साहित्यसह्याद्री... माझा सह्याद्री ...

साहित्यसह्याद्री...  "माझा सह्याद्री" ...

आत्म्याचा चिरंतन ध्यास न् धपापत्या उरातला श्वास 
माझा सह्याद्री...
जीवा, सखा, सजणा अन् त्याहूनही अगदीच खास
माझा सह्याद्री...
भटक्या जीवांची आन बान अन् शान...
माझा सह्याद्री...
तर.... अंतरीची जान अन् कुडीतला प्राणही...
माझा सह्याद्री...

कातळकोरीव, अनगड-अवघड, चिंचोळी वाट
माझा सह्याद्री...
दरीकाठच्या भयाण घसाऱ्यावरचा थरथराट
माझा सह्याद्री...
भटकंतीची राकट, रेखीव, अनवट वहिवाट
माझा सह्याद्री...
तर... भुल्या, भुकेल्या भटक्याचं भरलं ताटही...
माझा सह्याद्री...

निसर्गाच्या कुशीतला शिस्तबद्ध साहसी पदन्यास
माझा सह्याद्री...
कातळकोरीव लेण्या अन् गुहेतला धुंद सहवास
माझा सह्याद्री...
गडकोटांवरच्या अवचित धाडसाचा सावध अदमास
माझा सह्याद्री...
तर... किर्रकाटा रानातला अर्ध्या रातीचा घनघोर प्रवासही
माझा सह्याद्री ...

किलेकोटांच्या तटां-बुरूजांवरचा भिरभिरता भर्राट वारा
माझा सह्याद्री ...
स्वराज्यलक्ष्मीच्या अफाट दौलतीचा अकलंक तोरा
माझा सह्याद्री ...
गनिमी काव्याच्या अचाट युद्धनितीचा अनगड गुंगारा
माझा सह्याद्री ...
तर विश्वाच्या अफाट रचनेतला सुखद नजाराही
माझा सह्याद्री ...

मडक्यातलं गोडघट्ट दहि न् चवदार आंबटसर ताक...
माझा सह्याद्री...
कोरडीखट भाकरी न् खमंग चटणीवरल्या तेलाची धार..
माझा सह्याद्री...
बंबाळ्या रानातल्या, आंबटगोड मेव्यांचा सरताज...
माझा सह्याद्री...
तर कुडा-झापाच्या झोपडीतल्या मलंग श्रीमंतीचा बाजही
माझा सह्याद्री...

शहा-जीजाऊंच्या स्वर्णिम स्वप्नांचा तगडा मनसबदार
माझा सह्याद्री...
शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा मस्तमौला राखणदार...
माझा सह्याद्री...
ताना-बाजींच्या मावळी समशेरीचा कणखर वार...
माझा सह्याद्री...
तर धर्मवीर शंभूंच्या बलिदानाचा ज्वलज्जहाल साक्षीदारही
माझा सह्याद्री...

ज्ञानियांच्या राजाने रचिलेला विराट-विशाल पाया
माझा सह्याद्री...
तुकोबांरायांच्या सग्यासोय-या वृक्षवल्लींच्या राया
माझा सह्याद्री...
समर्थांच्या कणखर वाणीतली अपरंपार माया
माझा सह्याद्री...
तर कवीराज भुषणाच्या खड्या बोलीतला अत्तराचा फायाही
माझा सह्याद्री...