाराजांवर अमाप जीव. म्हणूनच तर या महान सोहळ्यासाठी अक्खा गड न् सा-या गडवाटा त्याने आपल्या स्नेहाने न्हाऊ-माखून घेतल्या होत्या. अगदी चंद्र-सुर्याचं लिंबलोणं करुन या राजावरून ओवाळून टाकलं तरी समाधान व्हायचं नाही असा प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस आमचा राजा.

गडपायथ्याशी पोहोचताच, आम्हांला सहीसलामत पोहोचविण्याचे सत्कार्य करुन दमल्या भागल्या दुचाकीला, एका सुरक्षित ठिकाणी लावुन मस्त विश्रांती दिली. वेळ न दवडता, प्रवासात अस्ताव्यस्त झालेला जामानिमा सरळ करुन घेतला.


धुंद-कुंद हवामानाची साथ अन् काजव्यांची करामात...


आकाशाकडे पाहुन हवामानाच्या लहरींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. पण चांगलंच झाकोळुन आल्याने काहीच अंदाज लागला नाही. चित दरवाजाच्या पहिल्या पायरीजवळ आलं कि, का कोणास ठाऊक पण अंतरी जागृत होणारी नेहमीची एक वेगळीच संवेदना याही वेळी मी शांतपणे अनुभवली. हे काय असतं ? कुठून येतं ? या फंदात मी आजवर पडलो नाही न् पडणारही नाही. गडाच्या पहिल्या पायरीजवळ येऊन तिला श्रद्धेने हात लावला. हाताला लागलेले ते देवकण भाळी लेऊन, महाराजांचं स्मरण करीत आस्ते-आस्ते गडचढाईचा छान शुभारंभ केला.

रात्रौ जवळपास आठचा सुमार. मस्त धुंद-कुंद वातावरण. ढगांमध्येच रूतलेला असुनही आणि नांव चंद्रराव असले तरी आडमुठ्या ढगांना बाजुला सारत त्याने गडावर मंदसा, शितल प्रकाश कायम ठेवला होता. स्वराज्यस्वामींच्या राज्याभिषेकाला येणाऱ्या भक्तांना कोणत्याही प्रकारची तोषिस लागू नये हि उदात्त भावना त्या रजनीनाथानेही मोठ्या अौदार्याने जपलेली दिसत होती.

वातावरणात मस्त गारवा तर होताच पण नेहमी गडावर त्रास देणाऱ्या खोडसाळ वाऱ्यानेही त्यात बोचरेपणा येऊ न देता स्वतःला एका संथगतीत झुळझुळते ठेवले होते. क्षणभर आपण पृथ्वीवरच आहोत ना? चुकून स्वर्गात तर नाही ना आलो ? असा भास होऊन गेला.

रायगड म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच नाही का? रयतेच्या जाणत्या राजाची राजधानी स्वर्गाहुन कमी का असेल? कदापि नाही. ज्याने नामवंत आणि गर्भश्रीमंत शाह्यांना त्यांची असली अौकात दाखवली, ज्याच्या श्रेष्ठत्वापुढे तर देवांनीही हेवा करावा अशा राजाची राजधानी स्वर्गाहुनही रम्यच म्हणावी लागेल.

गडपरिसराला मंत्रून टाकणाऱ्या, अत्यंत मनोवेधक वातावरणाची निर्मिती करणाऱ्या समस्त निसर्गतत्वांना मनोमन दुवा देत असतांनाच एका विलक्षण अपूर्वाईने लक्ष वेधून घेतलं. खुब लढा बुरूज ओलांडून थोडंच अंतर काटलं होतं. डावीकडील दरीसदृश उतारावरून कोणी लुढकु नये म्हणून लोखंडी रेलींग लावल्या होत्या. या रेलींगपलीकडच्या उतारावरील झाडी-झाडोऱ्यातुन काजव्यांनी पसरलेल्या चांदणचुऱ्याच्या हलक्याशा सोनपिवळ्या प्रकाशाची मस्त आभा मनाला उल्हासीत करुन गेली. सांजवातीने फुललेला प्रसन्न प्रकाश पाहून मरगळलेलं मनही कसं प्रफुल्लित होतं, अगदी तस्संच झालं. ते मनोहारी दृश्य डोळे पहात होते, पण कसं कोण जाणे पायांना त्वरित थांबण्याच्या आज्ञा सुटल्या. निसर्गदिव्यांनी केलेली ती शितप्रकाशाची उधळण मनमोराला अक्षरशः डोलायला, नाचायला लावणारी होती. सारं जग काही क्षणासाठी थांबलंय की काय असंच वाटून गेलं.

आम्ही पोहोचण्यापूर्वीच पावसाने पुरेसं बरसुन, प्रवासात त्याच्याशी लपंडाव, पकडा-पकडी आणि हुतुतु खेळल्याची बक्षिशी म्हणुन या नितांत सुंदर अशा अंतरीच्या ठेव्याची आमच्यासाठी गडभर पखरण केेली होती. उल्हासित झालेल्या माझ्या मनाने तो स्वर्गीय नजारा आधाशीपणे टिपायला सुरुवात केली.

काजवा... एक सामान्य, निरूपद्रवी किटक असला तरी त्यालाही शिवसोहळ्याला चार चांद लावायचा मोह अनावर झाला. खट्याळ पावसाशी संगनमत करुन राज्याभिषेकाच्या पुर्वसंध्येलाच त्यांनी आपल्या मिणमिणत्या प्रकाशाने ती स्वर्गिय गडवाट दिमाखदारपणे सजवून काढली.

वाटेवरील प्रत्येक झाडोऱ्याचं त्यांनी प्रकाशाच्या झाडात रुपांतर करुन त्याला मनमुरादपणे उजळून काढलं होतं. रायगडाच्या वाटेला जाणकार मंतरलेली वाट म्हणतात असं अनेक वर्षं ऐकुन होतो. पण रायगडाची वाट अशीही मंतरलेली असू शकते याची कल्पनाच केली नव्हती. शेकडो झाडं प्रकाशाने निथळतांना पाहणं सोपं नव्हतं. महाराजा...

प्रत्येक दोन श्वासांमधील अंतर उगाच वाढत चाललं होतं. तर काळजाच्या ठोक्यांनाही लय सापडंत नव्हती. काजव्यांच्या प्रकाशमायेची किमया केवळ ऐकून होतो. पण त्यातलं सुख काय असत? हे पहिल्यांदाच प्रत्यक्षरित्या अनुभवत होतो.

एकटा-दुकटा काजवा तर मुंबईतही अनेकवेळा पाहिला होता. पण त्यांच्या समुहाची हि कमालीची करामत निश्चितच मोहवुन टाकणारी होती. या प्रचंड मोहक दृश्यामुळे इथंच मुक्काम होतोय कि काय अशी भितीही वाटू लागली. डोळ्यांनी तर पायांशी कमालीचं संधान बांधलं होतं अन् मनाची तर मतीच गुंग झाली होती. काय करावं खरंच सुचत नव्हतं. क्षणात मंदावणाऱ्या आणि लगेच उजळून निघणाऱ्या या झिलमिल दिव्यांनी इथे गडपायथ्याशी दिवाळीच सुरु केली होती.

शिवकाळात मावळे आनंदसमयी मशालनृत्य करीत असत. हे लुलुकणारे काजवे... मावळेच नसतील कशावरून? अंगावरुन शहारा सरसरत गेला... किती सुंदर कल्पना? त्याकाळी मशाली नाचवत आनंद साजरा करणारे, रात्र-रात्र जागवणारे शिवभक्त मावळे काजव्यांच्या रुपात येऊन या महान सोहळ्याच्या पुर्वसंध्येला तेजोमयी अविट प्रकाशाने सारा गड सजवताहेत.

गडवाटांचं तर त्यांनी अभूतपूर्व प्रकाशवाटांमध्येच रुपांतर केलं होतं. त्यांच्या टिमटिमण्यामुळे एक वेगळंच रोमहर्षक वातावरण गडपरिसरात निर्माण झालं होतं. त्यांच्या त्या बेभान, अनवट अन् गुढ नाचानेही तेथे एक सुंदर लय गाठली होती. आणि त्या लयीवर साक्षात दुर्गराज रायगडानेही मंदसा ताल धरलाय कि काय असंच वाटून गेलं.

खरंच या काजवानृत्याने अन् त्यांच्या आगळ्या-वेगळ्या दिपोत्सवाने तर राज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्याआधीच कमालीची रंगत आणली. गडावरील बहारदार सोहळ्याची मस्त चुणूक इथे गडपायथ्यालाच आम्ही अनुभवली. अत्यानंदाच्या नादात भराभर उलटून चाललेल्या वेळेकडे पाहता, मुख्य कार्यक्रमाचे वेध लागायला सुरुवात झाली होती.

दुर्गदुर्गेश्वर रायगड म्हणजे शिवछत्रपतींच्या काळजाचा ठाव. थोड्याच वेळात तेथे राज्याभिषेकाच्या महासोहळयास आरंभ होणार होता... प्रचंड जनसागर आनंदसागरात डुंबण्याच्या तयारीत होता. दाहि दिशा गोब्राम्हण प्रतिपालकाचा जयजयकार करणार होत्या. अन् आमची हृदयं कमालीच्या अतीव आनंदाने भरुन आली होती. प्रौढप्रताप… पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस… गोब्राम्हण प्रतिपालक… अशा बिरुदावल्यांनी अन् अल्काबांच्या पुका-यांनी गडवाट दणाणून गेली होती.

तमाम उदात्त निसर्गतत्वांमुळे आणि विशेषतः काजव्यांमुळे आमची अचपळ मनं आणि थकली गात्रं अशी तृप्तावली होती कि एक अपूर्व समाधान उरात घेऊन, अधीरतेने आमची सय काढणाऱ्या गडाच्या महाद्वाराकडे अगदी शांतपणे आम्ही वाटचाल करु लागलो...





  क्रमशः

शिवराज्याभिषेक... एक आनंदवारी... भाग-२

श्रीशिवराज्याभिषेकाची आनंदवारी ... भाग - २

डचढणीला लागताच काजव्यांनी मांडलेल्या मनोहारी महोत्सवाने भरुन आलेली मने आणि जडावलेल्या पावलांना थोडी गती दिली. तेथून निघालो ते थेट महाद्वार गाठले. तोपर्यंत रात्रीचे १० वाजून गेले होते. वाटेत झाकोळुन आलेल्या ढगांनी चांगलंच भेववलं. पण तो नुसताच भाॅ ssss.. होता. त्यात दम काहीच नव्हता. 

महाद्वाराशी पोहोचताच त्या बुलंद बलिष्ठ बुरुजांना अगदी झुकुन मुजरा केला. या सन्मानाचा तो हक्काचा मानकरीच आहे. अशा रात्रीच्या काळोखभरल्या वातावरणात देखील महाद्वाराची भव्यता आणि देखणेपण भारुन टाकणारं होतं. नजरेच्या मिठ-मोह-या उतरवून टाकाव्यात कि काय असंच काहिसं भारून सोडणारं वातावरण होतं.

रायगडाचं महाद्वार हा महान वास्तुविशेष माझ्यासाठी नेहमीच आकर्षणाचा एक परमोच्च बिंदु होऊन राहिलाय. अगदी पहिल्यांदा रायगड दर्शन केलं तेंव्हापासून एक गुढ संवेदना ईथं आल्यानंतर आपोआपच जाणवते. अंगावर शहारे उठतात. इथल्या सुखद, अकलंक आणि निवांत वातावरणामुळे कधी-कधी असंही वाटतं की या अजस्त्र वास्तूतच रायगडाच्या गडपुरुषाचं ठाणं असावं. त्या महापुरूषाला गडापेक्षा इथला सहवास जास्तच आवडत असावा. आणि म्हणूनच माझ्यासारख्या गडभटक्याला रायगडाला भेट दिल्याच्या समाधानाची पहिली पावती इथंच मिळते.

या वास्तूत काहीतरी जादू नक्कीच आहे. मला चांगलंच आठवतं... एकदा रायगडाच्या तिनही कड्यांच्या आरोहणाकरीता गडावर येणं झालं होतं. २५०/३०० किलो साधनसामग्रीची जाम गर्दी झाली होती. आणि रोपवेने येण्याशिवाय गत्यंतरच उरलं नव्हतं. काही इलाजच नव्हता. त्यामुळे मनावर भलामोठा दगड ठेऊनच हे (कु)कर्म केलं होतं. पण त्याही वेळेला मी गडावर पोहोचताच भारल्यासारखा वायुवेगाने महाद्वारी येऊन गेलो. काय करणार ? इथल्या पवित्र मातीची धुळ कपाळी लावल्याशिवाय चैनच पडत नाही. कारण इथल्या मातीत स्वराज्यसुर्याच्या पदचिन्हाचं शिवतेज विखुरलंय. तिला स्पर्श झालाय तो साक्षात युगपुरुषाचा. हि माती आम्हां भटक्यांसाठी साधीसुधी नाही तर एका प्रचंड ऊर्जेचा अखंड स्त्रोत आहे. 

किती तरी वेळा गड चढाईदरम्यान शिवछत्रपतींनी काही क्षण का असेना इथं विसावा घेतला असेल. त्या जाणत्या राजाने पालखीच्या भोयांसह इथल्या पहारेदार, तटावरील धारकरी, त्यांच्या पोराटोरांची लेकिसुनांची ख्याली-खुशाली पुसली असेल, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले असतील. चांगल्या कामगिरींच्या बक्षिशीसाठी मोहरांचा कसा इथं रिता केला असेल. महाद्वाराच्या अवाढव्य भिंतींवर ती करारी, भेदक नजर मायेेच्या ओलाव्याने परत परत अंतर्बाह्य फिरली असेल. महाद्वाराला बांधणाऱ्याचं, त्याला राखणाऱ्यांचं राजांनी तोंडभरुन कौतुक, कैकवेळा इथंच केलं असेल. त्या अजस्त्र बलाढ्यपणाकडे पाहुन त्या शिवावताराने इथल्या चिऱ्या-चिऱ्यावरुन आपला वरदहस्त प्रेमाने फिरवला असेल. त्या स्वर्गीय स्पर्शाने तो जडशीळ पत्थर देखील शहारून उठला असेल. काय आणि किती तरी गोष्टी इथं घडल्या असतील त्याची मोजदादच नाही. आणि याचमुळे महाद्वारात आल्यानंतर काहि गुढ संवेदनांची  आपोआप जाणीव आजही होते.

कितीही रात्र, कोणतीही वेळ असली तरी महाद्वारात का कोणास ठाऊक कधीच भय वाटलं नाही. भटकंतीला सुरूवात केल्यानंतर, खुप वेळा मी इथं रात्री-बेरात्री आणि एकटाही आलोय. पण इतरत्र जाणवणारी असुरक्षिततेची भावना या काळ्याकभिन्न बुरुजांच्या सान्निध्यात यायला धजावत नाही. त्या जुळ्या, बळकट बुरुजांच्या बलदंड बाहुपाशात आणि जपमाळेच्या गोमुखी आवरणासारख्या स्थापत्यरचनेच्या अंतरंगात असतांना तर साक्षात त्या गडरूपी पुराणपुरुषाच्या छत्रछायेखाली अत्यंत सुरक्षित असल्यासारखं वाटतं. 

एक बरंय कि हि वास्तु महाद्वार असल्याने गडभेटीत प्रथम दर्शन याचंच होतं. आणि याचं दर्शनच असंय कि कितीही थकलेल्या तना-मनाचा कणन् कण अगदी सुखाऊन जातो.

माझ्या अल्प-स्वल्प ज्ञानानुसार खरं तर स्थापत्यशास्त्र, युद्धशास्त्र आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यावेळी गडाची महाद्वाराकडची ही उतरती बाजू खरं तर एक मोठी ऐब म्हणजेच कमजोरी असणार. अन् गनिमांच्या हल्ल्यात गडाच्या सर्वनाशाला कारणीभूत ठरणारी देखील. पण तिच्या त्या उताराच्या खोलगट भागात महान हिंदवी स्वराज्याच्या राजधानीला साजेसं अतिभव्य महाद्वार ज्या चपखलपणे उभारून गडाला जे परमोच्च वैभव मिळवून दिलंय याची तोड जगात कुठेही मिळणार नाही.

महान स्वराज्याच्या त्या जाणकार स्थपतीने, हिरोजी ईंदुलकरांनी याच्या उभारणीत आपल्या ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाचं सारसर्वस्वच नव्हे तर थेट आत्माच अोतलेला दिसून येतो. उगाच राजधानीचा कोट म्हणून अगडबंब पसारा अशी त्याची बांधणी नाही. तर फार सखोल विचाराअंती हे बांधकाम आणि विलक्षण मोहक अशी रचना केलेली आहे. खरं तर रायगडाचं स्थापत्य हा एक स्वतंत्र अभ्यासाचा गहन विषयच आहे. पण ते अजब-गजब वास्तू अंगावर घ्यायची कुवत मात्र हवीच हवी.

अस्सं रांगडं, देखणं अन् भव्यदिव्य महाद्वार भारतातच काय तर जगाच्या पाठीवर कोणत्याही डोंगरी किल्ल्याला निश्चितच नसेल. सन १८१८ च्या आसपास महाराष्ट्र काबिज करतांना अनेक डोंगरी गडकोटांना इंग्रजांचा सुरूंगरुपी नाग डसला. त्या विखारी दंशाने अनेक देखण्या गडांच्या वाटा-वास्तुंनी दम तोडला. पण रायगडाच्या या बळीवंत, लढवय्या महाद्वारापुढे तर त्या परकिय नागाचाही फणा नतमस्तक झाला असणार... भव्यतेचे भोक्ते असणारे इंग्रज याचा बेसुमार आवाका पाहुन अवाकच झाले असतील. आणि म्हणूनच याला हात लावायची त्यांची छाती झाली नाही... किंवा छत्रपतींनी उभारलेल्या अशा देखण्या वास्तुमंदिराचा विध्वंस करायला त्यांचंही मन धजावलं नसेल. आमच्या महान राजाची किरत आहेच तशी मोठी.

इथं आलं कि गड चढून आल्याच्या समाधानाने अंगचा रोम रोम पुलकित होऊन उठतो... हे समाधान रोप वेने आलेल्यांना मात्र लाभत नाही. एखाद्या मंदिरात मागल्या दाराने किंवा चोरपावलाने आलेल्यांसारखीच त्यांची अवस्था असते... आजारी, हतबल, वृद्ध, महिला आणि मुलांना वगळले तरी हट्टेकट्टे पुरुष अन् आजच्या तरुण समजणा-या मंडळींना रोपवेने वर येताना पाहुन त्यांच्या तारुण्याची किव आल्याशिवाय रहात नाही. सांगणं एवढंच कि रणमर्दांचा रायगड पहायला मर्दानी वाटेनेच यावं, असं मागल्या दाराने प्रवेश करायला आपण का बाजारबुणगे आहोत ? 

रोपवेचा एक किस्सा सहजच आठवला म्हणुन नमुद करतो. आमचा मोठा मुलगा कु. आदित्य जेमतेम चार महिन्यांचा असतांना त्याला शिवसमाधीवर घालायला न्यायचं ठरवलं. घरातुन फार कोलाहल झाला. पण मागं हटलो नाही, कि विचारही बदलला नाही. 

पत्नी सरिताला याबाबत विचारलं तर ती एका पायावर तयार. सिझेरियन झालेल्या परिस्थितीत ही आमची सईबाई (तिचं जन्मनांव खरंच सईबाई आहे ) चार महिन्यांच्या तान्ह्या लेकराला उराशी कवटाळून उभा रायगड, कसलीही सबब न सांगता चढून गेली. मी रोपवेचा पर्याय विचारला तर म्हणाली "अजून इतके काही वाईट दिवस आले नाहीत माझे. तुम्हांला जायचंय तर जा रोपवेने मी व माझा लेक, राजांच्या अन् त्यांच्या रायगडाच्या दर्शनाला गड चढुनच जाणार". यावर मी काय बोलणार? हि सारी किमया त्या थोर राजाची आणि जीवही अोवाळुन टाकावा अशा दुर्गदुर्गेश्वराची... असो...

महाद्वाराशी काही वेळ विसावल्यानंतर गडात प्रवेश करण्यास सज्ज झालो. प्रवेशद्वारी नव्यानेच बसवलेला अप्रतिम रणमस्त कलाकारीचा भव्य लाकडी दरवाजा पाहून खुप आनंद झाला. अगदी शिवकालानुरुप बनवलेला हा दरवाजा महाद्वाराच्या वैभवात चांगलीच भर घालणारा आहे. यापुढे गडाचे दरवाजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार आणि शिवकालीन प्रथेनुसार उघड-बंद होणार असं दिसतंय. आता गडावर कधीही येण्या-जाण्याची आपली राजेशाही मिजास बंद होणार याचं मात्र भारी दुःख झालं. 

महाद्वार भेटीचा कौतुकसमारंभ आवरेपर्यंत रात्रीचे अकरा वाजत आले होते. दाट धुकं, झिरमिर पाऊस आणि गच्च काळोखाने इथं आमची चांगलीच फिरकी घ्यायला सुरुवात केली. फक्त पायाखालच्या वाटेशिवाय काहीच नजरेत येत नव्हतं. गडावर लागलेले दिवे धुकंभरल्या काळोखामुळे खुपच लांबवर लागल्याचे भासत होते.
शेवटी धुकं आणि काळोखात चाचपडत का होईना महत्प्रयत्नानंतर एकदाची आमची स्वारी गडावर दाखल झाली. जिल्हा परिषदेच्या निवासस्थानांजवळ मोठी लगबग उडाल्याचं दिसून आलं. श्रीशिवराज्याभिषेक समितीतर्फे दरसालाप्रमाणे गडावर आलेल्या शिवभक्तांच्या दोन दिवसांच्या पोटापाण्याची सोय लावली जात होती. रात्रभर गडावर येत असलेल्या आणि दुसऱ्या दिवशी मुख्य सोहळ्यात सामील होणाऱ्या शेकडो मावळ्यांच्या भोजनाची सोय करणाऱ्या या समितीचं करावं तेवढं कौतुक कमीच होईल. यंदाच्या वर्षी तर दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने देखील या समितीच्या कार्यात मोठा हातभार लावून आपले भरीव योगदान दिले होते. 

गडावर आल्यानंतर शिवप्रेमींच्या भेटीगाठी आणि विचारपूस करण्यात मध्यरात्र कधी झाली ते कळलंच नाही. ऐवढ्या रात्रीसुद्धा अाल्या-आल्या मला गड पहायची इच्छा होती. म्हणून लगोलग पोटात गरमागरम पुलाव्याचे चार घास झटापटीने कोंबले. सोबतच्या गड्यांनीही गडफेरीच्या प्रस्तावाला लगेच मान्यता दिल्याने तडक निघालो. तेंव्हा पावसाचा मंदगतीने शिडकावा सुरूच होता. 

झेडपीच्या निवासापासून पासून वर चढत शिर्काईचं छान सजवलेलं राऊळ उजवीकडे ठेवत होळीचा माळ गाठला. आमच्यासारखेच काही निशाचर मावळे त्या माळावर मौजेत भटकताना दिसले. तर काहीजण माळावरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ होते. गडाचेच नाही तर तमाम स्वराज्याचे धनी असलेल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला अशा उघड्या बोडक्या माळावर दिलेली हि जागा मनाला नेहमीच सलते. वेळ पडल्यास जन्मदात्यालाही घराबाहेरचा रस्ता दाखवतील अशांकडून अपेक्षा ती काय ठेवायची ?
शिवप्रतिमेची ती जागा कशीही असली तरी पण राजांचा हा पुतळा मात्र केवळ सुखद, अवर्णनीय असा आहे. हा पुतळा त्या माळावर चैतन्य आणतो. तिथल्या सा-या आसमंतात जान आणतो. या सर्वांगसुंदर शिवपुतळ्यामुळे तो उजाड, वैराण होळीचा माळ मात्र पावन होऊन गेला.

त्या पुतळ्याचा महिमा काय वर्णावा ? त्यातील शिवरायांची भेदक नजर आरपार जाऊन समोरच्या बाजारपेठेतून पलिकडील गगनचुंबी पर्वतशिखरांवर फिरुन घे-यातील रहाळाचा अदमास घेत असते. त्याचवेळी नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या काळनदीच्या खो-यातील कोकणदिवा, लिंगाणा, बाजारपेठेच्या पलीकडे दिसणारा गडदेव जगदीश्वर अन् त्याही पलीकडुन साद घालणा-या जिवासखा राजगड-तोरण्यावरही महाराज नजर फिरवतसत कि काय ? असं वेड लावणारं दृश्य इथं दिसतं.

तेथून सरळ निघालो तो नगारखान्यासमोर येऊन थबकलो. अहाहा... काय तो थाट न् काय ती अदब ? अख्खा नगारखाना कसा नखशिखान्त नवरदेवासारखाच सजलेला होता. अन् का सजु नये त्यानं ? या राज्याभिषेक सोहळ्याचा तोच तर खरा यजमान होता. प्रत्येक खाशा स्वाऱ्याच नाही तर आलेल्या प्रत्येक आम आदमीचंही स्वागत तो तितक्याच अगत्याने करीत होता. नगारखान्याचा कोपरा न् कोपरा रंगबिरंग्या फुलमाळा न् रांगोळ्यांनी सुशोभित झाला होता. आत येणारा प्रत्येकजण नगारखान्याच्या पायरीला वंदन करूनच प्रवेशत होता. आत पहारेकऱ्यांच्या देवडीत काही जण मावळ्यांच्या वेशात आगत-स्वागत करतांना दिसले. सारं काही कसं शानदार न् जानदार वाटत होतं.

आस्ते-आस्ते नागारखान्यातुन मोठ्या अदबीनं राजसदरेच्या अंतर्भागात प्रवेश करते झालो. आतील दृश्य पाहुन तर खरोखर स्तिमितच होऊन गेलो. शिवभक्तांच्या या आनंदसोहळ्यात पावसाचं विघ्न येऊ नये म्हणून इतक्या अवाढव्य सदरेवर मंडप घालुन सदरेला चांगलीच शोभा आणली होती. त्या मंडपाखाली जमिनीवर अंथरलेल्या आच्छादनावर भक्तगण बैठक घालुन बसले होते. हजारोंचा समुदाय शिस्तबद्धरित्या बसून अशा मध्यरात्रीला शिवचरित्राख्यानाचा आनंद घेतांना पाहुन अंगावर रोमांच उठल्याशिवाय राहतील काय ? 

राजसभेच्या मधोमध शिस्तबद्धरित्या मोकळ्या सोडलेल्या मार्गिकेतुन तसेच पुढे जात थेट सिंहासनाच्या चौथ-याजवळ आलो. अशा मध्यरात्री तो चौथरा सोन्यासारखा झळकायचाच काय तो बाकी राहिला होता. आणि झळकायला तो दिसायला तर हवा ना ? अनाम सजावटकारांनी त्याला सजवतांना कसलीही उणीव म्हणून  सोडली नव्हती. 

एखाद्या स्वर्गीय राजसभेतच आल्यासारखे वाटत होते. चौथ-याच्या खालच्या मोकळ्या जागेत आमच्या पंकज भोसलेच्या शिवमय कुटुंबसदस्यांनी कवीराज भुषणरचित खड्या बोलीतलं अप्रतिम शिवाख्यान चालु ठेवले होते. आणि सदरेत जमलेल्या शेकडो शिवभक्तांकडुन अगदी शांत चित्ताने ते श्रवण केले जात होते. आणि विशेष म्हणजे बाहेर पावसाच्या मंदशा रिपरिपीनेही त्यावर मस्त ताल धरला होता. 

चौथ-याच्या वरच्या भागात सिंहासनाधीश्वर शिवछत्रपतींचा विरासनातील पुतळा विराजला होता. त्यांच्या बैठकीसाठी उभारलेल्या राजमंदिराचं तर पुष्पमंदिरातच रुपांतर झालं होतं. कसलेल्या कसबी कलावंतांनी अवर्णनीय अशी पुष्परचना करुन रंगांची मस्त उधळण केली होती. त्या मखरात विसावलेला आमचा दिगंत कीर्तीचा, फुलांइतक्याच कोमल हृदयाचा दिगंत किर्तीचा आमचा राजा समोर जमलेल्या रयतेकडे अभिमानाने पहात असल्याचे ते दृश्य नजर लागेल असंच होतं. 

आंम्हां दोघांना आता, मोटारसायकलवरुन मुंबई सोडल्यापासून आता सुमारे १७ तास उलटून गेले होते. शरीरातला विश्रांतीचा अलार्म घणघणायला केंव्हाच सुरुवात झाली होती. तरी राजसदरेवरच्या त्या भारलेल्या वातावरणातून निघायला मन  काही तयार होत नव्हतं. त्याला कसंबसं बाबापुता करुन, समजूत काढून एमटीडीसीच्या विश्रामस्थळावर आणलं. आणि काही वेळासाठी का होईना थकल्या शरीराला विश्रांती दिली. 

दुस-या दिवशी मात्र पक्ष्यांच्या गुंजारवाने भल्या पहाटे रामप्रहरीच तयार होऊन पुन्हा एकदा जोरदार उत्साहातच बाहेर पडलो. होळीचा माळ, नगारखाना व राजसदरेवर जनसागराचं उधाण आलं होतं. सारा आसमंत श्रीशिवघोषाच्या नादानं दुमदुमत होता. छत्रपतींच्या वैशिष्टयपूर्ण बिरुदावल्या ऐकून शरीराचा रोम-रोम सुखाऊन जात होता. 

राज्याभिषेकाच्या समंत्र विधीकरीता अनेक ठिकाणाहुन आलेल्या ब्रम्हवृंदांच्या पवित्र मंत्रोच्चारणाने तेथील वातावरण भारुन गेलं होतं. कोल्हापुरच्या राजघराण्यातील वंशज असलेल्या  राजे यांचे हस्ते तेथे वेगवेगळ्या धार्मिक विधींकरीता मांडलेल्या धातुच्या पुतळ्यावर राज्याभिषेकाच्या मंत्रविधींचा शुभारंभ झाला. 

गडावरील गंगासागराच्या परम पावन जळाभिषेकाबरोबरच दह्या-दुधाची स्नानादि विधिही आमंत्रण सुरू होते. अनेकप्रकारचे गंध, चंदनादि लेप आणि अत्तरांच्या परिमळाने तर सारी राजसभाच सुगंधित होऊन गेली होती. राजांच्या सेवेतील ब्रम्हवृंदांची लगबग पाहण्यासारखी होती. त्याचवेळी सदरेवर काही तरुण मावळ्यांच्या वेशात तेथे अदबशीरपणे उभे राहून आपली दरबारी सेवा बजावत होते. करारी चेहरा, पिळदार मिशा, बाराबंद्यांची बंधन तटतटतील अशा मर्दानी छात्यांचे ते वीर मावळे पाहुन आपण खरंच शिवकालात तर नाहि ना आलो ? असंच वाटून गेलं.

तिकडे होळीच्या माळावर तर आणखी मोठा जल्लोष सुरु होता. अनेक ठिकाणच्या ढोल पथकांंमार्फत आपापल्या कलेचा नजराणा शिवचरणी सादर करण्यासाठी चुरशीची चढाओढच सुरु केली होती. त्या ढोलांचा एक अपुर्व असा नाद त्या माळावर अवतरला होता. त्याच तालावर काही शिवकालीन शस्त्रपारंगत मंडळींनी उपस्थितांसमोर तलवार, भाले, दांडपट्टयांचे हात दाखवून डोळ्यांचे पारणे फेडले. आजच्या मिसाईल युगातही या पुराणकालीन शस्त्रांवरली त्यांची पकड आणि कौशल्य जबरदस्त होते. विविध प्राचिन हत्यारांनी त्या मावळ्यांकडुन दाखविण्यात आलेली ती प्रात्यक्षिकं डोळ्यांच्या पापण्या लवु देत नव्हती. आज राजे असते तर नक्कीच त्यांच्यावर सोनमोहरांची तुफान उधळण झाली असती. 

असा सगळा अानंदसोहळा होळीच्या माळावर सुरु असतांनाच, राजसदरेवरील अभिषेकाचा सोहळा संपन्न होऊन शंख, कर्णे, तुता-यांच्या नादात महाराजांची पालखी गडदेवतांच्या दर्शनाला निघाल्याची इशारत झाली. सारा सारा जनसमुदाय त्या अपूर्व अशा पालखीसोहळ्यात सामील झाला होता. श्रीजगदीश्वराच्या मंदिराकडे निघालेला  तो रयतेचा सागर पाहून चंद्रभागेच्या वाळवंटी तीरावर जमलेल्या भागवत भक्तांच्या महामेळ्याचीच आठवण होत होती...    

श्रीशिवरायांना "पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ राजा" असं संबोधलं जातं तर शिवराज्याभिषेक हि जगाच्या मानवी इतिहासातली एक महान घटना मानली जाते. आणि अशा विश्वविख्यात सोहळ्याच्या समारोपप्रसंगी जयजयकारी आरोळ्यांच्या आनंदसोहळ्यात नखशिखांत डुंबून गेलेला दुर्गदुर्गेश्वर रायगड पाहणं हे तर अापल्या आयुष्यातील अत्यंत समृद्ध क्षण म्हणून कायमचे नोंदले गेले. 

कदाचित आपल्या लाडक्या पुत्राला, सह्याद्रीची किर्त जगात गाजवणा-या छाव्याला, अभिषिक्त महाराजा झाल्याचा हा सोहळा पाहिल्यानंतर आता काहीही पाहू नये असंच झालं असेल... आणि म्हणुनच जिजाऊ माँसाहेबांनी अवघ्या १२व्या दिवशीच अत्यंत कृतार्थ आणि भरल्या मनाने इहलोकाचा निरोप घेतला असावा.

देवांनीही हेवा करावा असं स्वराज्यच नाहि तर सुराज्य घडवलेल्या, जगाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ आणि रयतेचा राजा अशी दिगंत कीर्ती लाभलेल्या शिवछत्रपतींना राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मानाचा त्रिवार मुजरा...