इथे रंगला... सोहळा... छांदिष्टांचा...

इथे रंगला... सोहळा... छांदिष्टांचा...

इथे रंगला... सोहळा... छांदिष्टांचा...

सांगा कसं जगायचं ?... 

कण्हत-कण्हत कि गाणं म्हणत ?...

तुम्हीच ठरवा...

पेला अर्धा भरला आहे... असं सुद्धा म्हणता येतं...
पेला अर्धा सरला आहे... असं सुद्धा... म्हणता येतं...
सरला आहे म्हणायचं... कि भरला आहे म्हणायचं...

तुम्हीच ठरवा...

सांगा कसं जगायचं?
सांगा... ना... कसं जगायच ?

एका खास प्रसंगी,...  माझ्या आवडी-निवडी आवर्जून जपणाऱ्या  पत्नी सरिताने उत्कटतेने भेट दिलेल्या "काॅफी हाऊस" या गाजलेल्या अल्बममधील हे अपुर्व बोल आहेत सदाबहार कवी मंगेश पाडगावरांचे... त्यांच्या या दमदार, सकारात्मक ओळी, प्रचंड ताकदीच्या अभिनयाबरोबरच वैशिष्ट्यपुर्ण आवाजाचं धनीपण लाभलेल्या, अष्टपैलू कलाकार प्रशांत दामले यांच्या आवाजात ऐकून मी भारावूनच गेलो होतो...

काही वर्षांनी पुन्हा एकदा त्याच दिव्य ओळीची आठवण करून देणाऱ्या आणि छंदांच्या साह्याने मस्त-मस्त कसं रहावं? याची शिकवण देणाऱ्या एका अवलिया छांदिष्टाची अचानकच भेट झाली... आणि दिवस अक्षरशः सत्कारणीच लागला...

आयुष्यभर निगुतीने जपलेल्या आपल्या लाडक्या छंदांना वाढतं, फोफावतं आणि बहरतं पहात... उताराला लागलेल्या ६५ वर्षीय "तरुणाईचा" नेमाने नाही तर क्षणाक्षणाला अन् जोमाने आनंद लुटत मनसोक्त जगणाऱ्या... आगळ्या-वेगळ्या छंदांच्या एका बादशहावर म्या पामराचा एक छोटासा लेखनप्रपंच ...

-  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  -  - -  -  -  -  -  -  -  - 


वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही ... 
तर... वेडी माणसंच इतिहास घडवतात...

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या या प्रेरणादायी ओळी मला खुप आवडतात... नुकतीच या ओळींची प्रचीती आली त्याचीच ही चित्तरकथा...  

माझ्या अविरत भटकंतीमागची शक्ति आणि प्रेरणास्त्रोत म्हणजे आमचे लाडके कुटुंब सरकार... लढवय्या मराठ्यांचा वैभवशाली इतिहास आणि त्यांच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाची आवड त्यांनी ब-याच कारणांमुळे अनेक वर्षांपासून काहीशी  सुप्तावस्थेत बाजूलाच काढून ठेवली होती...

पण, मागील काही काळातलं... आमचं सहकुटुंब, नियमित, वाढतं, गिर्यारोहण आणि गडकोटांवरील सततच्या भटकंतीमुळे ती ऐतिहासिक आवड आपोआपच नव्याने आणि प्राधान्याने पुढे-पुढेच येत गेली... त्याचं पर्यवसान असं झालं कि, त्यांनी नोकरी, घर, मुले आणि त्यांचा सगळ्यात मोठा व्याप म्हणजे मी... अशा अनेकविध व्यापात प्रचंड व्यस्त असूनही... एक आघाडीचे इतिहास अभ्यासक आणि ऐतिहासिक शस्त्रसंग्राहकांच्या प्रभावळीतलं अग्रक्रमाने उभरतं नांव म्हणजे बदलापुरचे रा.रा. श्री. सुनिल कदम... यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या एका विशेष अभ्यासक्रमांतर्गत ऐतिहासिक अशी मोडी लिपी... मनापासून शिकायचं ठरवलं... आणि सांगायला अभिमान वाटतो कि चक्क महिन्याभरातच वेळ मिळेल तसा अभ्यास करूनही परिक्षा दिली आणि उत्तम गुण मिळवून उत्तीर्णही झाल्या... त्यांच्या प्रमाणपत्र वाटप आणि कौतुकसोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी हजर राहणं हे ओघानेच येत असल्यामुळे चक्क रविवार असूनही सक्काळी-सक्काळीच ठाण्यात पोहोचलो ...

कार्यक्रम अतिशय छान, आटोपशीर, समर्पक आणि उत्तरोत्तर रंगतच जाणारा होता... विशेष काय?... तर शिवछत्रपतींच्या मराठेशाहीचा जीता-जागता इतिहास म्हणजे दुर्गश्री आप्पासाहेब परब व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, तज्ञ आणि शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य सर्वश्री पांडुरंगजी बलकवडे... यांचेकडून मराठ्यांच्या अटकेपारच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या खणखणीत इतिहासावर आधारित तपशीलवार न् घणाघाती विवेचन एकून अभिमानी उर दाटून आला होता... आणि कानांनी तर ही अविट मेजवानी पार मेंदूपर्यंत पोहोचविण्याची कामगिरी उत्तमरित्या फत्ते केली होती ...

कार्यक्रम संपन्न झाला आणि त्या अपुर्व नादातच ब्राम्हण सेवा संघाच्या हाॅलमधून बाहेर पडलो... मग मात्र प्रकर्षाने आठवण झाली ती आमच्या गरीब बिचाऱ्या  आणि खंगल्या-खपाटीला गेलेल्या पोटाची... इतका वेळ आमचं शरीर... पुढ्यात सुरू असलेल्या महान इतिहासाचा संगर... डोळे, कान आणि मेंदूने टिपकागदासारखं टिपण्याच्या कामगिरीत मग्न होतं... त्यामुळे बापड्या पोटाकडे थोडं दुर्लक्षच झालं... मग शोधाशोध सुरु झाली एखाद्या चांगल्या क्षुधाशांती भवनाची... ठाण्याची प्रसिद्ध मिसळ कि, इतर काही? असं हो ना करता-करता... आमच्यातील ज्येष्ठ-वरिष्ठ शेखर राजेशिर्के याने एक हाॅटेल सुचवले... त्याचं नांव ऐकून खरं तर आम्ही सगळेच गोंधळात पडलो... पण मग पोट आणि पायांनी संगनमत करून हट्टाने तिकडचाच रस्ता तात्काळ धरण्यास भाग पाडले...

श्री विनायक जोशी काकांच्या सोबत ... 

 

एकदाचे आम्ही सगळे "कुटिरोद्योग उपाहारगृहात" शिरलो... आणि अक्षरशः हैराण-परेशान होऊन गेलो... अगदी अलिबाबाच्या गुहेतच शिरल्यागत अवस्था होऊन गेली. हाॅटेलातील एकेक आश्चर्ये पाहत असतांनाच त्या सर्व कारभाराचे कर्ते करविते आणि छांदिष्टांच्या पंक्तीतील मोठे मानकरी असलेले हाॅटेलचे मालक श्री. विनायक जोशी हे तिथल्या तिथेच झालेल्या थोड्याशा परिचयात... अगदी खास ओळख असल्यासारखे येऊन आमच्या गप्पांत सहजच सामील होऊन गेले... त्यांच्या उपाहारगृहातील अप्रतिम चवीच्या पदार्थांबरोबरच उद्बोधक आणि प्रेरणादायी गप्पाष्टकांची रंगारंग मालिका आमच्या खाण्याच्या टेबलावरच सुरू झाली...

तर... हे विनायकराव जोशी काका... म्हणजे एक अपार क्षमतेचं... भरदार आणि जबरदस्त छांदिष्ट व्यक्तिमत्त्व ... हाॅटेलात जागोजागी पद्धतशीरपणे मांडून ठेवलेल्या त्यांच्या संग्रहातील पितळी आणि इतर धातुंच्या मुर्त्या, दिवे, लामणदिवे, समया, झुंबरे आणि इतरही अनेक महत्वपूर्ण बाबींसह जपलेला सागरी खजिना पाहून आम्ही सगळे हरखूनच गेलो होतो...  पण त्यांच्याशी झालेल्या बहारदार गप्पांदरम्यान् त्या अवलिया... अलिबाबाच्या गुहेतलं येक येक दालन उघडत होतं... तसतसे आम्ही आणखीनच मुग्ध होऊन जात होतो...

साध्याशा काडेपेट्यांचासुद्धा इतका विशाल संग्रह केला जाऊ शकतो... हे जोशीकाकांना भेटल्यावर तपशीलाने कळतं... जगभरातील रंगबिरंग्या, दिमाखदार काडेपेट्यांनी त्यांचं आयुष्यदेखील रंगीन होऊन गेल्यामुळे याबाबत ते एकदम ओघवत्या वाणीतच बोलतात... या काडेपेट्या त्यांच्या आयुष्याचा जणू एक महत्वाचा घटकच होऊन गेल्या आहेत.

बरं... हे एक झालं ... आता जरा...संच पुढे दुस-याकडे वळूया... साधी-सुधी बाटल्यांची, बुचं उघडण्याची ओपनर्स... आपण रोज आणि अनेकवेळा पाहतो, काम झालं कि विसरुनही जातो... कुठेही टाकून देतो... त्यात काय एवढं विशेष? पण थांबा... त्यातील अगाध वैशिष्ट्ये... ही  जोशीकाकांचा ओपनर्सचा प्रचंड संग्रह बघितल्यावर आपल्या डोक्याला झिणझिण्या आणल्याशिवाय रहात नाहीत...

एकापेक्षा एक सरस, विविधांगी आकाराचे, रंगांचे, अनेकविध धातूचे, जबरदस्त कलाकारीचे आणि जगभरातील दिमाखदार, भावखाऊ ओपनर्सच्या एका जबरदस्त संग्रहाचे धनी आहेत ते... साधे ओपनरही इतक्या प्रकारचे आणि इतके सुंदर असतात हे त्यांचा भव्य संग्रह पाहिल्यावरच कळतं...


इतकंच नाही बरं का? या सगळ्या अव्यापारेषू उद्योगाच्या जोडीला निसर्गात भटकण्याची आवड शांत बसू देत नाही... म्हणून घरातच लावलेल्या सुंदरशा बागेत बागकामाचाही एक सर्वांगसुंदर छंद त्यांनी अगदी निगुतीने सांभाळला आहे... पर्यावरणाला जपण्याचं व्रत घेतल्याप्रमाणे फक्त देशी झाडांची रोपे तयार करणे त्यांची अनेक ठिकाणी लागवड करणे असे उद्योगही यांच्या छंदयादीत कायमचेच समाविष्ट झालेले आहेत...

आता जरा हे सगळं बाजूला ठेऊन... जरा दुस-या अंगाला वळूया...  तरुणपणी तर... यांनी सह्याद्रीतील अनेक गड-कोटांवर आणि नगाधिराज हिमालयाच्या अंतरंगी येथेच्छ आणि मनसोक्त भटकंती देखील केली आहे हे कळताच... हेच एवढं राहिलं होतं कि काय यांचं?... असंच वाटून गेलं. त्यांच्या अशा एकेक छंदांची माहिती अलिबाबाच्या गुहेतल्या अजब-गजब गुप्तदालनांतून बाहेर पडत होती तसतसा आमच्या सर्वांच्या तोंडांच्या चंबूचा आकार वाढतच चालला होता...


त्यांनी वर्णन केलेली एकेक गोष्ट ऐकून गिर्यारोहणाबरोबरच फिल्म मेकिंगच्या क्षेत्रात चांगलंच नांव कमावणारा शेखर राजेशिर्के, मुद्रा ट्रेकर्स या नामवंत गिर्यारोहण संस्थेचा संस्थापक आणि ज्येष्ठ गिर्यारोहक दत्ता चाळके, गडकिल्ले भटकंतीमधली युथ आयकाॅन, "दुर्गसमशेर" हमिदा खान, गिर्यारोहण, पाकशास्त्र आणि आता इतिहास या विषयांत झपाटल्याप्रमाणे काम करणारे आमचे परमप्रिय सरकार सरिता शिंदे आणि अस्मादिक असे गेली २५ वर्षांहुनही अधिक काळ निसर्ग, डोंगर आणि गडकोटांना तिर्थक्षेत्र मानून सुखेनैव भटकंती करणारी मंडळी देखील बेक्कार चक्राऊन गेलो... गडगंज भटकंतीदरम्यान बंबाळ्या रानात चकवा लागल्यासारखीच आमची अवस्था होऊन गेली होती.

एकाच माणसाने इतके छंद का करावेत? हे पाहून इतक्या कमी कालावधीत त्यांच्याबद्धल खरंतर जबर असूयाच आमच्यात निर्माण झाली होती... एखाद्याने किती म्हणून छंद जोपासावेत? याच्यावर शासनास सांगून काहही कायदेशीर नियंत्रण आणता येतील का? याबाबत आ मचा विचारही सुरू झाला होता... असो. (जास्त फाजिलपणा बरा नसतो...)

या तरुण तरतरीत जोशीकाकांचं वय आज सुमारे ६५च्या घरात आहे... पण जोश  मात्र आजही २०-२५चाच दिसतो... इतक्या यशस्वी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या आयुष्याच्या साथीदाराविषयी जाणून घेण्याची आमची उत्कंठा जागृत झाल्याने सहजच बोलता-बोलता त्यांच्या अर्धांगीनीचा विषय काढला... तर एखाद्या वीर जवानाने आवडीच्या विषयावर बाह्या सरसावूनच पुढे यावे अशा उत्साहाने त्यांनी आपल्या जीवनसंगीनीबद्धल तुफान एक्सप्रेसच्या जोशपुर्ण आवेशातच धाड... धाड... धाड... सांगायला सुरुवात केली... (हा देखील त्यांचा एक आवडता छंदच बरं का?)

पुर्वाश्रमीच्या कु. हेमा मालवणकर... सुमारे ३०वर्षांपुर्वी महाराष्ट्राच्या गिर्यारोहण विश्वातलं एक दमदार आणि जोमदार नांव... म्हणजेच आताच्या सौ. हेमा जोशी...  या मोकळ्या-ढाकळ्या गप्पाष्टकांदरम्यान, थोड्याशा आजारपणामुळे त्यांची भेट मात्र होऊ शकली नाही... पण एकंदर ढोबळ माहितीवरून त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्त्वाचा केवळ अंदाज बांधता आला ... आणि त्यावरच ... आम्ही जे स्वतःला भटकंती आणि साहसाच्या विश्वातले तिसमारखाँ समजतो ... तर त्यांच्या अपार कर्तृत्वासमोर आमच्या इतक्या मोठ्या कारकीर्दीनेही मारच खाल्ला... असंच म्हणावं लागेल...

ज्या काळात बायकांनी साडीचा पदर आणि घराचा उंबरठा यांच्या बाहेर येणं ही मोठीच आफत समजली जायची त्याच काळात आमच्या या जोशीकाकींनी भर ठाणे आणि मुंबईत उमद्या घोड्यांवरून मुबलक प्रमाणात घोडा फेकत स्वारी केलीय... ओपन जीप रस्त्यावर भरधाव आणि स्वतः चालवत लोकांना हैराण करून सोडलंय ...

इतकंच नाही तर लग्नापूर्वी जोशीकाकांना भेटायला एकदा त्या घोड्यावरूनच घरी आल्या होत्या हे सांगतांना जोशीकाकांचा गौरवर्णी चेहरा किंचीतसा लालसरतेकडे झुकल्याचं दिसलं... यावरून या दोघांतील नितांत प्रेम आज या वयातही जबर शाबूत असल्याचं स्पष्टच होऊन गेलं... त्यांच्यावर भरपुर प्रेम करणं हादेखील आमच्या जोशीकाकांनी जोपासलेल्या अनेकविध छंदांपैकिच एक प्रमुख छंद बरंका...

आपल्या या हिंम्मतबाज जोशीकाकींनी अनेक होतकरू महिलांना घराबाहेरच्या विश्वाची चांगलीच ओळख करून देत त्यावेळी महिलांच्या एका तगड्या गिर्यारोहण पथकाची (लेडीज माऊंटेनिअरिंग क्लब) निर्मिती केली होती... याद्वारे त्यांनी सह्याद्री म्हणू नका... कि हिमालय म्हणू नका... या दोन्ही विस्तीर्ण पर्वतरांगांमधील उत्तुंग पर्वतशिखरांवर आपल्या कर्तृत्वाचा डंका त्या काहीशा अडनिड्या काळातही चांगलाच गाजवला होता... आणि त्याच काळात महिलांना घेऊन त्यांनी ख-या अर्थाने थरारक राॅक क्लाईंबिंग आणि आता ज्याला आपण रियल या Adventure का काय म्हणतो ना? ते सारं सारं मनसोक्त आणि स्वच्छंदपणे करून सवरून आता उतारवयात सहधर्मी जोशीकाकांसह आयुष्यभर प्रचंड ऊर्जेने जपलेल्या आपल्या छंदांना वाढतं बहरतं पहात त्यातून एक अपार आनंद नित्यनेमानेच नाही तर क्षणाक्षणाला मिळवत आपलं ज्येष्ठपण मजेत एंजाॅय करताहेत.

या दांपत्याबाबत सहजच बोलता-बोलता गुरूस्थानी असलेल्या ज्येष्ठ गिर्यारोहक प्रदीप केळकर सर (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्याकडे विषय काढला तर त्यांनीही या दांपत्याच्या इतर कार्यकलापाविषयी आणि विशेषतः गिर्यारोहणतल्या योगदानाबद्धल गौरवोद्गारच काढले... लेडीज माऊंटेंनिअरिंग क्लबला त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यावेळच्या आघाडीच्या महिला गिर्यारोहक विजयाताई गद्रे, शिवाय भारतबाला बचेंद्री पाल यांच्यासोबत माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी झालेल्या के. सरस्वती या सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या अनेक गिर्यारोहणविषयक कार्यक्रमांच्या आठवणींनी तेही अगदी हळवे होऊन गेले... आता साठीच्या पुढे असलेली ही  सारी मंडळी आजही आंम्हांस मार्गदर्शनाकरीता सतत उपलब्ध आहेत हे पाहून आमच्या या मधल्या पिढीचा प्रचंड अभिमान वाटून गेला...

आपल्या विविध छंदांच्या आधारे दैनंदिन जगण्याचं असं सणा-सोहळ्यात रुपांतर करणाऱ्या आणि त्यातून मनसोक्त आनंदाची उधळण करणाऱ्या या ज्येष्ठोत्तमांना उत्तम आयुरारोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त करून... अन् खरंतर त्यांच्या कर्तृत्वाला मनोमन सलाम करतच त्यांचा निरोप घेतला... तो पुन्हा आणि लवकरात लवकर भेटून त्यांच्या वेगवेगळ्या छंदाद्वारे निर्मित असाधारण ऊर्जेचा लाभ घेण्यासाठीच... कारण अशी प्रचंड उर्जा आणि जबरदस्त सकारात्मकतेने आयुष्याकडे बघणा-या माणसांची अखंड साथ-संगतच... आपलं आपणच धकाधकीचं करुन घेतलेलं जीवन काहीसं सुलभ आणि सुकर करण्यासाठी कायम मार्गदर्शक ठरत असतात...

आणि विशेष म्हणजे दुनिया फक्त वाईटानेच भरलेली आहे... असं नेहमीच नकारात्मक गृहितक न मांडता, नीट डोळे उघडे ठेऊन थोडासाच त्रास घेऊन, मनापासून शोधलं, पाहिलं कि ही अशी सारी सकारात्मकतेने भरपूर तत्त्वं आपल्या आजूबाजूलाच गवसतात... पण... पण काय?... हे अजूनही लिहायची गरज आहे ?
जोशी काकांच्या सोबतचा कुटीरोद्योग ... 

ठाण्यासारख्या अतिप्राचीन नगरीचं नांव स्वकर्तृत्वाने सार्थ करीत आपल्या जगावेगळ्या छंदांद्वारे आनंदी जगण्याचं अफलातून समीकरण सहजसुलभ करून सांगणाऱ्या जोशी कुटुंबियांकडे पाहून मला माझ्याच "दोनोळी" सहजच आठवून आल्या...

खुश रहना... जिंदगीकी हँसी आदत बनालो... 
कटती नहीं ये युँही... इसे हमदम बनालो...

No comments:


Post a Comment