या नांवाच्या जादूई करिष्म्यामुळे गेली काहि वर्षे मी जबर प्रभावित होऊन गेलो होतो. मागील दहाएक वर्षांत या व्यक्तीने केलेल्या, अशक्य आणि अविश्वसनिय वाटणाऱ्या मोहिमांची यादी पाहिली कि या अफाट माणसाच्या अचाट क्षमतेची कल्पना येते. मा.एव्हरेस्ट (८वेळा), मा.कांचनजंगा, मा.अन्नपुर्णा, मा.धौलागिरी, मा.मकालू, मा.मानास्लू या विश्वविख्यात ८ हजारी शिखरांबरोबरच मा.भृगुपंथ, मा.शिवलिंग (First civilian ascent?) मा.थलय सागर, मा.कामेट, मा.नुन, मा.सासेर कांग्री-IV अशा मातब्बर शिखरांची नांवं घ्यायला खरं तर जाणकारांचीही दमछाक होते... पण पेंबा कायम यशाची नवनवी शिखरं काबीज करतच राहिला... पेंबा शेर्पा ज्या ज्या मोहिमेत समाविष्ट व्हायचा त्या मोहिमा कोणत्याही परिस्थितीत, निसटता का होईना पण यश नक्की मिळवणार असा दंडकच निर्माण झाला होता.
कित्येक वेळा तर भयंकर बिघडलेले हवामान आणि नैसर्गिक प्रकोपामुळे हातातून निसटलेल्या अनेक मोहिमा पेंबाने लीलया सावरून नेल्या, सहज-सुरक्षित यशस्वीही करून दाखवल्या...अशी साक्ष अनेक नामवंत गिर्यारोहक देतात.
थोडक्यात काय? तर पेंबा म्हणजे नुसतंच यश नाहि तर पेंबा म्हणजे सुरक्षित यशाची गॅरंटी असंच काहिसं समीकरण तयार झालं होतं... पण काराकोरमच्या कुशीत बसून हे लिखाण करतांना अजूनही मन या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयारच होत नाहिये कि हिमालयाशी हक्काने झोंब्या घेणारा, हिमालयाचा लाडका लेक, आमचा सर्वांचा आवडता पेंबा'दा... आता पुन्हा कधीही दिसणार नाही...
होय... अत्यंत दुर्दैवाने का असेना पण हे खरंच खरं आहे... आमच्या सासेर कांग्री शिखरसमुहावरील संयुक्त मोहिमेत पेंबादा शेर्पा म्हणून नाही तर अगदी हट्टाने सदस्य म्हणून सहभागी झाला होता... दि. १२/७/१८ रोजी त्याने आमच्या संयुक्त पथकातील दोन सदस्यांना हाताशी धरून मोहिमेच्या अवघ्या २१व्या दिवशी मा. सासेर कांग्री -IV" हे ७४१६ मीटर/ २४३३० फुट उंचीचे काराकोरममधील दुर्गमातिदुर्गम शिखर, अत्यंत खवळलेल्या हवामानात यशस्वीरीत्या सर देखील केले... असं अवाढव्य यश मिळवल्यानंतर, दुस-याच दिवशी अतिशय आनंदात, शिखरावरील डेंजरझोनमधून सर्व सदस्यांना तो सहिसलामत बाहेरही घेऊन आला... त्यानंतर अत्यंत सावधरीत्या परतीच्या वाटेवरील कँप-II जवळच्या ( मा. सासेर कांग्री - IV, मा.सासेर कांग्री- I आणि मा.प्लॅटू या सप्तहजारी दिग्गजांमुळे तयार झालेल्या अर्धवर्तुळाकार ) प्रचंड नालेसारख्या आकाराच्या बेसिनमधील छुपी हिमदरी ओलांडण्याचा प्रयत्न करत असतांनाच अचानक पेंबा, सावरण्याची संधी न मिळताच, त्यात अतिशय वेगाने झेपावला गेला... हे सर्व इतक्या वेगाने घडले की ते भयानक दृश्य पाहतांना बधिर झालेल्या सोबत्यांना सावध व्हायला काही क्षणच गेले असतील- नसतील आणि तो गेला... तो गेलाच... तोही कायमचाच... एक वादळी, हिमालयीन झंझावात हिमालयाच्याच कुशीत कायमचाच सामावून गेला...
१२ जूलै रोजी शिखरावरील यशस्वी स्वारीनंतर पेंबादाचा अत्यंत करुण शेवट झाला त्या दुर्दैवी दिवसाची तारीख होती १३ जूलै. १३ हा अंक तर एकप्रकारे जगभरातून बदनाम... आणि याच दिवशी पेंबासारखा हिमालयीन झंझावात शांत होऊन जावा... याला काय म्हणायचं? खरंच असं काही असतं का ? तसं असो अगर नसो पण आता भविष्यात १३ जूलै ही तारीख कधीही विसरता येणार नाही... कधीच नाही...
अनेकवेळा हिमद-या (क्रेव्हासेस) तर कोरड्या आणि अगदीच अरुंद देखील असतात... हिमालयीन गिर्यारोहणातील जादूगार म्हणून जगभर विख्यात इटलीच्या रेनाॅल्ड मेसनर यांनी तर कोणत्याही मोहिमेत तंबू न वापरता अशा क्रेव्हासेसचा वापर नेहमीच विश्रांतीसाठी केला होता... पण पेंबासाठी मात्र त्यावेळी खरंतर साक्षात् काळच अवतरला होता... आणि सहसा वेळेवर न येणारी वेळही जणूकाही पेंबासाठीच टपून बसली होती... त्यातही दुसरं दुर्दैव इतकं मोठं की ती हिमखाई रक्तही गोठवून टाकणा-या बर्फाळ आणि वेगवान प्रवाही पाण्याने भरलेली आणि १५/२० फुट सरळसोट उंचीनंतर खाली मोठी होत जाऊन आतल्या-आत वेडी-वाकडी वळालेली होती. खरंतर अशा परिस्थितीत विशेष अत्याधुनिक साहित्यांशिवाय आणि उपलब्ध असलेल्या जुनाट साधनसामुग्रीच्या आधारे त्याच्या सुटकेचा प्रयत्न करणे म्हणजे खरंतर शोध आणि बचावकर्त्यांच्या जीवाशीच खेळ होता...
पेंबासारखा आघाडीचा मोहरा खाईत पडल्याचे पाहताच त्या निमिषार्धात हादरुन गेलेल्या सोबत्यांनी वेगवान हालचाली करीत त्याच्या सुटकेचे जमेल तितके प्रयत्न केले... पण सततच्या वाढत्या तपमानामुळे त्या परिसराची इतकी हानी झाली होती की, खोलात पडलेल्या (आणि सापडण्याची शक्यता जवळजवळ नसलेल्या) पेंबाला शोधायचे? की त्याचवेळी आजूबाजूच्या तशा भिषण परिस्थितीतून स्वतःचा जीव वाचवायचा? या अवघड मनःस्थितीतच त्यांनी भरपूर प्रयत्न करुन त्या भयकारी बर्फाळ भागातून काही तासांच्या घनघोर प्रयत्नांनंतर स्वतःला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले.
इकडे बेसकँपवर असलेला पेंबाचा मोठा भाऊ पासांग यास त्यांना बराच उशिर झाल्याचे पाहून, वरच्या शिबीरांवर घडलेल्या गडबडीची अंधुकशी शंका आल्याने तो पहाटेच उठून त्यांच्यासाठी जेवण घेऊन रवाना झाला... बेसकँप ते कँपमध्ये-I हे सुमारे ५ तासांचे खड्या चढाईचे अंतर पासांग या कसलेल्या अनुभवी आरोहकाने भावाच्या ओढीने अवघ्या ३ तासांतच कापून तेथे पोहोचला... पण वरून परतीला लागलेल्या पेंबाच्या पथकाची तेथे भेटच झाली नाही... त्यामुळे भयंकर काळजीत पडलेल्या पासांगने त्याही पुढे जाऊन कँपमध्ये-II च्या दिशेने स्वतःला पिटाळले... त्याची त्या दिशेने चढाई सुरू असतांनाच अगदी दूरवर केवळ ४ आकृत्या खाली येतांना दिसल्या... ५ जणांपैकी केवळ ४ जणच परत येतांना दिसल्याबरोबर पासांगच्या अनुभवी नजरेने त्यातील गांभीर्य तात्काळ ओळखले... आणि वा-याच्या वेगाने त्यांना जाऊन गाठले. तर नेमका त्याचा लाडका भाऊ पेंबाच त्यात दिसला नाही... काळजाचा ठोका चुकवतच त्याने विचारले असता सोबत्यांकडून त्याला खरी हकिकत समजली. त्यामुळे कळवळून उठलेल्या पासांगने त्यांच्यासह पुन्हा ते ठिकाण गाठून त्वरेने हालचाल करत जवळच्याच क्रेव्हासवर पेंबानेच लावलेला दोर काढून आणला आणि २ शेर्पांच्या मदतीने पासांगदा त्या अवाढव्य क्रेव्हासमध्ये पाहता पाहता उतरला देखील...
सुमारे तासभर (३०/४० फुट) खाली उतरून पासांगने सख्ख्या भावाला, त्याच्या काळजाच्या तुकड्याला शोधण्याचा भरपूर प्रयत्न करुनही काहीही हाती लागले नाही... गेल्या २५ वर्षांच्या माझ्या कारकीर्दीतली ही सर्वात भयानक घटना... सुन्न होऊन गेलेल्या तना-मनाला सावरणं मात्र आंम्हां सर्वांसाठीच अतिशय अवघड बाब होती... आम्ही गड जरी जिंकला असला तरी आमचा नरवीर सिंह मात्र आम्ही कायमचा गमावला होता... त्याच्या अशा जाण्याने आम्ही अपार मेहनतीने लाभलेलं इतकं घवघवीत, चमकदार यशही काळवंडून गेल्याचा भास होऊ लागला...
सुन्न करुन सोडणाऱ्या या घटनेनंतर पेंबाच्या आमच्या सोबतच्या या शेवटच्या मोहिमेतील आठवणींसह इतरही अनेक आठवणी डोळ्यांसमोर फेर धरु लागल्या... पुर्वी भरदार, भरीव देहाचा दिसणारा पेंबा, आता उतारवयाकडे झुकतांना, आयुष्यात येऊ घातलेल्या थोड्याफार स्थैर्यामुळे आता अगदीच गोल गरगरीत शरीरयष्टीचा झाला होता...
पेंबाच्या तशा निष्पाप चेहऱ्यावर खळखळून येणारं हसू पाहणं हा आमच्या करमणुकीचा एक मोठा विषय असायचा... मोठ्याने हसणं त्याच्या स्वभावात नव्हतं... पण त्याचं हसू निरागस असलं तरी काहीसं खोडकर मात्र असायचं...पेंबाची बंगाली समाजाशी विशेष घट्ट नाळ जुळली होती... सतत बंगाली टिम्सबरोबर हिमालयीन मोहिमा करून करून तो जवळजवळ बंगालीच होऊन गेला होता... त्यांची भाषादेखील त्याने उत्तमरित्या आत्मसात केली होती... इतकंच नाही तर पश्चिम बंगालमधील अनेक गिर्यारोहण संस्थांचा तो सदस्यही होता... इतर कोणा टिमबरोबर जाण्यापेक्षा त्याला बंगाली टिमबरोबर जाणं खुप आवडायचं...
बंगाली खाद्यप्रकार, मांसाहार आणि मिठाया यांचा तो चाहता होता... याचं मुख्य कारण म्हणजे त्याच्या वाईट दिवसांत याच बंगाली संस्थांनी त्याला आसरा दिला, कामं दिली आणि तगडा गिर्यारोहक शेर्पा म्हणून नांवारूपाला आणलं... तो इतका बंगालमय होऊन गेला होता की, हिमालयात काम नसलं कि तो बंगालमध्ये पहुडलेला असायचा. त्यामुळे पेंबानेही आपल्या जिगरबाज आरोहण कौशल्याच्या आधारे बंगाली समुदायाने दिलेल्या प्रेमभावनेची परतफेड अक्षरशः दामदुपटीनेच करुन दिली असंच म्हणावं लागेल...
एरव्ही सतत कामात व्यस्त असलेला पेंबा थोड्याशा सवडीतही मोकळेपणाने बोलायचा. शेर्पा समाजातील बेकारी, त्यांचे हलाखीचे जीवन, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ, आरोहणप्रसंगी झालेल्या अपघातांवेळी विम्याचा प्रश्न इत्यादींचा काच त्याला कुठेतरी आत खोलवर जाम सलायचा... त्यांच्यासाठी एखादी योजना सुरु करण्याची त्याची खुप इच्छा होती. त्यांच्या अठराविश्व दारिद्र्यामुळे व्यथेमुळे पेंबा बोलता-बोलता सद्गदित होऊन जायचा... शेर्पा समाजातून जे पुढारले, मोठे झाले त्यांनी स्वतःपुरतेच पाहून गरिब गिरीजन शेर्पा समाजाकडे पाठ फिरवल्याबद्धल त्याचे डोळे पाणावून यायचे.
सुरुवातीला मोठ्या भावाबरोबर किरकोळ भारवाहक म्हणून येऊन, पडेल ती कामं करणारा पेंबा... या क्षेत्रातला त्याचा गुरू टेंडी शेर्पाने उत्तराखंडातील भृगुपंथ या शिखरावरील मोहिमेत स्वतंत्ररीत्या शेर्पा म्हणून पाठवले. ती मोहिम स्वकर्तृत्वाने जबर हिंमतीने यशस्वी केल्यानंतर पेंबाने कधीही मागे वळून पाहिले नाही... त्याच्या कर्तृत्वाचा आलेख कायम चढताच राहिला... शेर्पा समाजातही त्याने आपले भरीव योगदान दिले असल्यामुळे त्याच्या लोकप्रियतेचा आलेखही चांगलाच उंचावला होता.
आज गिर्यारोहण विश्वात अनेक विक्रमवीर आणि मोठमोठया पुरस्कारांचे मानकरी म्हणून दिमाखात मिरवणाऱ्यांच्या बेगडी यशामागे याच पेंबाची अपार मेहनत आहे... हे आता त्या सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवले पाहिजे... आणि आपल्या पुढील कर्तव्याला जागलेच पाहिजे... कारण आता पेंबादाचं कुटुंब... निराधार झालंय... त्याची कच्ची-बच्ची आता उघड्यावर आलीयत... त्यांच्या पालनपोषणाची, शिक्षणाची, त्याच्या विधवेच्या निर्वाहाची व्यवस्था व्हायला हवी अन्यथा... अनर्थ होईल... आता ही आपल्या गिर्यारोहक समुदायाची मोठी आणि नैतिक जबाबदारीही आहे...
आता पेंबादाची कधीही भेट होणार नाही... या विचाराने मनात आता प्रचंड काहूर माजवलंय... आठवणींच्या कप्प्यांतील त्याच्या लहान मुलासारख्या गोल गोब-या गालावरील ते निरागस हसू कधीही पाहता येणार नाही... या विचाराने मन कातर होऊन गेलंय... शिखराच्या बेसकँपवर बसल्या बसल्याच, पुर्वी झालेल्या पेंबादाशी झालेली पहिली भेट आठवू लागलो... त्याचं नांव बरीच वर्षे ऐकून होतो पण भेटीचा योग काही येत नव्हता...
२०१४ च्या ऑगस्टमध्ये मा. नुन च्या अंतिम शिबीरावरून भयंकर हिमवादळाशी सतत चार दिवस झुंज देऊनही आमची चढाई यशस्वी होऊ शकली नाही . तेंव्हा आम्ही मोहिम आवरुन परतीच्या वाटेला लागलो असतांनाच एका बंगाली टिमसह तेथील मोहिमेवर आलेल्या पेंबाशी मा. नुनच्या पायथ्याशी पहिल्यांदाच भेट झाली होती... त्या ओझरत्या भेटीतही पेंबाच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने मनात चांगलंच घर केलं... इतकं मोठं आणि जबरदस्त कर्तृत्व असूनही मला पेंबा अगदीच साधासुधाच वाटला... आणि मला तर वाटतं हा कमालीचा साधेपणाच त्याचं प्रमुख वैशिष्ट्य होतं...
पुढच्याच वर्षी २०१५ मध्ये पुन्हा एकदा पेंबाशी भेटण्याचा योग जुळून आला होता... मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने हिमाचल प्रदेशातील एक अजिंक्य अनामिक हिमशिखर सर करून त्यास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नांव देण्याच्या मोहिमेत सहभागी झालो होतो. त्यावेळी एक दुथडी भरून वाहणारा नाला पार करीत असतांना त्याच परिसरातील एका शिखराकरीता बंगाली पथकासह आलेल्या पेंबाशी अगदी उराउरी चांगलीच भेट झाली... काही वेळ विचारपूस, गप्पागोष्टी आणि चक्क फोटोसेशनही झालं... त्यावेळी मात्र अपरिचित असलेला पेंबा अधिकच जवळचा होऊन गेला... त्यावेळी पेंबासारख्या दादा गिर्यारोहकाचा नाझ्या मित्रयादीत समावेश असल्याचा जबर अभिमान वाटून गेला... चार-चौघात पेंबा माझ्या परिचयाचा आहे हे काॅलर टाइट करून सांगायला फार बरं वाटायचं...
गेल्या वर्षी भारताचे तिसरे अत्त्युच्च मा. कामेट किंवा मा. त्रिशूल च्या आयोजनात नको तेवढा उशिर अन् घोळ झाल्याने आमचा तो प्रयत्न तसाच राहुन गेला. यंदाच्या वर्षी मात्र मार्चच्या सुमारास पुणे व्हेंचरर्स चा कार्यवाह जमिर शेखने फोन करून मा. सासेर कांग्री मोहिमेतील सहभागाबाबत मला विचारले... भारताच्या या चौथ्या अत्त्युच्च शिखराचे नांव ऐकून मी क्षणाचाही विलंब न लावता फोनवरच तात्काळ होकार कळवून टाकला... ही महाराष्ट्र आणि बंगालची एक संयुक्त मोहिम होती... ज्यात एक टिम म्हणून पुणे व्हेंचरर्स आणि बंगालमधील एका टिमचा समावेश असणार होता... आणि आरोहक शेर्पा म्हणून चक्क पेंबा आणि त्याचे दोन पराक्रमी भावांचा सहभाग असणार होता. त्याचा लहान भाऊ ताशी देखील आपल्या दोन मोठ्या भावांप्रमाणेच प्रचंड पराक्रमी होता... त्याने भारतातील मा. एव्हरेस्ट, मा. कांचनजंगाच नाही तर पाकिस्तानातील मा. के२ हे जगातील द्वितीय क्रमांकाचे सर्वात अवघड शिखरही सर केले होते... मोठा भाऊ पासांग ज्याने गेल्या २५/३० वर्षात गिर्यारोहणातील अनेक उच्चांक पादाक्रांत केले होते... जगातील सर्वोच्च शिखर मा. एव्हरेस्ट आणि भारताचे सर्वोच्च कांचनजंगा आणि जगातील ३रे शिखर सर करणारे हे जगातील एकमेवाद्वितीय असे भाऊ होते... अशा प्रकारे एका आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मोहिमेत सहभागी व्हायचा आनंद मात्र खुपच मोठा होता.
प्रस्तुत मोहिमेकरीता पुण्यातून, चंदिगड-मनालीमार्गे लेहमध्ये पोहोचताच पुन्हा एकदा पेंबाची अपेक्षेप्रमाणे भेट झाली. आपल्या आवडत्या हिरोला पाहिल्यानंतर जो आनंद उचंबळून येतो अगदी तश्शीच माझी अवस्था होऊन गेली होती. त्यावेळी असं चुकूनही वाटलं नव्हतं की ही आमची शेवटची भेट असेल... आता मात्र आमच्या भेटींचा हा रंगबिरंगा सिलसिला कायमचाच खंडीत झाला आहे...
भविष्यात शेर्पा होतील, गिर्यारोहकही भरपूर होतील... पण पेंबासारखा निस्सिम पर्वतपुत्र मात्र एखादाच होऊ शकतो... गिरीपर्वत, गिर्यारोहण, गिर्यारोहक आणि गिरीजनांवर मनापासून प्रेम करणारा... अत्यंत मृदू आणि लोभस स्वभावाचा... भेटेल त्या प्रत्येकाच्या मनात घर करणारा... एखाद्या हिमशिखरासारखाच भव्य आणि उत्तुंग त्याच्या विविध स्मृतींचा दरवळ तर मनात कायम राहिलच... तरीही साश्रू नयनांनी त्याला अखेरचा मानाचा... जय... हिंद.
कित्येक वेळा तर भयंकर बिघडलेले हवामान आणि नैसर्गिक प्रकोपामुळे हातातून निसटलेल्या अनेक मोहिमा पेंबाने लीलया सावरून नेल्या, सहज-सुरक्षित यशस्वीही करून दाखवल्या...अशी साक्ष अनेक नामवंत गिर्यारोहक देतात.
सुन्न करुन सोडणाऱ्या या घटनेनंतर पेंबाच्या आमच्या सोबतच्या या शेवटच्या मोहिमेतील आठवणींसह इतरही अनेक आठवणी डोळ्यांसमोर फेर धरु लागल्या... पुर्वी भरदार, भरीव देहाचा दिसणारा पेंबा, आता उतारवयाकडे झुकतांना, आयुष्यात येऊ घातलेल्या थोड्याफार स्थैर्यामुळे आता अगदीच गोल गरगरीत शरीरयष्टीचा झाला होता...





























