एका सुंदर रविवाराची... सुरस कथा



एका सुंदर रविवाराची... सुरस कथा... 

पल्या रोजच्या आयुष्यात उगवणारा कोणता दिवस कसा असेल? याचा काही नेम नसतो... इतरांचे माहित नाही पण आंम्हां भटक्यांचे डोंगरातले, गडकोटांवरचे दिवस तर लाजवाबच असतात... पण कधीतरी शहरातला एखादा गुळमुळीत दिवसही त्यातील काही खास घटनांमुळे विशेष अविस्मरणीय ठरतो...अन् उबटशा, टिनपाट जगण्याला एक मस्त हवीहवीशी किनार लाऊन जातो... अशाच एका होऊन गेलेल्या दिवसाला आठवता-आठवता एका लेखुटल्याने सहजच आकार घेतला.

भटकंतीची भिंगरी पायाला लागली कि रविवारी घरी असणं दुर्मिळ होत जातं... पण अशा घरी असलेल्या रविवारच्या निवांत सकाळची तुलना मात्र कश्शाशीही होऊ शकत नाही...

अशाच एका घरच्या रविवारी... अगदी आरामात 'पहाटे' ८ च्या सुमारास किलकिले डोळे अजून नीटसे उघडलेच नव्हते...  पृथ्वीतलावर आमचं विमान अजून पुरतं टेकलंच नव्हतं ... तोपर्यंत आमच्या सरकारांनी अगदीच मंजूळ स्वरात आमच्या नांवाच्या उद्घोषणा चालू केल्या होत्या...

त्याचं झालं असं कि, कधी नव्हे ते तिला सकाळी लवकर उठून जायचं होतं मैत्रीणींसह पिकनिकला. आणि हा निर्णय अस्मादिकांस न पटल्याने आमच्या असहकाराचा झेंडा रात्रीपासूनच फडकलेला पाहून सकाळच्या मस्त गारव्यातही तिचा पारा चांगलाच चढलेला होता.

सुरुवातीला थोड्याफार किरकोळ करकुरीत आणि चुरचुरीत सुखसंवादानंतर घरात रणमैदान छेडलं जाण्याची चिन्हं दिसू लागली. मग, बरेच दिवस दडवून ठेवलेलं पांढरं निशाण हळूच बाहेर काढून तयारीत ठेवलं. आणि संधी साधून एक हुकुमाचा पत्ता टाकत ते पांढऱ्या तोंडाचं (खरं तर पांढऱ्या पायाचं ) निशाण नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सपशेल फडकवलं अन् अटकळीप्रमाणे सरतेशेवटी निसटत्या विजयाचे मानकरी ठरलो (असं म्हणायला हरकत नाही.) (होय... लक्षात ठेवा... अशा लढ्यांंध्ये पांढऱ्या निशाणाच्या बळावरच यश मिळवता येतं... अनुभवाचे बोल हो दुसरं काय?) सोबत फिरायला नेण्याच्या अटीवर एकदाचा तह झाला. (आता तहाच्या अटी, शर्ती मात्र विचारु नका हं...)

सरकारांनी ठरवलेल्या दिवसाचं माझ्याकडून अशा प्रकारे खोबरं केल्यानंतर, आता तिने बाह्या सरसावून भरल्या तोफांची तोंडं माझ्या कार्यक्रमाकडे वळवली. हो ... ना ... करता करता दिवसभराच्या कार्यक्रमावर भिरभिरणारं संभाव्य वादळ गरमागरम, अन्  तेही काळ्या चहाच्या पेल्यात बुडवून एकदाचे बाहेर पडलो.

जखमी, अर्धमेल्या तट्टावरुन अर्थात कायमच आजारी असलेल्या मोटारसायकलवरून आमची स्वारी निघाली दादरकडे... हाश्श... हुश्श... करत एकदाचा कित्तेभंडारी हाॅल गाठला.

शिवछत्रपतींच्या हिंदवी साम्राज्याचा एक मोहरा पार दक्षिणेकडील तामिळनाडूमध्ये चित्रदुर्ग उर्फ जिंजीच्या अश्मदुर्गाच्या रुपाने आजही आपल्या धन्याच्या अल्काबांचे पुकारे नित्यनेमाने देत उभा आहे... या दुर्गाचं रुपडं मात्र इतरांपेक्षां पार न्यारं आहे... त्याची जातकुळी अन् बाज एकदम अलग आहे... 'अश्मदुर्ग' हा शब्दप्रयोग धाडसाने करण्याचं कारण याला पाहिल्यावरच कळतं. तसे सगळेच गडकोट दगडा-मातीचे अर्थात अश्मदुर्ग असले तरी त्या सर्वांतही हा विशेषच ठरतो... शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचं एक मुळ तिकडे दक्षिणेकडे रुजलेलं आहे ही भावनाच उर भरून येणारी आहे...

तर... अशा अस्सल जातीवंत अश्मदुर्गाच्या ५०हून अधिक वाऱ्या केल्यानंतर बिनचूक, विनाखंड वाणीच्या अनिकेत या "वाघाच्या" बुलंद घणाघाती डरकाळ्यांच्या रुपातलं वर्णन् आणि निरूपण ऐकून कान धन्य झाले. रविवारी आणि तेही सकाळच्या वेळी लाभलेला चांगला, भरगच्च, दर्दी श्रोतावर्ग हेच "गडवाट" या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं खणखणीत यश होतं.

अशा उमद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतले किल्ले आणि मुंबईतल्याच थंडावलेल्या, हरवलेल्या अाणि गवसलेल्या तोफा या विषयावर त्यातलाच एक दर्दी असलेल्या नितीन पाटोळे आणि उपस्थितांसह, लवकरच छेडल्या जाणाऱ्या एका विषयावर चांगलीच चर्चा रंगली... बरेच दिवस प्रतिक्षेत असलेलं दुर्गमहर्षी प्रमोदजी मांडे यांचा महाराष्ट्राच्या दुर्गविश्वावर आधारीत नवीन ग्रंथही इथंच संग्रही आला.

आजचा दिवस विशेषच असल्याची चुणुक सकाळपासूनच मिळू लागली होती... त्यामुळे जे मिळेल ते आपलं असं म्हणत, बरंच काही पदरी पाडून घेत, गिर्यारोहण, गडकोटच नाही तर अनेक विषयांतील दर्दी आणि व्यासंगी असलेले राजेंद्र वराडकर (स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह)  यांच्या सहवासाचा आणि प्रेमपुर्वक आदरातिथ्याचा छान पाहुणचारही घेता आला. मग व्याख्यानाला आलेल्या अाणि  भटकंतीच्या अवकाशात अमाप भरा-या घेतलेल्या अरूण (खरं तर ... तरुण ) गवेकरांसोबत परेलचं कामगार स्टेडिअम जवळ केलं. मराठा सन्मान सोहळ्यानिमित्त तेथे एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाची ब-याच वर्षांनंतर होणारी भेटही आजच व्हायची होती.

सर्वश्री गिरीशराव जाधव... त्यांच्या प्राणघातक, जीवघेण्या तरीही अपरंपार निगुतीने जपलेल्या अद्भुत शिवकालीन शस्त्रसंग्रहाच्या प्रदर्शनार्थ आपल्या संपुर्ण लवाजम्यासहित तेथे आलेत असं सकाळीच समजलं. अन् लगोलग घरच्या रविवारच्या सर्व महत्वाच्या कामांना बाजूला ठेऊन जाधवरावांच्या सेवेत, मुजरा आणि आशिर्वादाकरीता आम्ही जोडीने गेलो... फोनवर कितीही संपर्क असला तरी तो केवळ दिलासाच असतो आणि प्रत्यक्ष भेट मात्र अनुभूतीच असते. 

सुमारे दहायेक वर्षांनी या पुण्यात्म्याच्या निवांत भेटीने मरगळलेल्या तना-मनाला उभारी लाभली... स्वीकारलेल्या कार्यात झोकून देण्याच्या विचारांना तेज तर्रार धार काढली गेली... राजेहो... या पुनर्भेटिने आयुष्यातला हा एक दिवस फार मोठ्या सत्कारणी लागला...

या उच्चविद्याविभुषित कोल्हापुरकराने उभं आयुष्य महाराज सेवेत अपार आनंदाने घालवलंय. आणि ज्या शस्त्रास्त्रांच्या साह्याने दौलतीच्या थोरल्या धन्याने देवांनीही हेवा करावा असं स्वराज्य आपल्या शुभंकर हाताने उभारलं त्याच देवतुल्य हातांचा परिसस्पर्श घडलेल्या औजारांच्या शोधात आणि त्यांच्या बळावर या अवलियाने एक आगळंवेगळं शस्त्रविश्व उभारलंय.

शस्त्र म्हणजे काय? त्यांचे प्रकार किती? ते चालवावे कसे? आणि कोणी ? त्यांची निगा कशी राखावी? त्याचा वापर  कशासाठी करावा? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात... आपल्याला फक्त तलवार माहिती असते पण त्यातही अनेक भेद, पोटभेद असतात... तिच्या प्रत्येक सुट्या भागाला वेगळं नांव असतं त्यामागे बराच काथ्याकुट असतो...शस्त्रांचंही एक शास्त्र असतं आणि हे सारं सारं साध्या-सोप्या सरळ भाषेत ऐकावं ते आमच्या  गिरीशजींकडूनंच. शस्त्रे ही केवळ धातुची नसतात. तर लाठी-काठी ही लाकडी अस्त्रे देखील प्रसंगी तितकिच प्राणघातक ठरतात अशी शस्त्रवचनं गिरीशजींकडून ऐकतांना आपल्या ज्ञानात भर पडत असते... उर भरुन येत असतात... मुठी आवळल्या जातात... इतकंच काय? हिरड्याही आपोआपच सळसळू लागतात.

शस्त्रास्त्रांच्या शोधात,, दुर्ग-पर्वत, गडकोट, गाव-शहरे, वाड्या-वस्त्या काही काही सोडलं नाही या मर्दमराठ्याने. अवघ्या आयुष्याचा सुलतानढवा करून सोडला. अाणि आता तर सत्तरीपुढची उमर गुजरलीय... पण आवेष ? एखादी लांबसडक धोप पाणी चढवल्यानंतर अपूर्व तेजाने, नवपराक्रमाच्या, नवोन्मेषाने झळाळून उठावी, कात सोडलेला पन्नग नवतारुण्याने, विद्युतलहरीसम सळसळून निघावा अगदी तस्सेच गिरीश जाधवराव आता एका अपुर्व कामगिरीसाठी सज्ज झालेले दिसले. त्यांच्या कार्याचं महत्व, त्यांच्या सहज सुलभ अन् ठसकेदार कोल्हापुरी लहेज्यात ऐकतांना, घोडखिंडीचं पावन तिर्थक्षेत्र केलेल्या, दोन्ही हाती चढवलेले दांडपट्टे नुसते दिखाव्यासाठी नाही तर डोळे उघडझापीचीही उसंत न देता वावटळीसमान गरागरा फिरवणारे बाजीप्रभू देशपांडेच डोळ्यासमोर उभे राहतात...   

काय म्हणावं या परमोच्च उत्साहाला? सत्तरीनंतरही कुठून येतं हे अपरिमित बळ ? असाच असतो का अपार अन् अगाध महिमा श्रीशिवसह्याद्रीचा?... इथं आजच्या ताज्या टवटवीत तारुण्याला मात्र नको त्या उद्योगांमुळे तिशी-चाळीशीतच 'काशी'यात्रेचे वेध लागलेले असतात...

जाधवरावांची भेट झालीकि एका किश्शाची आठवण हमखास काढली जाते... एकदा किल्ले रायगड भेटीत, एका अवखळ बैलाने भवानी टोकावरील गुहेत आम्हां तिघा-चौघांच्या समाध्याच उभारण्याचा घाट घालून त्या अवघड जागी जो भयंकर प्रसंग आमच्यावर बेतवला होता... त्या प्रसंगाला आठवून अंगावर शहारे उठलेल्या अवस्थेत मनसोक्त हसण्याचा रतीब ठरल्यानुसार त्या दिवशीही घातला गेलाच.

अशा अघळ-पघळ भेटीत सहजच आठवलं कि, माझ्या मोठ्या मुलाच्या आदित्याच्या बारशाचं आमंत्रण उशिरा मिळूनही ते आवर्जून हजर राहिले होते... बरं नुसतेच हजर राहतील तर ते जाधवराव सरकार कसले? मुलाच्या बारशाला येतानाही त्यांनी वाघनखं आणि शिवराया आणल्या होत्या... वर म्हणाले कसे? असं कसं? तुझा लेक आहे, तो काय साधा सुधा असणाराय का? आमचं बाळ न् आम्ही दोघंही धन्य होऊन गेलो. या शस्त्रगुरूच्या संगतीत आलं कि आयुष्याला धार चढल्याचा अनुभव आजही येतोच येतो.

धातूंची शस्त्रं थोडावेळ बाजूला ठेऊन ख-या शस्त्रांच्या अर्थात् शब्दांच्या म्हणजेच सोहळ्यातल्या पुस्तकांच्या दालनात शिरलो आणि हरवूनच गेलो... पुस्तकांशिवाय जगणं म्हणजे व्यर्थ काम... ग्रंथदालनात बराच वेळ रमल्यानंतर अचानकच कोणी दर्दी पेटीच्या तरल सुरावटींना छेडत असल्याच्या लकेरीने माझ्यातल्या तमाशाप्रेमीचं कुतूहल चाळवलं गेलं. पण पेटीच्या केवळ त्या सुरावटीच तमाशासंबंधीत होत्या आणि कार्यक्रम मात्र चक्क शाहिरीचा होता. माझा काहिसा रसभंग झाला. इतक्यात मंचावर आलेल्या १२-१३ वर्षांच्या एका कोवळ्या पोराने टिपेला चढवलेल्या आवाजात श्रीराजा शिवछत्रपती आणि त्यांच्या रानगट्ट्या मावळ्यांच्या आख्यानाला सहजी हात घातला. काय ती उमर ?... अन् काय तो आवेष ? राजे असते तर या बाळाला बोरन्हाण करतात तसं सोनमोहरांनीच आंघोळ घातली असती.

गिनिज बुक विक्रमवीर बालशाहिर पृथ्वीराज माळी याने आपल्या नाजूक पट्टीच्या तरीही तुफानी पहाडी आवाजात  श्रीशिवस्तुती ऐकवून कार्यक्रमात जान आणली. अवघं शाहिरी विश्व हे पोरगं दणाणून सोडणार यात काही शंकाच नाही उरली. ( या व अशा दिग्गज लोककलावंतांवर मागे एक लेख जमवला होता त्याची लिंक पुढीलप्रमाणे - शिवजयंती... जागर लोककलांचा...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1741703122563087&id=100001702477244 )


रात्रौ ८ च्या आसपास सोहळ्यातून बरंच काहि मिळवून (त्यात आमच्या हिने, सकाळच्या रागापायी केलेली बरीचशी खरेदी) बाहेर पडलो... तर आमची मोटारसायकल आम्ही गमावल्याचं लक्षात आलं... कुछ पानेके लिये कुछ खोनाभी पडता है... असं म्हणत शोध घेतला तर ... आमच्याच वाहतूक पोलीस बंधूंनी तीला सन्मानाने उचलून दादर येथे घेऊन गेल्याचे समजले... पोलीस दलाच्या सेवेत सुमारे पंचवीसेक वर्षं गेली असल्याने थोडंफार ओळखतात ... कार्यालयात गेलो तर लगेच परत मिळाली...

खिशात तिकिट असूनही टी.सी. दिसल्यानंतर कावरा-बावरा होणारा मी... पण केवळ भटकंतीच्या छंदामुळे, कोणीतरी मला ओळखून माझी मोटारसायकल परत दिल्याने माझ्या अंगावर चांगलं शेरभर मांस चढलं...अन् त्यामुळे प्रयत्नपूर्वक कमी केलेलं वजन मात्र झटक्यात वाढलं.

आता मात्र वेध लागले होते एका  गोड कामाचे... अहं... काहितरी गैरसमज करून घेऊ नका... धाकट्या बंधूराजांना झालेल्या कन्यारत्नाचं बाळमुख पहायला भयंकर व्यस्ततेमुळे दोन दिवसात सवडच झाली नव्हती...  रूग्णालयात जाऊन आमच्या घरच्या शिंदेशाहीतील सर्वात धाकट्या पातीला (अनुष्का - हे मी सुचवलेलं नांव ) भरभरून पाहिले... सरकारांनी आवर्जून आणलेल्या उत्तम बर्फीने उपस्थितांची तोंडं गोड केली... अन् अशा रीतीने... शहरातल्या एका सर्वांगसुंदर, अप्रतिम दिवसाचा कळसाध्याय पूर्ण होऊन अत्यंत गोड असा समारोप... सुफळ, संपुर्ण अन् संपन्नही झाला ...