मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व भाग १


शुभारंभ - दिनांक २८ मे  २०१७, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

स्थळ - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई.

मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : भाग १

मोहीम शिखर सावरकर ... एक ध्यासपर्व : भाग १

ने मजसी ने, परत मातृभूमीला |
सागरा.... प्राण तळमळला ||


या विश्वविख्यात ओळींतील गुढ आर्तता आजही अनुभवता येते. महाकवी विनायक दामोदर सावरकर यांच्या अलवार मनातून या ओळी उतरल्या असल्या तरी पारतंत्र्यात राहूनही जगाचा नेमका ठाव घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे जगातील महान साहस विरांच्या पंक्तीत नक्कीच उजवे होते. अनेक धाडसी कार्यांतून आपली ही वेगळी ओळख त्यांनी अनेकदा सप्रमाण सिध्द देखील केली आहे. ब्रिटीशांच्या कैदेत असतांनाही मार्सेलिस येथे बोटीतून त्यांनी घेतलेली उडी ही पृथ्वीवरील कोणत्याही साहसकार्याच्या तुलनेत अद्वितीय अशीच ठरेल.


५० वर्षे उलटून गेली, तरी स्वातंत्र्यवीरांचे अजरामर साहित्य आणि साहसी कारनाम्यांनी भारावलेल्या पिढया त्या अद्भूत गारूडातून आजही बाहेर आलेल्या नाहीत. सावरकर आणि साहस हे दोन शब्द वेगळे नाहीतच हे दाखवून देण्याचा एक धाडसी प्रयत्न आम्ही काही सावरकरभक्तांनी केला त्याचीच ही साहसगाथा....


२०१५ हे वर्ष स्वा. सावरकर यांच्या आत्मार्पणाचं ५०वं स्मृतीवर्ष. या वर्षात स्वा. सावरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एखादी भव्यदिव्य कामगिरी करण्याची तगमग देवेंद्र गंद्रे या निस्सीम सावरकरभक्तास लागली होती. जानेवारी २०१५च्या सुमारास यावर विचारचक्र सुरू असतांनाच विजेसारखी एक कल्पना अचानक त्याच्या मनात डोकावली. अन् ही धुरा त्याच्यासह काही सावरकरप्रेमींनी अगदी डोक्यावर घेतली.


विजयी एव्हरेस्टवीरांच्या हस्ते शुभारंभ.....


आत्मार्पणाच्या ५०व्या वर्षांत हिमालयातील एखादया बेलाग हिमशिखरावर चढाई करून त्याचं ”शिखर सावरकर“ असं समर्पक नामकरण करण्याची योजना आकार घेवू लागली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संचलीत   सावरकर माऊंटेनिअरिंग क्लबने याकामी पुढाकार घेतला. या क्लबचे संस्थापक सदस्य स्व. श्री. विजय मदन यांचे कार्य डोळयांसमोर ठेवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. 

पृथ्वीचा मानबिंदू नगाधिराज एव्हरेस्टवर १९६५ साली पहिला भारतीय विजय नोंदविण्याच्या ऐतिहासिक घटनेचं २०१५ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्यानिमित्त मे महिन्यात स्मारकातर्फे, त्या रणझुंजार पथकाच्या सन्मानार्थ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी या भारतीय ऐव्हरेस्टवीरांच्याच हस्ते आमच्या या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मोहिमेकरीता हा फार मोठा शुभशकून होता.


स्वा. सावरकर यांच्या नांवाने गौरवांकित होणारं हिमशिखर देखील त्याच तोलामोलाचं असणं अनिवार्यच होतं. एखादया सर्वसाधारण शिखराने काम भागणारं नव्हतं. किंबहुना हे भागवायचं किंवा उरकायचं कामच नव्हतं. इथं गाठ होती, विनायक दामोदर सावरकर या बहुआयामी, प्रचंड प्रतिभाशाली आणि धगधगत्या अग्निकुंडरूपी ज्वलंत देशभक्ताच्या अकलंक राष्ट्रभक्तीशी.


हिमशिखर आणि संघनिवडीचे काम फत्ते....

आसेतूहिमाचलाचा शोध घेतल्यानंतर या राष्ट्रकार्याकरीता एका मातब्बर, अजिंक्य, अनामिक हिमशिखराची निवड नक्की झाली.... या महाकार्याचं महत्व लक्षात घेवून जुन्या पिढीतील अग्रेसर महिला आरोहक व स्मारकाच्या सदस्या के. सरस्वती आणि अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिटयुट आॅफ माऊंटेनिअरिंग अॅंड अलाईड स्पोर्ट्स, मनाली या हिमाचल प्रदेश सरकारच्या गिर्यारोहण प्रशिक्षणालयाचे निवृत्त उपसंचालक आणि भारतीयांचे लाडके गिर्यारोहक श्री. राजीव शर्मा यांनी आपला प्रचंड अनुभव आणि सावरकरभक्ती पणाला लावून या कामाचा धडाकाच उडवला. भारतबाला श्रीमती बचेंद्री पाल यांच्या पथकातून ऐव्हरेस्टलाही यशस्वीरीत्या धडक देणा ऱ्या या जोडीने मोहिमेकरीता काहीही उणीव ठेवली नाही.

हिमशिखराच्या निवडीनंतर महत्वाची बाजू म्हणजे नियोजित ”शिखर सावरकर“ या बलदंड शिखराशी झुंजण्याची उत्तम मनोशारीरीक क्षमताधारक जिगरबाज आरोहकांची. ही बाजू देखील देशभरातुन निवडलेल्या ७ ताकदीच्या, कुशल आरोहकांमुळे मजबूत झाली.

शिवछत्रपतींचा खडकांचा न् दगडांचा हा देश कौशल्य अन् कतृृत्वाची देखील खाण असल्याने या संघनिवडीच्या कामालाही फारसा वेळ गेला नाही. हिमालयीन प्रशिक्षणांबरोबरच, प्रत्यक्ष हिमालयातील अनेक नामांकित शिखरांवर यशस्वीरीत्या आरोहणाचा तगडा अनुभव, नुसत्या दर्शनानेही थरकाप उडवणाऱ्या सहयाद्रीतील शेकडो बेलाग कडे-सुळक्यांवरील प्रत्यक्ष चढाई, नियोजन आणि आयोजनातले विशेष नैपुण्यप्राप्त अशा संपन्न संघाच्या पाठीवर अनेक मान्यवरांच्या कौतुकाची थाप होती... आणखी काय हवं? उत्तम संघभावना जपणाऱ्या अन् स्मारकाच्या कामात अहोरात्र झोकून दिलेल्या, अनुभवी देवेंद्र गंद्रे या आरोहकाची मोहिमनेतेपदाकरीता निवड करण्यात आली. संघव्यवस्थापक म्हणून सहयाद्री आणि हिमालयातील भ्रमंतीचा सुमारे २० वर्षांचा अनुभव असलेल्या आणि स्मारकाचे सहकार्यवाह असलेल्या श्री. राजेंद्र वराडकर यांनी जबाबदारी स्विकारली. अशा उमदया मोहिमेच्या चलचित्रणाकरीता एखादया तगडया, संयमी चलचित्रकाराची उणीव, उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि अनुभवी आरोहक असलेल्या राहुल दंडवते याने पूर्ण केली.

स्वा. सावरकर हे कोणा एका प्रांताचे वा समुहाचे प्रतिक नव्हते, तर राष्ट्रीय स्वातंत्र्याचे ते खरे प्रणेते होते. या मोहिमेकरीता देशभरातून संघनिवडीला प्राधान्य देतांना ही बाब प्रामुख्याने लक्षात ठेवण्यात आली. त्यामुळे मोहिमेची घोषणा होताच, महाराष्ट्राचा बंधुप्रांत कर्नाटकातून संदीप शेट्टी याची तर सावरकरांना प्रिय अषा वंगदेषातून दिलीप साहू या तरूण, तडफदार आरोहकांची विशेषत्वाने निवड करण्यात आली.


इथेही पोलीस ?...

अशा मोहिमेत पोलीसांचे काम काय? असा एक प्रश्न उगाच उगवला. याला कारण मुंबई पोलीस दलातील दोन आघाडीचे ज्येष्ठ आरोहक. पोलीस आणि जनता एकत्र आल्यास सर्वसाधारण कायदा आणि सुव्यवस्थाच नाही तर हिमालयातील उत्तुंग हिमशिखरांनादेखील सहज गवसणी घालता येईल. याच विचाराने कुर्ला विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीरंग नाडगौडा तसेच गुन्हे शाखेत कार्यरत आणि यापूर्वी १२ हिमालयीन मोहिमांचा अनुभव असलेल्या आनंद शिंदे अर्थात माझी निवड करण्यात आली. मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. राकेश मारिया आणि गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त श्री. प्रसन्ना यांनी आम्हा दोघांचीही या मोहिमेत सहभागी होण्याची अनावर इच्छा आणि त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम पाहून आमच्या रजेकरीता तात्काळ मंजूरी दिली. अशा प्रकारे स्वा. सावरकरांच्या सेवेत विशेष क्षमताधारक ७ आरोहकांचा एक जबरदस्त संघ तयार झाला.


फ्लॅग आॅफ, निरोप, मनालीत आगमन आणि देवदर्शन ...














या सर्व रणधुमाळीवर एक साहसप्रेमी व्यक्ती अहोरात्र नजर ठेवून होती. ती म्हणजे रणजित सावरकर.... स्वा. सावरकर यांचे कनिष्ठ बंधू श्री. नारायण सावरकर यांचे चिरंजीव आणि स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे संस्थापक श्री. विक्रमजी सावरकर यांचे पुत्र रणजित सावरकर. म्हणजेच साक्षात स्वा. सावरकर यांचेच धगधगते खानदानी रक्त. या मोहिमेवर येणाऱ्या प्रत्येक अडचणी त्यांनी अगदी लिलया दूर केल्या. आणि ७ आॅगस्ट रोजी कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, श्री. भारतकुमार राऊत आणि सर्वांच्या लाडक्या श्रीमती के. सरस्वती यांच्या हस्ते मोहिमेचा फ्लॅग आॅफ अर्थात मोहिमेकरीता विजयध्वज प्रदान करण्याचा समारंभ संपन्न झाला.

१० आॅगस्ट २०१५ रोजी मित्र, हितचिंतक, आप्तेष्ट यांनी मोहिमसदस्यांना निरोप दिला. सर्वांच्या आशा, अपेक्षा आणि आशिर्वादाचे गोड ओझे पाठीशी घेवून आम्ही मोहिमसदस्यांनी मुंबईतून दिल्लीमार्गे गिर्यारोहकांची पंढरी मनालीकडे कूच केले. १३ आॅगस्ट रोजी मनालीची ग्रामदेवता माता हिडींबा मंदिरात अष्टकमलदलांकित, चंद्रसूर्यांने तेजोमय तिरंगा हा स्वा. सावरकर संकल्पीत व मादाम कामांनी फडकवलेला हिंदुस्थानचा प्रथम ध्वज फडकवून मोहिमेच्या यशाकरीता आशीर्वाद घेतले. बरोबर १०५ वर्षांपूर्वी याच दिवशी मादाम कामा यांनी हाच ध्वज स्टुटगार्ट येथील आंतरराश्ट्रीय परिषदेत मोठया अभिमानाने फडकवला होता..



मनोगत...

शुभारंभ - दिनांक २८ मे  २०१७, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती

स्थळ - स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर, मुंबई-

रसिक वाचकहो,

आज दिनांक २८ मे २०१७. महान साहित्यिक, महाकवी, क्रांतीशिरोमणी अन् राष्ट्रभक्तीपुढे ज्यांनीे कशाचीही तमा कधीही बाळगली नाही अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा हा जन्मदिवस. माझ्यासारख्या, त्यांच्या भक्तांसाठी हा कोणत्याही शुभमुहुर्तापेक्षाही खुपच मोठा दिवस. त्यामुळेच गेल्या दोन दशकांहूनही अधिक काळ, दऱ्या-खोरे, घाटवाटा, कडे-सुळके, गड-किल्ले, हिमशिखरे आणि विशाल अंतरंगाच्या निसर्गासोबत केलेल्या भन्नाट भटकंतीचा लेखा-जोखा, "आनंदवारी" या ब्लाॅगद्वारे आपल्या सेवेत सादर करण्याचा शुभारंभ मी आजच्या या सुमंगल दिनी करीत आहे.


गिर्यारोहकांचे मेरुमणी शेर्पा तेनसिंग नोर्गे नेहमी म्हणत " लोक देवळात जातात, मी डोंगरात जातो. " ऐन तारुण्यात धर्मोपदेशक होण्यास निघालेले तेनसिंग आयुष्याच्या एका वळणवाटेवर धर्मयात्रा सोडुन पर्वतयात्रेचे वारकरी झाले. अशा प्रकारे पर्वतवाटांचे वारकरी होऊन अद्भुत साहसयात्रांद्वारे अापल्या परमेश्वराचा शोध घेऊन त्यातुन निखळ व अमर्याद आनंद लुटणाऱ्यांची डोंगराऐवढी उदाहरणे देता येतील.


खरंच गिर्यारोहणातुन मिळणारा आनंद कितीतरी अपूर्व आणि अवर्णनिय असाच असतो.


पांडुरंगाच्या भक्तिमध्ये आकंठ बुडालेल्या पंढरीच्या एखाद्या वारकऱ्याला विचारा कि त्या सोनसावळया विठुरायाच्या अगम्य आणि दुर्घट वाटणाऱ्या वारीत त्याला काय मिळत? तो जे काही सर्वांगसुंदर उत्तर देईल ना... नेमकी तीच भावना आमच्यासारख्या भटक्यांची, गिर्यारोहणाला, पर्वतभेटीला जातांना असते. कारण त्यातुन केवळ निखळ, निर्भेळ आनंद मिळवणे हाच एकमेव शुद्ध हेतु त्यामागे असतो.


आमच्यासाठी गिर्यारोहण म्हणजे जीवाचा शिवाशी अन् आत्म्याचा परमात्म्याशी भेटीचा, सुखसंवादाचा एक महान सोहळा असतो. आणि त्या सोहळ्यातुन जो काहि आनंद मिळतो तो त्या भक्तीमार्गी वारकऱ्याला मिळणाऱ्या आनंदापेक्षा तसुभरही कमी नसतो.


अफाट, अनगड, अनवट वारींचा वाटसरू होण्याचं भाग्य उगाच कोणाच्याही भाळी लिहिलं जात नाहि. त्यामुळे ज्याला हा अनमोल ठेवा गवसला त्याला खरंच भाग्यवान म्हटलं पाहिजे. लौकिकदृष्ट्या तो काही कमवेल कि नाहि हा भाग अलाहिदा. पण निसर्ग आणि साहस यांच्या सोबतीने या आनंदवाटांवर तो जी काही कमाईची लयलुट करतो ती मात्र केवळ अवर्णनिय असते. त्याची तुलना अन्य कशाशीही होऊ शकत नाही.


तसा मी मुलखाचा भटक्या. त्यामुळे जिवासखा सह्याद्री, देवभुमी हिमालय आणि सुखनिधान निसर्गात केलेल्या महामुर भटकंतीचा एक किंमती खजिना माझ्याकडे  अनवधानाने का होईना तयार झाला. पण लेखन हा काही माझा प्रांत नसल्याने बराच काळ या विद्येने मला चांगलेच दुर ठेवले. पण "देर आये, दुरुस्त आये" या न्यायाने हि कला माझ्या अंतरंगात प्रवाहित होतेय यातच मी खुप खुप आनंदी आहे.


थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक डोंगरभेटीत, भक्तीचा  पवित्र आनंद मिळवण्यासाठी वारीला निघालेल्या भावविभोर वारकऱ्यासारखीच माझीही अवस्था झालेली असते. मला घडलेल्या ऐकापेक्षा ऐक थरारक अशा डोंगरयात्रांमधुन जे जे काही रुचलं, भावलं, मनाला आरपार भिडलं ते ते सारं या " आनंदवारी " द्वारे मी आपल्यासारख्या दर्दींच्या सेवेत वेळोवेळी सादर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे.


स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणाच्या ५०व्या स्मृतीवर्षानिमित्त २०१५ मध्ये स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांचेमार्फत एका महत्वाकांक्षी हिमालयीन गिर्यारोहण मोहीमेचे आयोजन करण्यात अाले होते. या भव्य मोहीमेत हिमाचल प्रदेशातील एक अजिंक्य, अनामिक हिमशिखर सर करण्याची कामगिरी आमच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली होती. लवकरच या हिमशिखराचे "शिखर सावरकर" असे नामकरणही होत आहे.


आजच्या या स्वा. सावरकरांच्या जयंती दिनी, तात्यारावांच्याच स्मृतीप्रित्यर्थ पुर्णत्वाला गेलेल्या यशस्वी हिमालयीन मोहीमेच्या सचित्र वृत्तांताचा पहिला भाग माझ्या आनंदवारीचा पहिला ब्लाॅग म्हणुन प्रसिद्ध होत आहे. याकरीता मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजत आहे.


लेखन हा माझा प्रांत नसला तरी निसर्ग आणि साहसावरील नितांत प्रेमापायीच मी हा प्रपंच करीत आहे. त्यामुळे अनेक त्रुटी राहून गेल्या असण्याचीही दाट शक्यता असल्याने त्या सुधारण्यास आणि हा ब्लाॅग अधिकाधिक उत्तम बनवण्याकरीता आपण मला निश्चितच मदत कराल अशी केवळ आशाच नाहि तर खात्री आहे.


चला तर मग, माझ्या या आनंदवारीत काही पावलं चालुन आपल्या सहवासाच्या सुखद क्षणांची सोबत मला मिळवुन द्यावी हि नम्र विनंती..