२२ तासांचा हिमथरार. . .

स्वातंत्र्यवीर  सावरकर जयंती
                                                                                                           दिनांक  २८ मे  २०१८.

स्थळ  - स्वा. सावरकर  राष्ट्रीय  स्मारक,  दादर,  मुंबई . 


         २२ तासांचा हिमथरार... 


१९९७ साली हिमालयाचं प्रथमच दर्शन घेतलं. तेंव्हापासुन आजपावेतो माझ्यावर याचं हुकमी गारुड तस्संच कायम आहे. त्याचा अादेश आला कि अक्षरशः राहवत नाही. आजही अगदी झपाटल्यासारखाच त्याच्या अंतरंगी हरवून जायला तडफेने निघतो.

२०१४ च्या अाॅगस्टमध्ये अशीच त्याच्या भेटीची इच्छा अनावर झाली अन् तितक्यात "माऊंट नुन" या जगप्रसिद्ध हिमशिखरावरील चढाई मोहीमेची संधी देखील चालून आली. असा मस्त, फक्कड बेत जुळून आल्याने अजिबात दिरंगाई न करता मोहिमेत दाखल झालो.

मा. नूनच्या Camp I वर पोहोचण्यापूर्वी प्रचंड Icewall वर  करावी लागणारी जीवतोड मेहनत

लडाख हा जम्मु-कश्मीरचा अतिदुर्गम भाग. भारतीय सेनेच्या अद्वितीय पराक्रमाने पावन झालेल्या कारगीलपासुन नजीकच्या "सुरू" खो-यातील माऊंट नुन हे एक बेलाग हिमशिखर. ७,१३५ मी./२३,४०० फुट उंचीचा हा अत्त्युच्च पर्वत आरोहणाच्या दृष्टीने अतिकठिणच्याही वरच्या श्रेणीचा असल्याने देश- विदेशातील साहसी गिर्यारोहकांच्या नेहमीच पसंतीचा असतो.

गिर्यारोहणातील एकापेक्षा एक खडतर आव्हानांनी अगदी ठासून भरलेला मा. नुन, वेळ पडल्यास पट्टीच्या आरोहकाला भर बर्फातही घाम फोडतो. अटीतटीच्या प्रसंगी तर प्राणही कंठाशी आणतो.

तर अशा मा. नुनवरील आमच्या घनघोर चढाईचा शेवटचा अंक सुरू झाला होता. प्रगत तळशिबीरापासून ताज्या दमाने सुमारे हजारेक फुटांची ६० ते ७५ अंशाची खडी बर्फभिंत आम्ही सहज चढून गेलो. आणि वरच्या टप्प्यातील विशाल हिमनदीवर शिबीर क्र. १ उभारले. ईथून संपूर्ण नून दृष्टीपथात येत होता. आमची टिम चांगल्या दमसासाची होती आणि २-३ दिवसांचे खराब हवामान, थोडा टाईमपास यांमुळे खालच्या शिबीरांवर विश्रांतीचा रतीब जरा जास्तच झाला होता. त्यामुळे वरच्या शिबीरांवर लोड फेऱ्या न करताच थोड्याशा पारंपारिक आणि काहिशा अल्पाईन अशा हायब्रिड स्टाईलने डायरेक्ट अटॅकची एक संमिश्र योजना आकाराला आली. या जलद चढाईच्या योजनेमुळे उगाच पकपक करून डोक्याचं कडबोळं करणारे हरयाणाचे दोन नको असलेले मोहरे आपोआपच गळाले.

चढाईतलं अप्रतिम कसब दाखवत एका अणकुचीदार सुळक्याच्या माथ्यावर फक्त २ टेंट राहतील इतक्या धोकादायक जागेत उभारलेला कँप २ आम्ही पहाटेच्या भयंकर गारठयात सोडला. पुढे तर त्याहूनही खतरनाक बर्फ उतारावर शेवटचा कँप ३ उभारला. इथून त्याच रात्री अंतिम टप्प्याची चढाई करून पहाटेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शिखरमाथा गाठण्याचा अामचा मनसुबा होता. थोडक्यात काय तर खुशीतली गाजरं खाण्याचा अंक सुरु झाला होता.

मा. नूनच्या अगदी पायथ्याचा कँप-१ 

तांत्रिक दृष्टया कुशल आरोहणाची सर्व शस्त्रास्त्रं परजुनच आम्ही मैदानात उतरल्यामुळे तयारी तर जय्यत होती. नुन सारख्या नामांकित, अतिकठिण श्रेणीच्या शिखरावरील या मोहीमेत आत्तापर्यंत सर्वकाही सुरळीत झालं. बस्स... आता मध्यरात्री अंतिम चढाईसाठी निघायचं या विचाराने थकल्या गात्रांनाही चेव चढला होता. इतक्यात हिमालयात सर्वात महत्त्वाचा रोल निभावणा-या हवामानाने नेमक्या वेळी आमची साथ सोडली. एखाद्या फितुराप्रमाणे त्याने आमच्याविरुद्ध उभा दावा मांडला. अन् मिट्ट काळोख्या रात्री त्याची वेगळीच खेळी सुरु झाली. ती पूर्ण रात्र अन् २रा संपूर्ण दिवस प्रतिकूल हवामानाशी झोंब्या घेण्यात गेला.

या अनपेक्षित तांडवामुळे, आमच्या अगदी पुढ्यात शांतपणे पहुडलेल्या यशाकडे आशाळभुतपणे पाहण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नव्हतो. ललचावल्या नजरेने आम्ही पुढ्यात पहुडलेल्या यशाकडे पहात होतो... पण त्याचवेळी शिका-याचीच शिकार करण्यासाठी कोणीतरी दबा धरुन बसलेलं होतं याची आंम्हांला कल्पनाच नव्हती.

Camp I गाठल्यानंतर आनंद व्यक्त करताना ... पृष्ठभागी जगप्रसिद्ध हिमशिखरे मा. नून आणि मा. कुन ... 

जराही उसंत न देता वादळवारा रात्रंदिवस भरारत राहिला.  चारी बाजूंनी गरजणा-या वादळाने खिंडीत गाठुन आमची पूर्ण नाकेबंदी केली. तिस-या दिवशी मात्र मोहीम, शिखर, चढाईचा विचार दुर ठेवून शिबीर क्र. ३ वरील २१,५०० फुटांवरील त्या भयाण परिस्थितीत जीव वाचवण्याची आमची धडपड सुरू झाली. वादळी वा-याचा जोरच इतका होता कि आमचे टेंट आमच्या सहित उडणार तर नाहीत ना? या भीतीमुळे, दिवसाच नाही तर रात्री झोपताना देखील आम्ही पूर्ण तयारीनिशी, अगदी बर्फातील चढाईचे बुट देखील पायात चढवूनच होतो. सरतेशेवटी सर्वात अनुभवी सदस्य म्हणून मोहिमेबाबत निर्णायक मताची मागणी सर्वानुमते माझ्याकडे करण्यात अाली. माझ्याकडे तर भरपुर रजा शिल्लक असल्याने मला ती मोहिम अर्ध्यावर सोडणं तर जीवावरच आलं होतं... पण एकंदर सर्व बाबींचा सर्वंकष विचार करता ती मोहीम गुंडाळण्याचा कटु निर्णय  मलाच घ्यावा लागला. तो पर्वत तेथून अजिबात हलणार नव्हता, पण अाम्ही जगलो वाचलो तर पुन्हा येऊ अशा संपूर्ण सकारात्मक विचाराने यशस्वी माघारीचा निर्णय झाला.

हाता - तोंडाशी आलेला घास सोडताना ... जीवावर आले होते... पण जीव वाचल्याचे समाधान त्याहून मोठे होते...

चौथ्या दिवशी सकाळी उशिरा हवा थोडी पडल्याचे पाहून "जान बची तो लाखो पाये" म्हणत अगदी दाट धुक्यातच तो भया-भया पर्वत अगदी सावधपणे उतरायला घेतला. ग्लेशियरवरील सुरक्षीत टप्प्यावर येई पर्यंत कसलीच शाश्वती नव्हती. त्या दिवशी कसे बसे बेसकँपवर पोहोचून सुटकेचा एक भला, थोरला नि:श्वास टाकला. फार हायसं वाटलं.

मा. नून वरील हिमवादळाला तोंड देत परतीच्या वाटेवरील... Camp II गाठला... 

अचानक घोंघावत आलेल्या बदनाम हिमालयीन वादळाने आमच्या हाताशी आलेलं एक उत्तुंग यश अगदी सहज हिसकाऊन, अोरबाडून नेलं. मनातुन सर्वजण नाराज असलो तरी एका भयकांडातुन सदेह आणि सजीव परतण्याचं मोठ्ठं समाधान घेऊन परतीच्या मार्गावरील कारगील लगोलग गाठलं. नुनवर तडफेने लढलेली माझी थकली-भागली टीम तेथून अापापल्या घरट्यांकडे भुर्रकन उडून गेली.

मा. नून वर प्राणपणाने लढलेली टीम.... तंगोल गावातील रेस्ट हाऊसमधील वास्तव्यादरम्यान

माझी रजा अन् अंगातली मस्ती अद्याप पुरेशी जिरली नव्हती. त्यामुळे ... आणि अशा रीतिने माघारी फिरणं माझ्या पचनीही पडत नव्हतं. भरपुर विचाराअंती, काहीच नाही तर निदान लेह तरी भटकून घेऊ या विचाराने मी पीछेमुड करून मुंबई ऐवजी भटक्यांची पंढरी अर्थात लेहची वाट धरली.

कारगील ते लेह या सुमारे ८ तासांच्या गाडीप्रवासानंतर लेहमधे पाय ठेवताच भयंकर गारठयाने अगदी झोंबतच स्वागत केलं. उत्तम बोलबच्चनगीरीने कमी खर्चात एका   ब-यापैकी होमस्टेची सोय असलेल्या आतिशा या लाॅजवर मी बस्तान मांडले. दुस-या दिवशी सक्काळीच लेहमधील इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशन अर्थात IMF चे कार्यालय गाठले. तेथे भारतीय गिर्यारोहणातील एक नामी हस्ती श्री. सोनाम वंग्याल यांची भेट झाली. १९६५ च्या पहिल्या यशस्वी भारतीय एव्हरेस्ट वीरांपेकी एक असलेले श्री. वंग्याल लेहमध्ये IMF चे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते.

हिरो आॅफ लडाख सोनाम वंग्याल यांच्या कार्यालयातील भेटीदरम्यान...

मी नुकताच मा. नुन मोहीमेहुन परतलो असुन मला लेहमधील मा. स्तोक कांग्री हे ६१२३ मीटर उंचीचे हिमशिखर सर करण्याची इच्छा आहे असे सांगताच त्यांनी १ कडक चहा देऊन अगदी आपुलकिने माझी विचारपूस केली. गप्पांच्या दरम्यान स्तोक कांग्रीवर मला एकट्यानेच जायचंय या माझ्या हट्टामुळे त्यांनी माझी सखोल चौकशी केली. अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेलो नाही याची खात्री पटल्यावरच मला त्यांनी IMF ची मंजुरी दिली. तसेच
मा. स्तोक कांग्री शिखराबाबत अत्यंत मोलाची सविस्तर माहिती आणि कच्चा रुटमॅप एका कागदावर काढून देऊन मला खुपशा शुभेच्छाही दिल्या.

गजबजलेल्या लेहमध्ये मी मात्र एकटा जीव सदाशिव होतो. अाणि माझी मोहीम सुद्धा एकल प्रकारची होती. मला अशा मोहीमांची सवय होती अशातला भाग नाही. पण हिमालयीन गिर्यारोहणाचे ४ खडतर प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि हिमालयातील १०-१२ मोहिमांच्या अनुभवानंतर असा एखादा अनुभव मला नक्कीच हवा होता. आणि ही अगदीच एकल म्हणावी अशीही मोहीम नव्हती. इथं फक्त सोबतीला माझ्या अोळखीचं, अडचणीत मदतीला उभं राहणारं, काही दुखलं-खुपलं तर मायेने जवळ घेऊन दवापाणी करणारं कोणीही नव्हतं. गेलाबाजार मुंबई-महाराष्ट्रातलंही इथं कोणी नव्हतं. अशा परिस्थितीत मला मा. स्तोकचं आव्हान पेलायची वाढीव खुमखुमी अाली होती इतकंच.

एका स्वच्छ, निरभ्र सकाळी मला एकट्याला आरामात झेपेल इतकीच सॅक घेऊन मी सकाळी ९ वा. टॅक्सीने लेह सोडलं. निश्चित असं काहीच ठरवलं नव्हतं. अन् ३०-४० मिनिटातच स्तोक गावात येऊन थबकलो. टॅक्सीवाल्या जाकिरशी तेवढ्या कमी वेळेतही चांगला मेळ जमल्याने त्याला आग्रह करून एक मस्त चहा पाजला. तेथे काही स्थानिक गाईड मंडळी, विदेशी पथकांचे सामान घोड्यांवर लादून स्तोक मोहीमेकरीता निघण्याच्या तयारीत दिसले. त्यांच्याकडुन पुढील वाटेची, अडी-अचणींची माहिती घेऊन माझी पायगाडी चालू केली. ती माणसे चांगली होती. मला एकट्याला पाहुन त्यांना आश्चर्य वाटल्याने त्यांनी मला तासभर थांबून त्यांच्या सोबत निघण्यास सांगितलं. पण खरं तर मलाच सोबत नको असल्याने त्यांनी दाखवलेल्या आपुलकीबद्धल आभार मानून मी माझ्याच मस्तीत पुढे निघालो.

स्तोक गावातील नदीपात्राशेजारची, धुळभरली, खाचा खळग्यांची, दगडगोट्यांची पण तरीही मस्त अशी वाट. सकाळच्या दहाचा सुमार, अगदीच कोवळ्या उन्हातली सोनकिरणे, स्वच्छ हवामानातला मंद, हवाहवासा गारवा अन् अंतर्बाह्य उत्तेजित करणारं आल्हाददायक वातावरण. पहिल्या तासाभरात एक छोटासा थांबा घेऊन फ्रेश झालो. अन् दुस-या तासाला थेट चांगमा गाठलं.

स्तोक सोडल्यानंतर या मार्गावर पहिलं ठिकाण लागतं ते हे चांगमा. येथे वस्ती नाही. फक्त १ टपरीवजा कॅन्टीनचं खोपटं. त्यात चहा, मॅगी व बिस्किटे मिळायची सोय होती. मग क्काय १ मोठा मग भरुन आवडत्या काळ्या चहाशी खारी बिस्किटं घेऊनच मार्गस्थ झालो. पण माझं असं चहा घेऊन गरमा-गरम होणं कोणालातरी बघवलं गेलं नाही. अन् भर दुपारच्या उन्हात अचानकच हिमवर्षावास सुरूवात झाली. मी देखील त्याला न जुमानता तसाच बेगुमान चालत राहिलो. मी थांबत नाही हे बघून काही वेळाने तोच थांबला. अन् मला मात्र चांगलंच हसू आलं.

चांगमा पासुन वाट आणखी मस्त झाली. दोन्ही बाजूंनी लडाखचं वैशिष्ट्य असलेल्या रंगबिरंग्या ताशीव कडयांची तटबंदी अन् मधोमध वाहणाऱ्या लहान-मोठया ओहोळ-धारांची संगत. असे सुमारे पुढील २ तास मजेमजेत चालत मी मनकर्मो येथे येऊन पोहोचलो. या वाटेवरचा हा महत्त्वाचा टप्पा. उंची सुमारे ४५०० मीटर. येथे तंबू निवासाची रेडीमेड सोय आहे. पुढील अतिउंचीवरील हवामानात रुळण्याकरीता इथे १ मुक्काम करणं अनिवार्य अाहे. पण मला यावेळी हा नियम लागु नव्हता. कारण इथे येण्यापुर्वी मी २१,५०० फुटांवर अत्यंत बिघडलेल्या हवामानात काही दिवस चांगलीच झुंज देऊन अाल्यामुळे अतिउंचीवरील हवामानाला मी सरावूनच आलो होतो.

मनकर्मोला मी माझ्याजवळचा सुकामेवा, भरपूर पाणी अन् काळा चहा घेतला. घड्याळाने दुपारचे २ वाजून गेल्याचे बजावले. थोडा सुस्तावल्याने पाय निघत नव्हता. पण रेंगाळणेही परवडणारे नव्हते. तेथे टाईमपास करायचा मोह अावरुन मी पायगाडी पुढे दामटवली. इथून बेस कँपचे अंतर फार नव्हते. पण वाट चढणीची आणि दमछाक करणारी होती. आता थकवाही जाणवू लागल्याने माझा वेग आपोआपच मंदावला. पुढील २ तासांत हळूहळू का होईना सांजावण्याआधीच मी बेस कँपवर दाखल झालो.

बेस कँप म्हणजे चक्क ५००० मीटर उंचीवरील वाळूचं एक विस्तीर्ण मैदान होतं. इथेही व्यावसायिक तत्वावर रंगीबेरंगी तंबूंची जत्रा उभारली होती. मी खुप थकलेला असल्याने भाड्याच्या तंबूची चौकशी करण्यासाठी एका मोठया पसरट तंबूत डोकावलो तर ते तंबूहा‌ॅटेल असल्याचे दिसले. २ कळ्ळकट्ट स्थानिक तरूण ते चालवत होते. त्यातील एका मनकवड्याने मी आत शिरताच वाफाळत्या ब्लॅक टीचा मगच माझ्या हातात ठेवला. मग काय? कळकट-मळकट असला तरी तो चहा देणारा त्या क्षणाला माझ्यासाठी देवदूतच होता. अन् तो भरपूर चहा तर त्यावेळी मला जबर ताकद देऊन गेला.

लेह सोडल्यानंतर इथे पोहोचायला खाद्या सुदृढ व्यक्तीला किमान २ ते ३ दिवस सहज लागू शकतात. आणि मी मात्र सकाळचा चहा लेहमधे घेऊन सायंकाळच्या चहाला स्तोक कांग्रीच्या बेस कँपवर हजर होतो. याला "ग्रँड मस्ती" शिवाय काहीही म्हणता येणार नाही.

इतक्या कमी वेळेत बेसकँप गाठण्याची कसरत केल्यामुळे अंगातला इंच न इंच भाग रस-रसुन आला होता. शरीरातील एकूण एक स्पेअर पार्टस् ढीलावले होते. तिथल्या वाढत्या गारठ्यात थकवाही कमालीचा वाढत होता. पण मला गळपाटुन जमणार नव्हतं. किमान स्वतःची काळजी घेण्यासाठी तरी मला खंबीरपणे उभारणं गरजेचं होतं. चहाने आलेल्या तरतरीने लगेच पुढची अाखणी करून घेतली. अचानक आलेल्या सुमारे शे-दिडशे विदेशी पाहुण्यांच्या एका मोठ्या गटामुळे तिथल्या उपलब्ध साधनसामुग्रीवर जबर ताण आला होता. याचं पर्यवसान म्हणून  त्या जीवघेण्या गारठ्यात माझ्या वाट्याला नेमका फाटका तंबू अाला. पण मी इथं मजेमजेत तंबूतली रात्र काढायला आलो नव्हतो. माझं ध्येय अन् माझं आकाश मात्र वेगळं होतं.

गारठयाचा आणि एकंदर परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी पध्दतशीर जामानिमा करुन बेस कँपच्या तंबूजत्रेत एक फेरफटका मारला. त्यामुळे सडकून भूक लागल्याने तस्साच त्या विशालकाय तंबू हाॅटेलात शिरलो. तो तंबू हाॅटेलवाला मनकवडाच असावा. मला पाहताच त्याने इशारा केला. त्याची आज्ञा शिरसावंद्य मानून लगेच बैठकिवर फतकल मारली. पुढयातील गरमागरम टोमॅटो सुप आणि डाळभाताची मऊशार रेशमी खिचडी मी अक्षरशः मनसोक्त ओरपली. मी पूर्णपणे शाकाहारी असल्याने माझ्यासाठी त्या उंचीवर आणि प्रतिकूल परिस्थितीत तो बेत मेजवानीपेक्षाही सरस होता.

पोटोबाचा मोगँबो खुष होताच बाहेर आलो तो भयंकर गारठयामुळे तिथेच गोठतो की काय अशी अवस्था झाली. कसलाही विचार न करता तात्काळ माझा तंबु गाठला. पण या क्षणाला तोही माझ्यासारखाच फाटका. थंडी अडवण्यासाठी सॅकचा नीट आडोसा करुन घेतला. रात्रीच्या तयारीवर अन् घड्याळावर एक नजर फिरवली तर काट्यांनी ९ चा इशारा केला. ते पाहुन चुपचाप मस्त उबदार स्लिपिंग बॅगमध्ये शिरुन निद्रादेवीच्या आराधनेत व्यस्त होऊन गेलो.

मध्यरात्री उठून करावयाच्या कसरतींच्या उजळणीची  विचारचक्रं डोक्यात भयंकर वेगाने धावत होती. त्यामुळे झोप अशी लागलीच नाही. पण त्या ३ तासांत, मागील १३ तास शिणलेली पाठ सरळ करून घेतली. रात्री १२च्या आसपास मोठ्ठी गडबड एकुन बाहेर आलो तर अंधारातच अनेकांची तयारी चाललेली. काहिंनी तर पुढच्या वाटेवर रांग धरलेली. हेडटाॅर्चमुळे ते सर्व जण दूरवरुन, पतंगाला बांधलेल्या तरंगत्या दिव्यांप्रमाणे दिसत होते. फार वेळ न लावता धावतच मी किचनटेंट गाठुन माझा पॅकलंच उचलला. अर्धवट गरम चहा कसाबसा शरीरात ओतला. घाई-घाईने बाहेर येऊन सॅक पाठीवर लावत असतांनाच एका प्रेमळ आवाजाने माझं लक्ष वेधलं. तशा किट्ट अंधारातही माझ्या चेह-यावरचे गोंधळलेले भाव पाहून त्याने हातातल्या बाॅक्समधून केकचा एक भला थोरला तुकडा माझ्या हातात कोंबला. "मेरा भाई चराईके बखत पेट खाली नहीं होना चाहिये" नेकी अौर पुछ पुछ ? हा आदेश आणि तो केक हे दोन्हीही मी माझ्या पोटात लगेच कोंबले. उत्कृष्ट स्वादाच्या त्या केकसाठी त्या दिलदार शेर्पाचे आभार मानून मी लगेच वाटेला लागलो. गारठा अस्सा होता की बस्स्स... पुछोहि मत. वेगवान हालचाली करीत मी रात्री १च्या दरम्यान बेसकँप सोडला.

ग्लेशियरकडे जाणारी एक वाट सरळ बेसकँपवर उतरली असल्याने सार्यांनी तिकडेच मोर्चा वळवला होता. ते सगळे अापापल्या गाईडसह तर मी आपला "एकला चालोे रे" च्या नादात एकटाच. अर्ध्या तासातच मी ती चढणीची वाट संपवली. भराभर चढून आल्याने लगेच घामाघूम झालो. त्या टप्प्यावर बरीच मोकळी जागा होती. ते या मार्गावरील विसाव्याचं ठिकाण असावं. सर्व विदेशी मंडळींनी सोबत आणलेले गाईड त्यांची सेवा करीत होते. चहा-पाणी हवं नको पहात होते. त्यावेळी मला मात्र त्यांचा फारच हेवा वाटला.

अंधार खूपच दाट होता. पण लांब अंतरावर काही हेडटाॅर्च दिसल्याने मला पुढच्या वाटेची कल्पना आली. मी स्टार्टर मारला. मऊशार माती एवजी आता खडकाळ हिमालयीन मोरेन सुरु झालं. फार लांबवर दिसत नसल्याने जपून वाटचाल करत तासाभरात दगडखडकांचे गाव संपवून हिमनदीवरील बर्फनगरीत प्रवेश केला. तपमान शून्या- खालीच असल्यामुळे बर्फाची स्थिती उत्तम होती. पण हिमनदीचा तो भाग दगड, मातीयुक्त असल्याने चालण्या- साठी फारसा अनुकूल नव्हता. तरीही तासाभराच्या इकडम -तिकडम नंतर बर्फावरील चालही संपली. अन् खड्या चढाईवरील आरोहण सुरू झाले. हे अारोहण मात्र खरंच त्रासदायक होतं. पहाटेचे ३ वाजून गेले होते. अंधारयात्रा काही संपत नव्हती. हेडटाॅर्चच्या टिमटिमत्या उजेडातला कारभार सगळा. अचानक अंधार आणखी गडद झाला. भुरभुरता हिमवर्षावही उधाणाला आला. यालाच म्हणतात आधीच हौस आणि त्यात पाऊस.

एकतर बर्फाच्छादित खडकाळ उभा चढ. तशात त्या खडकांवर तयार झालेल्या व्हर्ग्लासने ( खडकाच्या पृष्ठभागावर तयार झालेला टणक बर्फाचा पातळ पापुद्रा)  जेरीला आणलं. अनेक विदेशी यजमानांनी त्याबाबत कुरबुरी सुरू केल्या. बर्फात वापरण्याचे विशेष बुट आणि त्यावरून घडवायचा खिळ्यांचा जोड (क्रँपाॅन्स) सर्वांकडेच नव्हते. त्यामुळे व्हर्ग्लासवरुन घसरून पडल्याने अनेकांचे खुप हाल झाले. अनेकांच्या स्नो / वाॅकिंग स्टिक्स मोडून पडल्या. तशातच बिघडलेल्या हवामानाचा नुर पाहून अनेक देशी/ विदेशी पथकांनी माघारी फिरण्यात धन्यता मानली.

मी एकटा असलो तरी माघार कधी घ्यावी याचे उत्तम भान व हिमालयातील लहरी हवामानाचा चांगला अनुभव गाठीशी होता. आणि मा. नुनवर याची रंगीत तालीम नुकतीच केली होती. सुमारे तासभर चांगलेच थैमान घालुन हवा शांत झाली. बोच-या वा-याचा सामना करतांना खूप शक्ती खर्च होते. बराच दमलो होतो. जरा बरी जागा पाहून बसकण मारली. सॅकमधून पाणी व ज्युस काढून घेतल्याने जीवात जीव आला. विदेशी लोकांबरोबर परतीचा निर्णय न घेतल्याबद्दल मी स्वतःच्या बेरडपणावर खुष होऊन शाबासकी दिली.

वातावरण काहीसे कुंद झाल्याने गारठाही कमी झाला होता. आकाशही निरभ्र झाले असावे म्हणून नजर वर केली अन् संमोहित झाल्यासारखा हरवून गेलो. नभांगणात रंगीबेरंगी टिमटिमत्या चांदणचु-याचा सडा पसरला होता. हात लांब केला की जणु मुठभर हाताशी येईल असा.

मनोवेधक  भावविश्वात हरवलेला असतानाच मी माझा विचार करू लागलो. इथं असं एकटयाने येण्याची काही गरज नसताना मी नाहक हे धाडस का करावं? अनेक जबाबदाऱ्या डोक्यावर असतानाही मी हे जे काही करतोय ते योग्य होतं कां ? एक ना अनेक प्रश्न माझ्यापुढे फेर धरून नाचू लागले. पण मीहि काही कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. त्या सर्व नकारात्मक प्रश्नांचा हल्ला मी निकराने मोडून काढला. कारण अशा ठिकाणी त्यांनी माझा ताबा घेणं योग्य नव्हतं. मनात गुंतत चाललेली सर्व जळमटे झटकून दूर केली अन् भानावर येऊन पाहतो तर हवामानाचा पाठशिवणीचा खेळ सुरू झालेला. पुन्हा एकदा हवामानामुळे यश पाठ फिरवून जातं कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मी डगमगणं सोडूनच दिलं होतं...

माझी लढाई अजून संपली नव्हती कारण मी अजून खंबीरपणे उभाच होतो. काहिसा, विचारतारांच्या छेड छाडीतच पण सावधपणे एका अरूंद धारेवर आलो. एकावेळी जेमतेम एकचजण तेही सावधपणेच चालू शकेल एवढीच तिची रूंदी. पलीकडे हजार फुटांचा खोल दर्रा. अंधुक धुकंभरल्या प्रकाशात निट निरखून पाहिले तर ती खडकाळ धार बरीच लांबलचक पण थेट शिखरमाथ्यावर नेऊन सोडणारी दिसली. त्या अरुंद धारेवर थोडं थांबून भरभरून घेतलेल्या काही सखोल श्वासांमुळे बरं वाटल्याने पुन्हा चढाई सुरू केली. मध्यरात्रीपासून ६ तास सतत चढाई सुरु असल्याने आता ती फार उरली नसावी असं वाटत होतं. त्याच वेळी शरीरात देखील फारसे त्राण उरले नव्हते याची पण जाणीव होत होती. जवळचे पाणीदेखील संपून गेल्याने मी नेहमीच्या सवयीने बर्फ उचलुन चघळू लागलो.

अर्ध्या - पाऊण तासांत त्या निरुंद धारेवरील सर्कस संपवुन सुमारे फुटभर खोल बर्फउतारावर येऊन पोहोचलो. उभ्या उभ्याच २ मिनिटे श्वास नीट केला. अन् जिवाच्या आकांताने सगळी शक्ती लावून त्या निसरडया मऊशार बर्फात न डगमगता बुटांवर सहज चढवण्याचे स्प्रिंगचे क्रँपाॅन्स रोवून पुन्हा थोडी उंची चढून गेलो असेन तोच काही परिचित  आवाजांमुळे मी सावध झालो. क्रँपाँनमुळे बर्फावर होणारा खर्रक खर्रक अावाज थांबवून कानोसा घेउ लागलो... अचानक मिट्ट धुक्याचे पट झरझर वितळू लागले अन् समोरचे दृश्य पाहून मला देखील जल्लोष करावासा वाटला.

२२ तासांची स्वप्नपूर्ती...
रात्री माझ्या २/३ तास आधी आरोहण सुरू केलेल्या विदेशी आरोहकांच्या तुकडीने मोहीम फत्ते करून कल्लाकारी सुरू केली होती. शिखरमाथा दिसल्यामुळे एका वेगळ्याच शक्तीने भारल्या सारखा माझाही वेग वाढला. अन् काही वेळातच मी देखील माथ्यावर होतो. थोडं हाश्श...हुश्श करुन सावरल्यावर शिखरमाथा न् परिसराच्या निरीक्षणास  सुरूवात केली.

स्तोक कांग्रीच्या त्या सर्वोच्च बिंदूवर लहान-मोठ्या दगडांची ४-५ फुट उंचीची मोठ्ठी रास रचली होती. त्यावर भुरभुरत्या बर्फाने छान सजावट केली होती. तीवर बौद्ध धर्माच्या रंगीबेरंगी ध्वज पताका, तोरणे लावून मस्तपैकी सजवलेले दिसले. वा-या -मुळे फडफडणा-या त्या धर्मपताका फुलपाखरांच्या थव्याप्रमाणे तिथल्या आनंदात भर घालत होत्या. नुकत्याच पोहोचलेल्या विदेशी चमुच्या गाईडने तेथे काही पुजाविधी केल्या. इतक्या बिघडलेल्या परिस्थितीतही शिखरचढाई सुखरुप आणि यशस्वी झाल्याबद्धल त्याने काही विधी करून, सुगंधी धुप जाळून त्या शांत, निरव वातावरणात आमचे आध्यात्माशी डायरेक्ट कनेक्शन जोडून दिले.

एव्हाना चांगलेच उजाडले होते. सूर्याच्या कोवळ्या सुवर्ण रश्मींनी परिसरातल्या सर्वच हिमशिखरांना न्हाऊमाखू घालून मस्त तजेलदार केले होते. जवळपासचा परिसर नजरेत येऊ लागला तरी दूरवर मात्र अद्याप धुक्याचेच साम्राज्य पसरले होते. त्यामुळे काही नामचीन शिखरांचे दर्शन होऊ शकले नाही. अगदी स्वच्छ हवामानात तर इथून पाकिस्तानातील जगद्विख्यात 'के२' हे मातब्बर हिमशिखरही दिसते असे मला वंग्याल साहेबांनी सागून ठेवले होते पण आज हवामानाच्या असहकारामुळे त्याच्या दर्शनाचा काही योग नव्हता.

मोहीम यशस्वी झाली यावर माझा विश्वासच बसत नव्हता. ज्या चिवटपणे मी माझं ध्येय पूर्ण केलं त्याला तोड नव्हती. या यशाकरीता मी स्वतःला मनापासून शाब्बासकी दिली. गेले अनेक दिवस मनावर दाटलेले उदास भाव या अनपेक्षित यशामुळे नाहीसे होऊन मी चांगलाच तरतरीत झालो. सहजच मी हातावरील घड्याळाकडे नजर टाकली तर सकाळचे ७ वाजत आले होते. सवयीनुसार काही आकडेमोडी मनातल्या-मनात आपोआप झाल्या. जो काही निकाल मिळाला त्याने मला हर्षवायुच होणे बाकी राहिले. कारण लेह सोडल्यापासुन अनेक लहान-मोठ्या अडचणींना तोंड देत स्तोक कांग्री हे ६१२३ मी. उंचीचे हिमशिखर, अगदी वाईट हवामानातही अवघ्या २२ तासांत माझ्याकडून यशस्वीरीत्या सर झाले होते. म्हणतात ना हिंमत ऐ मर्दा, तो मदद ऐ खुदा.


विशेष बाब म्हणजे हे ठरवून केलेले नव्हते. तर शांत राहून, निडरपणे व प्रसंगावधान राखून केलेल्या अथक प्रयत्नाला निसर्गाकडून मिळालेली पोचपावती होती ती. निसर्गाला अन् शिखरमाथ्याला लाख-लाख धन्यवाद देत माझ्या थकलेल्या पायगाडीला बेस कँपच्या दिशेने पिटाळले. पुढची मोठी गंमत म्हणजे त्या दिवशी सायंकाळचा फक्कड मस्सालेदार काळा चहा मी लेहमधेच येऊन घेतला अन् एका छान, सर्वांगसुंदर मोहीमेचा मस्त, गोड समारोप केला.

जय हिंद!!!